दिनकर उगवला, पुन्हा आज मावळला.
सृष्टीचक्र चाले नित्य,कधी कळले का तुला ?
लक्ष लक्ष प्राणी पक्षी,कोण चारापाणी देतो ?
नियतीचा खेळ गड्या,सांगा कोणाला कळतो ?
जन्म-मृत्यूचे हे कोडे,सांगा कुणाला सुटले ?
देई प्रयत्न सोडून,म्हणे नशीब फुटले ….
नकळत होते प्रेम,ताबा सुटतो मनाचा
भावना या अनावर,क्षण त्याचा आनंदाचा…
चाले गाडी जीवनाची,सरे क्षण कणकण
नकळत घडे सारे, स्वीकारते माझे मन…
चाले चक्र निरंतर , नकळत घडे सारे
शक्य तेवढे जाणावे , अज्ञानात सुख खरे…
कवी - किसन आटोळे सर
मुख्यसंपादक