Homeमुक्त- व्यासपीठभागो भूत आया

भागो भूत आया

टीव्ही कडे बघून खदाखदा हसणाऱ्या माझ्या मुलाकडे बघून कोणालाही वाटले असते कि तो एखादा धमाल विनोदी चित्रपट बघतो आहे. पण तो पाहत होता भलतच.

“काय आई, ह्याला काय हॉरर पिक्चर म्हणतात? त्या मुलीच्या डोळ्यात बुब्बुळंच नाही आहेत. म्हणे त्या शैतानने खाल्ली. तरी ती जिवंत कशी आहे? कायच्या काय…” ह्या उद्गारांनी आणि त्याच्या गडगडाटी हास्यामुळे माझा होता नव्हता तो कॉन्फिडन्स हि निघून गेला.

“तुमच्या वेळचे हॉरर पिक्चर दाखव” ह्या मुलाच्या हट्टापोटी मी रामसे बंधूंचा एक पिक्चर शोधून काढला होता आणि त्याला दाखवत होते. ह्या पिक्चरने आणि त्यातल्या त्या खडबडीत त्वचेच्या आणि अणकुचीदार सुळे असलेल्या शैतानने आम्हाला त्या वेळेला पार घाबरवून सोडलेले मला आठवत होते. पण जो मुलगा “The Ring” ” The Grudge” “Insidious” सारख्या तांत्रिकदृष्ट्या वरचढ आणि दचकून किंकाळ्या फोडायला लावणाऱ्या पिक्चरना निधड्या छातीने तोंड देतो त्याला रामसे बंधूचे पिक्चर काय घाम फोडणार?

आता मला ओळखणाऱ्या माणसांचा पहिला प्रश्न हा असेल कि तू कुठे हॉरर पिक्चर बघायला गेली होतीस? कारण अश्या पिक्चरच्या वेळेला होणाऱ्या माझ्या प्रतिक्रिया म्हणजे घरादाराचा मनसोक्त हसायचा विषय आहे. अश्या पिक्चरमध्ये भीतीदायक संगीत वाजायला लागले कि मी पहिल्या प्रथम बाजूला जो कोणी बसला असेल त्याच्या पाठीमागे तोंड खुपसते आणि एका डोळ्याने दिसेल तेवढेच बघते. जणू काही TV मधून काही यायचेच असेल तर माझ्यापर्यंत पोचायचे नाही! किंवा बोटांनी डोळे झाकून फटीतून जेवढे दिसते तेवढे पहाते. जणू काही फटींतून पाहिल्यामुळे त्या प्रसंगाची तीव्रता कमी होणार आहे! आता ह्या वयाला मी एवढी भित्रट आहे तर लहानपणी रामसे बंधूंचे हॉरर पिक्चर कशाला झक मारायला पाहायला गेले होते हा प्रश्न रास्त आहे. पण रामसे बंधुंचेच का पाहायला गेले होते हा प्रश्न पार चुकीचा आहे. ९० च्या दशकामध्ये रामसे बन्धुव्यतिरिक्त कोण असे पिक्चर बनवत होते मला सांगा बरं? कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन, इत्यादी सगळ्या डिपार्टमेंट्सना पुरून उरेल इतकी ह्या भावांची लोकसंख्या असल्यामुळे “सब कुछ रामसे” असे कितीतरी हॉरर पिक्चर बनवून ह्या मंडळींनी अगदी धुमाकूळ घातला होता.

आणि मी लहानपणी थोडे फार का होईना हॉरर पिक्चर का बघितले हे हि सांगते. आमच्या लहानपणी केबल, टाटा स्काय, ऍमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स अश्या माध्यमांची मांदियाळी नव्हती. दूरदर्शन बघा नाहीतरी सटी सामाशी थिएटरला जाऊन एखादा पिक्चर बघा एवढ्यावरच बहुतेकांना सिनेमा प्रेम भागवावे लागत होते. त्यावर पर्याय म्हणजे बिल्डिंग मधल्या सगळ्या पोरांनी थोडी थोडी वर्गणी काढून विडिओ कॅसेट रेकॉर्डर (VCR) भाड्यावर आणायचा आणि आवडत्या पिक्चरची कॅसेट भाड्यावर आणून बघायची. मुलींना आवडणारे हळुवार पिक्चर म्हणजे मुलांच्या दृष्टीने ‘रडके’ आणि मुलांना आवडणारे मारधाडपट मुलींचे डोके उठवणारे. शेवटी लघुत्तम सामाईक विभाजक म्हणून हॉरर पिक्चर आणूया हे ठरवले जाई. (अर्थात ह्या पिक्चर व्यतिरिक्तही आम्ही अनेक सुंदर पिक्चर बघितले.)

पिक्चरची नावे पण काय नामचीन असायची.”पुरानी हवेली” “पुराना मंदिर” “सन्नाटा” “दो गझ जमीन के नीचे” “तेहखाना”. ह्या पिक्चरमध्ये बहुदा एखादा झपाटलेला वाडा असे. त्या वाडयाच्या मालकाच्या कुटुंबाला पिढ्यान्पिढ्याचा शाप मिळालेला असे. त्यावर विश्वास न ठेवणारी मालकाची सुस्वरूप आणि मॉडर्न आखूड कपड्यातली मुलगी शहानिशा करायला वाड्यात तडफडायला जाई. हे नसेल तर गेलाबाजार सहलीला गेलेल्या आचरट मुलं मुलींचा ग्रुप ह्या वाड्यात येऊन धडके. आता आजूबाजूला पर्यटन स्थळे असताना ह्या आडबाजूच्या तुटून फुटून गेलेल्या वाड्यात ह्यांची काय नाळ पुरलेली असते असा प्रश्न विचारायचा मनाई होती. आता अश्या लोकांना वेचून वेचून मारण्यासाठी एखादा ६ फुटी, वेड्या विदऱ्या चेहऱ्याचा शैतान तर पाहिजेच. त्याला जर ड्रॅकुला सारखे टोकेरी सुळे असतील तर सोन्याहून पिवळे. बरं सगळ्या हिंदी पिक्चरना जो नियम लागू पडतो तो ह्या पिक्चरनाही लागू पडत असे. म्हणजे शैतानाने सगळ्या मित्र मैत्रिणींचा फडशा पाडला तरी हिरो हेरॉईनच्या मात्र नखालाही धक्का लागत नसे.

आता नायिकेला मरण जरी यायचं नसल तरी तिला भुताने झपाटु नये असा काही नियम नव्हता. उलट भुताने झपाटल्यावर तिचे काळे डोळे कॉन्टॅक्ट लेन्सेस लावून एकदम घारे बिरे होऊन जायचे आणि तिच्या तावडीतून हिरो मरता मरता वाचायचा. त्या काळातल्या नियमाप्रमाणे नायिका अबला बिबला असल्यामुळे तिला काही त्या शैतानाला मरता यायचे नाही आणि मग सिंगल-फसली असला तरी हिरोवरच त्या शैतानाचा बंदोबस्त करायची पाळी यायची. बहुतेक वेळेला त्याच्या मदतीला एखादा पुजारी किंवा ख्रिस्ती पाद्री धावून यायचा आणि दोघे मिळून त्या शैतानाचा नायनाट करून टाकायचे. आता पिक्चरच्या पार्ट २ ची पळवाट हवी असेल तर शैतानाला तळघरात किंवा एखाद्या पेटीमध्ये डांबले जाई आणि हाताला लागेल हे धर्म चिन्ह म्हणजे त्रिशूल, ओम किंवा क्रॉस त्यावर ठोकला जाई. पार्ट २ काढायचाच झाला तर कुणीतरी अनावधानाने हे धर्म चिन्ह काढून टाकायची खोटी कि शैतान परत लोकांना त्रास द्यायला मोकळा.

आता अश्या पिक्चर मध्ये पालकांच्या द्र्ष्टीने एक मोठा धोका म्हणजे ह्याच्यामधली हेरॉईन आणि तिच्या मैत्रिणी छोटे छोटे तंग कपडे घालून swimming pool नाही तर तलावा बिलावामध्ये भर थंडीमध्ये पोहायला जात. हे नसेल तर निदान एखाद्या उप कथानकांमध्ये एखादी टंच “गावकी गोरी” दर्शन देईच. आणि आजच्या काळात पुळचट वाटतील पण त्या काळात “आग बाबौ” म्हणायला लावतील असे प्रणय प्रसंगहि ह्यात असत. आम्ही ज्या कॅसेट आणायचो त्या बऱ्यापैकी censored असत पण तरीही काही काही प्रसंग त्या काळाच्या मापदंडाप्रमाणे मुलांना पाहायला देण्याच्या लायकीचे नसत. आम्ही ज्या घरी पिक्चर पाहायला जमत असू त्या घरातल्या पालकांचे आद्य कर्तव्य होते ते म्हणजे असे प्रसंग आल्यावर जोरात खाकरणे, त्यानंतर त्यांनी परत सांगेपर्यंत आम्ही पोरांनी डोळे मिटून घेतले आहेत कि नाही ह्याची शहानिशा करणे आणि असे धोकादायक scenes संपत नाहीत तोवर पिक्चर फास्ट फॉरवर्ड करत रहाणे. ह्यातून जितका पिक्चर पाहायला मिळेल तोसुद्धा आम्हाला भेदरवण्यासाठी पुरेसा होता.

हा पिक्चर पाहणाच्या प्रोग्रॅम झाला कि दुसरा एक साग्रसंगीत कार्यक्रम असे तो म्हणजे मुलांनी मुलींना बेसावध असताना गाठणे आणि चित्रविचित्र आवाज करून किंवा भॉक करून भेदरवणे. असं केल्याशिवाय बहुदा त्यांना त्यांची वर्गणी पूर्णपणे वसूल झाल्यासारखी वाटत नसावी.

आता special effects आणि ग्राफिक्स ने समृद्ध असलेले हॉरर पिक्टर बघते आणि पाचावर धारण बसते तेव्हा वाटते का घाबरायचो आपण रामसे बंधूंच्या पिक्चरना? का आठवतात ते पिक्चर अजूनही आपल्याला? मग कळते कि हे पिक्चर केवळ पिक्चर नाहीत. माझ्या बालपणाच्या मैत्रीच्या विणकामातला हा एक चिवट धागा आहे. बालपण..ज्यावेळी मनाला कोवळीक होती. मनमोकळेपणाने भांडायची, चिडायची, चिडवायची, रडायची, ओरडायची परवानगी होती. भाबडेपणाने वागायची मुभा होती. एकमेकांवरती मनमुक्त विश्वास होता. कुण्णा कुण्णाला सांगायची नाहीत अशी गुपिते होती. वयात येतानाचा संभ्रम होता. आता बालपणीचे मित्र मैत्रिणी दूर गेले आहेत. काहींची एका शहरात असून वर्षानुवर्षे भेट होत नाही. मग जेव्हा त्यांच्याबरोबर पाहिलेले पिक्चर पहाते तेव्हा आठवतो त्यांचा सहवास. कोणता पिक्चर आणायचा ह्याबद्दल वाद विवाद आणि मग घातलेले गळ्यात गळे. हॉरर पिक्चर पाहताना घट्ट धरून ठेवलेल्या मैत्रिणीच्या हाताची उब. त्या आठवणी जगता येणार असतील तर ते तद्दन मसालापट हि मी परत एकदा पाहायला तयार आहे!

  • सौ. चैताली विनय पोतदार

तुम्ही सर्वप्रथम नघाबरता कोणता भुताचा सिनेमा पहिला होता कमेंट्स करून नक्की कळवा..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular