नाही रे मित्रा – मी आज जो काही इथे उभा आहे ना ते माझ्या आई-वडिलांच्या मेहनती मूळे, आणि त्यांच्या जिद्दीमुळे…..
हो मी मान्य करतो पण तू हे मिळवलेले वैभव आज तुझ्या मेहनतीने उभं राहिलेले आहे, हे का विसरतोयस तू …?
हो विसरतोय कारण माझ्या आई-वडिलांनी मी लहान असल्यापासून ज्या कळा सोसल्यायत ना, त्या मी जवळून पाहायचो…
म्हणून म्हणतोय, मी जो काही आज उभा राहिलो आहे तो आई-वडिलांच्या मेहनतीमुळेच……
मयूर पाटील – एक नावाजलेले शास्त्रज्ञ, भारतासाहित इतर अनेक देशांतही त्यांना खूप मोठा मान होता.
आकाश गंगेतील अनेक शोध त्यांनी आपल्या एकट्याच्या, हो एकट्याच्याच हाताने लावले होते, मग तो एखादा नवीन तारा असो किंवा आकाशात निर्माण झालेली एखादी उल्का.
साथीला अगदी कोणी नव्हतं, आणि आज जगभर नाव पसरलेलं असताना आपल्या जिवलग अशा मित्राबरोबर गप्पा मारत असताना त्यांना आलेली आई-वडिलांच्या आठवणीने आज गहिवरून आले होते.
मित्र कोण होते –
निशीकांत कांबळे – एक शास्त्रज्ञ तर होतेच, शिवाय आज मयूर पाटील ज्यांच्या खांद्याला खांदा लावून मोठे झाले आणि ज्यांना आपल्या गुरुस्थानी मयूर पाटील मानतात, असे होते, निशिकांत कांबळे.
जा पोरा मोठा हो, खूप नाव कमव, खूप मोठा हो, आमची काळजी करू नकोस, आम्ही सुखात राहू, आनंदात राहू, तू तिकडे तुझी काळजी घे…..हा पण, पोचलास की पत्र पाठवायला मात्र विसरू नको….
ये परत माघारी, पण एक मोठा माणूस होऊन परत ये….
आम्हाला खूप मोठा झालेला तुला पाहायचंय रे पोरा…..
आपल्या मुलाला गाडीतून जाताना निरोप द्यायला आलेले,
आपल्या मुलाच्या काळजीने गहिवरून येऊन, डोळ्यांतले अश्रू घशाखाली गिळत मयुरचे आई-बाबा त्याला निरोप देत होते.
मयूर गाडीत बसला आणि आई – बाबा मागे मागे जाताना तो भरल्या डोळ्यांनी पाहत होता.
आज जो काही मी चाललो आहे ते फक्त नि फक्त या दोन माऊलींमुळेच हे त्यालाही कळत होते.
मयूर गाडीतुन विमानतळ ला आला, कधीही न पाहिलेलं विमानतळ आणि त्याची रोषणाई डोळ्यांत भरण्यासारखी होती,
तिकीट दाखवून चेक-इन केलं.
आज विमानाला थोडा उशीर होणार आहे, हे त्याला तिथे झालेल्या अनाउंसमेंट मुळे कळले, थोडा वेळ इथेच बसू असा विचार करून तो बसला.
जवळ असलेले पुस्तक वाचू लागला, परंतु त्याचे मन पुस्तकात लागतच नव्हते, पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करू लागला, पण काही उपयोग नाही, त्याला फक्त निरोप देतानाचा, आई-बाबांचा चेहराच आठवत होता.
उठावं आणि सरळ घर गाठावं, असे विचार त्याच्या मनात येऊ लागले, उठून पाच-सहा पाऊले चाललाही पण त्याला त्या दोन माऊलींच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा दिसू लागल्या.
त्याला सगळं आठवू लागलं….
शेती ….
भरपूर शेती असलेले संपूर्ण गावात एकमेव घर म्हणजे, मयूर पाटील यांचे, सर्वांचा लाडका आणि एकुलता एक.
त्यातच त्याचा बोलका आणि मनमिळावू स्वभाव असल्यामुळे मयुरला सहज कोणीही ओळखत असे, लहापणापासून तो गावात एक हुशार मुलगा म्हणून फेमस होता.
शेती भरपूर असल्यामुळे आई आणि बाबा दिवसभर शेतातच काम करत असत. त्यांच्याबरोबर हाही चिमुकला हातात कोयता घेऊन काही न काही काम करायचा पण स्वतःचा शाळेचा अभ्यास करूनच.
एक दिवस अभ्यास करत असताना आईने जेवायला हाक मारली, मयूर आणि बाबा जेवायला गेले, ताटावर बसले, आणि आईने भाकरी वाढण्यासाठी आपला हात पुढे केला तर, तो लहानगा मयूर किंचाळलाच…..
बाबांनी त्याला सावरले आणि म्हणाले, पोरा आपली शेताची कामं आहेत, आपल्यालाच करावी लागतात, मग अस कुठेतरी कधीतरी हाता-पायाला जखम होणारच रे, त्यात काय एवढं….
आईने त्याला कुशीत जवळ ओढून घेतले……
म्हणाली – बघ बाळा, बाबा बोलतायत ते काही चुकीचं नाहिय, आपणच आपल्या शेतात नाही राबलो तर खायला कुठून मिळेल, तू खूप अभ्यास कर, खूप शिक मग आपण आनंदात राहू, हं…..
हेच आईने बोललेले शब्द मयुरच्या मनावर सारखे थैमान घालत होते…..
आपण खूप शिकायचं, चांगला अभ्यास करायचा आणि आई बाबांना एक दिवस नक्की सुखी करायचं…..
मयूर जेवण करून बाहेर अंगणात येऊन बसला होता….
समोर चांदण्यांच्या उजेडात केसरं आलेले शेत अगदी सोन्यासारखे भासत होते, अर्धा चंद्र त्यात अजूनच आपल्या प्रकाशाने त्या पिकलेल्या धान ची शोभा वाढवीत होता, कौतुक करत होता….
ये बाळा, तिथं काय रात्रीचं अंधारात बसून करतोयस रे,
काय चंद्र काढून आणायचा विचार आहे की काय तुझा,
चल घरात, की इथेच बसतोयस चांदण्या मोजत…
आई बघ एक दिवस नक्कीच मी चांदण्या मोजेन…..
आणि त्या चंद्रालाही सांगेन, बघ नेहमी तू आमच्या जवळ यायचास, आज मी तुझ्याजवळ आलोय……
चल बाबा घरात चल, काहीतरी बडबडू नकोस….
मयूर जाऊन अंथरुणावर असाच पडून होता…..
अंथरून कसलं ते म्हणायचं…..
मातीच घर, शेतातच होतं, भलं मोठं अंगण, अंगणातून वर बघितलं की घराचा माळा त्रिकोणी आकारात दिसायचा. अंगणातूनच घरात जायला पायऱ्या होत्या, पायऱ्या चढून गेलं की, भली मोठी एक पडवी.
त्याच पडवीला लागून समोरच ओटी, त्याच्या डाव्या बाजूला एक पडवी याच पडवितुन चुलीच्या खोलीत जाता येत असे, याच पडवीच्या डाव्या हाताला वाडयात जायला दरवाजा होता, बारा ते पंधरा गुरं मावतील एवढा मोठा वाडा होता, वाड्याच्या बाहेर संपूर्ण शेतच शेत.
आणि तशीच ओटीच्या उजव्याबाजूलाही एक पडवी होती पण ओटी आणि ही खोली यांच्या मध्ये एक देवघर होतं, त्याच देवघरातून माळ्यावर जायला एक शिडी कायमची लावलेली असायची. ओटीवरूनच चुलीच्या खोलीत जायला दरवाजा होता.
आणि मयूर झोपला होता ओटीवर…
एक चादर आणि डोक्याखाली दुसरी चादर…..
पडून विचार करत होता….
आपण खूप शिकून कोणीतरी मोठा माणूस बनायचं, आणि सगळं बदलवून टाकायचं……
हळू हळू मयूर मोठा होत होता, आपल्या स्वभावामुळे आणि अभ्यासात हुशार असल्यामुळे संपूर्ण गाव त्याला चांगलंच ओळखू लागलं होतं….
दहावीला असताना शाळेत एक स्पर्धा घेतली गेली, “आकाश गंगा” असे त्या स्पर्धेचे नाव ठेवले होते…..
आकाश गंगेची माहिती पुस्तिका बनवायची होती….
मग काय आपला आवडता विषय मिळाला म्हणून मयूर धावतच घरी आला आणि सगळं पुस्तक चालून काढलं, आणि कोणाकडून काय माहिती मिळते का बघितली, ती माहिती गोळा केली, आपल्या सुंदर अक्षरांत लिहिली, आणि एक सुंदर अशी पुस्तिका तयार केली.
पुस्तिकेवर छान असं “आकाश गंगेचं” चित्र काढलं आणि शाळेत वेळेआधीच नेऊन शिक्षकांकडे दिली…..
सर्व शाळेला माहीत होतं, पहिला येणार तर मयुरच आणि झालंही तसंच…..
शाळेत निकालाचा दिवस उजाडला आणि तिसऱ्या विजेत्यांचे नाव पुकारलं गेलं – रमेश सोनावणे
दुसऱ्या विजेत्याचे नाव आहे – पंकज मटकर
आणि पहीला नंबर आलेला आहे – अत्यंत हुशार, असा आपल्या शाळेचा लाडका….
सर्व मुलं नाव पुकारायची वाट न बघताच आरडा ओरड करत मयूर ला उचलून स्टेजवर घेऊन आली सुद्धा ….
शिक्षक मुलांचा उत्साह पाहून अवाक झाले….
आज खरंच मयुरने स्पर्धा पहिल्या नंबरने जिंकली होती…
सर्वात उत्कृष्ट असा पुरस्कार आज त्याला मिळाला होता….
मयूर पुरस्कार घेऊन स्टेजवर उभ्या असलेल्या आपल्या शिक्षकांच्या पाया पडला, कारण आज जरी आई वडिलांच्या कष्टाने त्याने पुरस्कार मिळवला असला तरीही आपल्या या बक्षिसाच्या मागे आपल्या वर्ग-शिक्षकांचाही तितकाच मौल्यवान हात होता.
माने सरांनी त्याला मिठीच मारली….
आणि मयूर धावला तो सरळ आई बाबा बसले होते तिथे, वाकून नमस्कार करत म्हणाला आई बाबा सुरवात झाली….
आई बाबांना काहीच कळले नाही….
हसत हसत दोघांनीही आपल्या पोराला छातीला धरून कवटाळले…..
रात्र झाली पुन्हा ताऱ्याकडे बघत मयूर म्हणाला -हे चांदोबा मामा आज मी जिंकलो, अजून खूप काही काबीज करायचे आहे, एक दिवस मी नक्कीच तुझ्या भेटीला येईन…..
त्या दिवसापासून मयुरने कधीच मागे वळून पाहिले नाही…..
साहेब …..साहेब…..
आपल्या विमानाची वेळ झाली आहे, कुठे हरवला होतात…
हेच…हेच होते, पुढे जाऊन मयुरला अंतराळात घेऊन जाणारे “निशिकांत कांबळे”…..
आई बाबांचा चेहरा सारखा त्याला विमानात बसल्यावर आठवू लागला, …..
आज मयूर परत गावात येणार होता, आई बाबा आता थकले होते, तरीही त्याची वाट बघत ते दोघे स्टँड वर थांबले होते……आणि त्यांच्या सोबतीला अख्खा गावही जमला होता…
इतक्यात एक चार चाकी दोघांच्या काही अंतरावर येऊन थांबली, कोणीतरी पुढच्या दरवाज्यातून बाहेर आला, गाडीचा मागचा दरवाजा त्याने उघडला आणि गाडीतून सूट बूट घातलेला एक माणूस उतरला….
तो मयूर होता !…..हो तो मयुरच आहे, गावाच्या गळक्यातून कोणीतरी ओरडले….
आणि तो माणूस त्या दोघांकडे धावला…..
आई…..बाबा….
दोघेही गहिवरले….
मयुरच्या आई बाबांच्या डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहत होते… पण हे पाट आनंदाचे होते, मयूरच्या आई बाबांनी त्याला मोठे करण्यात जे घेतलेले कष्ट होते, त्या कष्टाचे होते……
तीन जीव एकमेकांना बिलगले होते….
आणि मयूर म्हणत होता…….
आई बाबा मी परत आलो……
आता कसली काळजी करू नका, आपण आता आनंदातच राहूया…..
तोंडावर सुरकुत्या आलेले दोघेही त्याचे आई बाबा, त्याच्या तोंडावरून आपले थरथरते हात फिरवत त्याच्या मिठीत विरून गेले…….
आपले आयुष्य सार्थकी झाले गं….
होय आपल्या बाळाने आपले दोघांचेही नाव जगात उंचावले आहे….
आणि मयूर अगदी लहान पोरा सारखा रडत होता, आपल्या आई बाबांना मिठीत घेऊन…….
आई बाबांच्या कष्टाने मोठा झालेला जगातील एक असा शास्त्रज्ञ जो जगात नाव कमवून बसला, तो आज आपल्याच माऊलींच्या पायावर नतमस्तक होऊन आपले अश्रू त्यांच्या पायावर एखाद्या मनमोहक सुगंधित फुलांसारखे वाहवत होता……
आपल्या आई आणि बाबांचे पाय धरून……!!
- विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक