आजरा (हसन तकीलदार):- शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना व पर्यावरणाला उध्वस्त करणारा असल्याने या विभागातील शेतकऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दि. 18/08/2025 रोजी आजरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.
सुरवातीला संघर्ष समितीचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ.संपत देसाई बैठकीमागील हेतू सांगताना म्हणाले की, १२ जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधात लढत आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा आहे. त्यातच भर म्हणून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी नव्या मार्गाची मागणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि इथल्या निसर्गाची नासाडी करण्याच्या शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळं आजची बैठक ही आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आहे. लढ्याचे नियोजन करण्यासाठी आहे.
शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर म्हणाले की, हा रस्ता जरी देवाचे नाव घेऊन होत असला तरी तो केवळ अडानीसाठी होत आहे. अडानीची खनिजे गडचिरोलीहुन गोवा मार्गे परदेशात पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना बळी दिले जात आहे.शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा हा डाव आहे. त्यामुळे आमचा या महामार्गाला विरोध आहे.
बळीराजा संघटनेचे नितीन पाटील म्हणाले की,हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे ते आपण सगळे मिळून करू. त्यासाठी गाववार बैठकांचे आयोजन करावे लागेल.गावागावात जाऊन याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
शिवसेनेचे (उबाठा )तालुकाध्यक्ष युवराज पोवार म्हणाले की, लोकांना सत्ताधारी आमदार निधी मिळणार नाही अशी धमकी देत आहे, लोकांना आपण शक्तीपीठचा धोका समजावून सांगितला पाहिजे.यांचा हा कुटील डाव हाणून पाडला पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात मुकुंददादा देसाई(आजरा साखर चेअरमन) म्हणाले की,आजरा तालुक्यात अनेक प्रकल्प झाले त्यातील विस्थापितांचे अजून पुनर्वसन झालेले नाही, असे असताना हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी का मारला जात आहे? या महामार्गाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करूया.
यावेळी तानाजी देसाई, उमेश आपटे, दशरथ घुरे, शांताराम पाटील, नागेश चौगुले, बाळू पाटील, गोविंद पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सुरवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्याधर गुरबे, अल्बर्ट डिसोझा, रवी भाटले, रामदास पाटील, संजय तरडेकर, प्रकाश शेटगे, किरण पाटील, नारायण भडांगे, संभाजी सांबरेकर, विष्णू पाटील यांच्यासह दाभिल, शेळप, घाटकरवाडी, पारपोली, जेऊर, चितळे, भावेवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि.१८ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चाला आ. सतेज पाटील, माजी खा. राजू शेट्टी आणि माजी आमदार राजेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत.तेव्हा सर्वांनी या मोर्चासाठी प्रचंड संख्येने हजर राहण्याचे आवाहन शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केले आहे.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



