Homeमुक्त- व्यासपीठतुला सुद्धा माझी आई व्हावं लागेल

तुला सुद्धा माझी आई व्हावं लागेल

गुलाबी थंडीत,
चांदण्या रात्रीला
मऊ मखमली गादीवर झोपून
तू पाहिलेल्या पक्क्या घराचं स्वप्न,
मला कच्च वाटू लागलं…
जेव्हा माझी आई म्हणाली
पोरा..!
सिमेंट काँक्रीट च्या चार भिंती म्हणजे घर नसतं
मनाची मजबूत नाती म्हणजे घर असतं….

आईला इंग्लिश ग्रामर
मराठी व्याकरण….इतिहासाचं प्रकरण,
भूगोलाचा नकाशा….विज्ञानाची दिशा,
आणि देशाची दशा
यातलं काहीच कळत नाही..
पण तरीही…
तिच्या महिन्याच्या घरखर्चातील,
गणिताचा आकडा कधी चुकलाच नाही..
आणि भुकेच्या भूगोलात
भाकरीचा प्रदेश शोधताना
आईच्या कष्टाचा वास्को द गामा कधी थकलाच नाही..

एकदा लाड लाड
ती हळूच म्हणाली कानात..
त्या भेंड्या मातीच्या घरात,
आणि पडीक पडलेल्या रानात…
तुझा जीव का अडकलाय..?
आपण ते विकून टाकू
आणि शहरात वन बी एच के फ्लॅट घेऊ…
अग वेडे पण माझी आई म्हणते,
” आयुष्याचा खेळ नव्या नवरीच्या मेहंदीसारखा
आणि नवरदेवाच्या पानाच्या
विड्या सारखा रंगाला पाहिजे…
आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर बंगला बांधता येतो,
पण संसार करण्यासाठी बंगला नाही
आयुष्याचा जोडीदार चांगला पाहिजे…

आजच्या पिढीला
पिशवीतून
मिळणाऱ्या गाईच्या दुधासारखच,
वाटतं असेल आईच दूध…
म्हणून तर आईच्या पदराला खेळत खेळत मोठं झालेलं
वासरा सारखं लेकरू,
टोणग्या सारखं वागतं…
एकदा
आई सहज बोलता बोलता बोलून गेली
आई बापाचं प्रेम समजण्यासाठी
आई बापच व्हाव लागतं…

शेणसड्याने सारवलेली भुई
अंगणातली जाई जुई
आणि चुलीपुढे बसलेली आई
ह्या जिवंत चित्रांचं प्रक्षेपण कसं करता येईल
आपल्या स्वप्नातल्या हायफाय ..
वायफाय युक्त घरात..
म्हणून म्हणतो
स्वप्नांचा पाठलाग करताना
मेघा हायवेने कितीही दुराचा प्रवास केला..
तरी झुळझुळणारे ओढे नाले
आणि छोटीशी नदी ओलांडून
गावाकडच्या घरी यावचं लागेल आपल्याला…

चंद्र सूर्य ताऱ्यांच्या शपथा घेऊन
प्रतिभावंतांनी
प्रेमाच्या शोधात
हजारो कविता लिहिल्या लैला-मजूनच्या प्रेमावर…
मी फक्त एक ओळ लिहीली
आईबापाच्या घामावर..
आणि मी धन्य झालो..

व्यक्ती स्वातंत्र्य,
जगण्याचं तत्व
आणि कष्टाने मिळवलेलं अस्तित्व
मला सगळं मान्य…आहे
तुझी माझी पाच आकडी पगाराची नौकरी
भूक भागवण्यासाठी काही मिंटातच देईल पिझ्झा,
पण चुलीवरची भाकरी देणार नाही..
त्यासाठी
तुला सुद्धा माझी आई व्हावं लागेल…

  • सुमित गुणवंत

Previous article
Next article
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

3 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular