तिचा सन्मान करताना
त्याला कमी लेखू नका
एका रेषेला मोठी दाखवताना
दुसऱ्या रेषेला छोटी
करायला जाऊ नका.
ती आहेच दुर्गा, महिषासुरमर्दिनी
तो ही सृष्टीची अर्धी बाजू सांभाळतोय
अर्धनारी नटेश्वरातला अर्धा नर तो आहे
तिचा उदोउदो करताना त्याला विसरु नका
मान्य आहे त्याच्या पूर्वजांनी
केलाय तिच्यावर अन्याय
पण त्याला त्याच्यापरीने
चूक सुधारायची आहे
द्या ना त्याला एक संधी
अहो, तो ही गोंधळला आहे
पुरुष प्रधान संस्कृतीचा
तो ही बळीच आहे.
त्याची बुद्धी आणि त्याचे मन
यांचा केवढा गोंधळ उडालाय
संस्कार आणि संस्कृती
यांचा पुरता घोळ झालाय
परंपरा त्याला तू श्रेष्ठ, तू तारणहार,
तू कर्ता, तू नियंता असे शिकवते
त्याच्या बुद्धीला तरी
हे सारे कुठे पटते?
मनाचे ऐकू की बुद्धीचे?
हाच तर चिरंतन प्रश्न आहे
स्त्री दाक्षिण्य दाखवू
की तिला बरोबरीने वागवू
त्याला कळतच नाही.
ती चुकली तर त्याने
माफ करायला शिकायलाच हवे
तसेच त्याच्या चुकीला ही
तिने मन मोठे करायला हवे.
आज तिचा सन्मान जरुर करूया
तिच्यातला स्वतःवरचा विश्वास
वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करुया
पण योग्य क्रेडिट त्यालाही देऊया
डॉ. समिधा गांधी
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.
मुख्यसंपादक