माझा आजा-आजी त्यांच्या पाच मुलांसह करमाळा तालुक्यातील (जिल्हा-सोलापूर) साडे गावात एका पडक्या घरात रहात होते, पण गरिबीतही त्यांनी मस्त मजेत संसार केला ना! त्यानंतर माझे आईवडील वरळी बी.डी.डी. चाळीतील १२० चौ. फुटाच्या छोट्या खोलीत आम्हा चार भावंडासह रहात होते, पण त्यांनीही गरिबीत मस्त मजेत संसार केलाच ना! मग मी व माझी बायको माझ्या एकुलत्या एक मुलीसह डोंबिवलीत पत्र्याच्या चाळीत भाड्याने राहिलो (हल्ली कुठे ३० वर्षाच्या जुन्या इमारतीमधील वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतोय) पण वकिलीत एवढा कमी पैसा मिळत होता की घर चालवणे कठीण, पण तरीही आम्ही पण गरिबीत मस्त मजेत संसार केलाच ना! याचा अर्थ काय तर गरिबीतही सुखा समाधानाने, आनंदाने राहता येते व कसलीही आध्यात्मिक ध्यानधारणा न करता जीवनात शांतीही मिळवता येते. मग माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्रास कशाचा व कशामुळे होतोय? मी नीट विचार केला तेंव्हा कळले की, माझ्या कानांवर व डोळ्यांवर पडणाऱ्या माध्यमातील बातम्या ज्यांच्याशी माझा जराही प्रत्यक्ष संबंध नाही व अप्रत्यक्ष संबंध असला तरी माझ्या मनावर परिणाम करून घेण्याइतका तो संबंध मोठा नाही, या बातम्यांमुळेच मी माझा आनंद, माझी शांती हरवून बसलोय. या बातम्यांकडेच जर मी दुर्लक्ष केले तर? काय होणार आहे होऊन होऊन असे दुर्लक्ष केले तर? जे मोठे लोक या बातम्यांची जागा व्यापून म्हणा किंवा अडवून म्हणा राहिले आहेत त्यांच्यापैकी कोणी तरी मला विचारत असते का? मी त्यांच्या जरा तरी खिजगणतीत आहे का? त्यांचे संपूर्ण विश्वच वेगळे आहे. त्यांची पदे मोठी, त्यांचा पैसा मोठा इतकेच नव्हे तर त्यांचे संरक्षण मोठे, वसूली मोठी, लफडी मोठी! अशा या मोठ्या विश्वाच्या बातम्याही तशाच भव्य दिव्य, मोठ्या असतात. आरोप प्रत्यारोपांचा धुरळा तिथे रोजच उडत असतो व तो धुरळा नाका, तोंडात गेल्यानंतरही रूबाबात जगण्याची त्यांची ताकदही मोठी! मी लहानपणापासून या मोठ्या लोकांची कितीतरी लफडी वृत्तपत्रातील बातम्यांतून वाचली व टी. व्ही. तून बघितली. त्यावेळी मला एवढा त्रास झाला नाही. मग आताच मला त्यांचा एवढा त्रास का होतोय? भूतकाळातील त्या मोठ्या लफड्यांचे काय झाले? सगळे थंड झाले ना पुढे! आजच्या मोठ्या लफड्यांचेही पुढे तेच होणार ना! मग मी कशाला उगाच जिवाला घोर लावून घेतोय या मोठ्या लफड्यांचा? मागे ती मोठी लफडी आजूबाजूला चालू असताना मी उगाचच भांबावून गेलो होतो याच कल्पनेने की जणू काही ती मोठी लफडी मीच केली आहेत. या चमकदार विश्वात आता दुसरी मोठी लफडी सुरू आहेत. त्यांच्या बातम्या मी चवीने का बरे बघतोय, ऐकतोय, वाचतोय? एवढेच नाही तर फेसबुक सारख्या समाज माध्यमातून मी त्यावर अधूनमधून तावातावाने का बरे व्यक्त होत आहे? उगाच या मोठ्या लोकांची झंझट मागे लावून घ्यायची आहे काय? आणि कशासाठी? या करोना लॉकडाऊनमध्ये बायकोचे मंगळसूत्र मोडावे लागले, जी काही थोडीफार कमाई होती ती पण सद्या ठप्प झालीय, बायकोला अजून गोवा फिरवून दाखवायची ऐपत नाही आणि या मोठ्या विश्वातील मोठ्या लोकांच्या मोठ्या लफड्यांच्या मोठ्या बातम्या मी चवीने बघतोय, ऐकतोय आणि वाचतोयही! आणि वर पुन्हा त्या बातम्यांवर समाज माध्यमातून व्यक्त होण्याचे बिनपैशाचे धाडसही करतोय! खरंच धिक्कार असो माझा! अरे कोण विचारतोय मला मोठ्यांच्या चमकदार विश्वात? व समजा चुकून त्या विश्वातील कोणत्या तरी मोठ्या लफडेबाज माणसाने मला विचारले तर हिंमत आहे का माझी तसली मोठी लफडी करायची? मग कशाला मी ते अनावश्यक ओझे डोक्यावर घेऊन स्वतःला त्रास करून घेतोय आणि त्या लफड्यांवर समाजमाध्यमातून तावातावाने व्यक्त होतोय? माझ्या आजा-आजीस, माझ्या आई-वडिलास त्यांच्या काळातील मोठ्या लफड्यांकडे दुर्लक्ष करीत सुखासमाधानाने, आनंदाने जगता आले, मग मलाही तसे जगता आलेच पाहिजे!
- ॲड.बी.एस.मोरे©
मुख्यसंपादक