बेवडा


मेला होता तरी मिशीचा बघा आकडा होता
काळासोबत लढणारा तो मर्द रांगडा होता

पीळ भरूनी नित्त्य मिशीला इतका त्याचा वावर
शूर भासला गडी दमाचा जरी बेवडा होता

बडबड करुनी मनात त्याच्या गुपित उरले नाही
खुल्या दिलाचा मनमौजी तो बोलघेवडा होता

पिंड शिवाया उशीर केला हट्टी होता भारी
दारूसंगे हवा तयाला एक खेकडा होता

पत्नीसोबत रोजच झगडा अडवे तिडवे बोलुन
अंगामधला नवरा त्याच्या खरा वाकडा होता

जीव लावला मुलग्याला पण मुलगी रडली होती
फासे त्याचे उलटे पडले असा बापडा होता

आई त्याची अजून रडते जरी विसरली नाती
आईसाठी दरवळणारा जणू केवडा होता


श्री.विजय शिंदे…
३२ शिराळा, सांगली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular