Homeमाझा अधिकारनैतिकतेच्या मंत्राबरोबर भौतिकतेचे तंत्रही वकिलांनी शिकले पाहिजे!

नैतिकतेच्या मंत्राबरोबर भौतिकतेचे तंत्रही वकिलांनी शिकले पाहिजे!

(१) विज्ञानाचे तंत्र व धर्माचा मंत्र या दोन्ही गोष्टींची गोळाबेरीज मेंदूत घेऊन सृष्टी मंथन करणारा प्राणी म्हणजे माणूस! या मंथनाची परवानगी जणू सृष्टीकर्त्या निसर्गानेच माणूस नावाच्या प्राण्यालादिली आहे. सृष्टीनिर्माता निसर्ग हा सृष्टी नियंता आहे की सृष्टीचे निर्माण करून सृष्टीचाच भाग असलेल्या माणसाच्या ताब्यात त्याची सृष्टी देऊन तो शांत बसलाय, हा एक गहन प्रश्न!

(२) कसे आहे की, जत्रेतल्या चक्रात बसलेल्या माणसांना चक्राचे चाक चालवणारा तंत्रज्ञ दिसतो, पण सृष्टीचक्राचे चाक चालवणारा निसर्ग दिसत नाही. जन्माला यायचे, या चाकावरील सीटवर बसायचे, आयुष्य आहे तेवढे गरगर फिरायचे व उतरायची वेळ आली की उतरून चालू पडायचे असे आहे. जत्रेतल्या चक्रातून उतरले ही कुठे जायचे तो रस्ता माहीत असतो, पण सृष्टी चक्रातून, जीवन चक्रातून मृत्यूची वेळ आली की मग त्या चक्रातून उतरून पुढे कुठे जायचे हे माहीत नसते.

(३) सृष्टीचक्रात गोल गोल फिरणारी माणसे पिढ्यानपिढ्या, तासनतास वाद घालीत बसली आहेत की, सृष्टीचक्राचा कोणी यांत्रिक व तांत्रिक या चक्राच्या तळाशी आहे की नाही? म्हणजे निसर्ग नावाची शक्ती किंवा देव आहे की नाही? त्यांचे तरी काय चुकते म्हणा! ही सृष्टी दिसते, सृष्टीचक्र कळते, सृष्टीचक्रात बसून गोल फिरायचा अनुभव मिळतो, पण चक्रधारी दिसत नाही!

(४) प्रश्न नुसत्या या चक्राच्या तंत्राचा नाही तर या चक्रात बसून फिरताना उच्चारण्याच्या मंत्राचा आहे. म्हणजे प्रश्न भौतिकतेचा आहे तसाच तो नैतिकतेचाही आहे, विज्ञानाचा आहे तसाच या विज्ञानातील नैतिक धर्माचाही आहे. म्हणजेच तंत्राचा आहे तसाच मंत्राचाही आहे.

(५) वकिलांनी खरंतर, तंत्र व मंत्र या दोन्हीही गोष्टी साध्य केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, टेक्नो-लिगल वकील, मेडिको-लिगल वकील इत्यादी. तरच त्यांचा वकिलीत टिकाव लागणे शक्य आहे. वकिलांनी नुसत्या सामाजिक नैतिकता डोक्यात घेऊन फिरण्यात अर्थ नाही. नैतिकतेच्या मंत्राबरोबर भौतिकतेचे तंत्रही वकिलांनी आत्मसात केले पाहिजे.

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular