Homeमुक्त- व्यासपीठवाचन संस्कृती जपायला हवी …

वाचन संस्कृती जपायला हवी …

वाचन म्हटलं किंवा वाचन संस्कृती म्हटलं की डोळ्यासमोर पुस्तकाचे चित्र उभे राहते, असे का ? तर आपण शाळेत असल्यापासून काही न काही वाचूनच शिकत आलेलो आहोत आणि म्हणूनच हे पुस्तकाचं चित्र डोळ्यांसमोर येतं.

आज सर्वांचे जीवन हे खूप धकाधकीचे आणि धावपळीचे झालेले आहे, सकाळी कामासाठी घरातून निघून गेलेली व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही वाचण्यास किंवा पुस्तकांकडे पाहण्यासही वेळ मिळत नसतो.
घरात असलेल्या आपल्याच माणसांशीही आपल्याला दोन शब्द बोलायला वेळ मिळेनासा झालेला आहे, तर वाचन करणे हे दूरच राहिले; प्रत्येकजण आपल्याच कामात मग्न होऊन, येणारे दिवस जणू ढकलतच जीवन जगत असतात, आजची परिस्थिती पाहता हेच दिसून येत आहे.

परंतु वाचन हेही तितकेच महत्वाचे आहे, जीवनात घडणाऱ्या गोष्टींकडे थोडासा कटाक्ष टाकला तर समजून येईल की प्रत्येकाच्या जीवनावर एक पुस्तक तरी नक्कीच तयार होईल.

लहान असल्यापासूनच जर मुलांना वाचनाची आवड निर्माण करून दिली तर पुढे हीच मुलं मोठी झाल्यावर स्वतःचे लेख तयार करून एक उत्तम लेखक बनू शकतात. मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तकं आणून दिली तर, नक्कीच त्यांना वाचनाची गोडी लागेल, त्यांच्या मनावर आणि त्यांच्या जीवनावर याचा चांगला परिणाम नक्कीच होऊ शकतो.
वाचनाने मुलांची बुद्धी तल्लख होऊन विचारक्षमता आणखीनच वाढण्यास मदत होऊ शकते, संभाषण वृत्ती सुधारेल, शब्द संगती स्वतःच तयार करतील हे सुखमय परिणाम वाचनामुळे होऊ शकतात आणि होतीलच.
मोठ्या माणसांशी बोलताना कसे बोलावे, त्यांचा आदर कसा राखावा हे वाचनातूनही त्यांना कळेल, जरी हे, मुलांना आई-वडिलांनी शिकवले आणि मुलं शिकली तरीही समाजात वावरताना त्यांना एक स्वतःची चांगली ओळख या पुस्तक वाचनातूनच मिळू शकते.
बोलताना शब्द उच्चारण्याची लकब, पद्धत, नवीन शब्दांची ओळख, वाक्यांतील स्पष्टपणा, या गोष्टी वाचनातून मुलांना नक्कीच मिळतील.

आज ठिकठिकाणी, शहरांत, गावांत वाचनालये खूप झालेली आहेत परंतु त्याच वाचनालयात काही ठिकाणी पुस्तकेच उपलब्ध नसतात, जरी असली तरी फक्त वर्तमानपत्र आणि काही मासिकं इतकंच असतं, मग एखादा वाचक जर तिथे आला तर त्याला पुस्तकंच दिसली नाहीत तर तो पुन्हा त्या वाचनालयात येणार आहे का ? नाही.
म्हणून त्या-त्या वाचनालयात पुस्तकेही असणे आणि ठेवणे गरजेचे आहे.

काही दिवसांपूर्वी एका समूहात मला एक जाहिरात दिसली, “वाचनालयात माणसे हवी आहेत, कामासाठी नव्हे, वाचन करण्यासाठी”
लिहिणाऱ्याने लिहिले होते “मनात आले म्हणून” म्हणजेच लिहिणाऱ्याच्या मनात, वाचनालय असूनही वाचक नाही अशी खंत आलीच असणार, साहजिकच आहे आज हीच परिस्थिती आहे.

एखाद्याच्या आयुष्यावरचे आत्मचरित्र वाचावे, म्हणजे आपल्यालाही कळते की, त्याच्या जीवनात किती संकटे आली होती आणि त्याने त्या संकटांवर कशी मात करून त्याने आपले जीवन सफल बनवले.
यातून खूप काही शिकता येईल, आपल्या जीवनात घडत असलेल्या लहान मोठ्या बाबींवर आपण खूप दुःख सहन केलंय असं आपल्याला नेहमीच वाटत असते, पण असे आत्मचरित्र वाचल्यावर कळते, आपल्यापेक्षाही भयंकर संकटे तर, यांच्या जीवनात आली आहेत, असे असूनही ही माणसे सुखात आहेत,
कसं ?
याचं उत्तरही आपल्याला त्याच पुस्तकातून मिळू शकते.

वाचनाने कित्येक लोकं वाईट विचारातून बाहेर येऊन आपले जीवन आनंदाने आजही व्यतीत करत आहेत.
इतका बदल वाचनाने प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ शकतो.
वाचन करत असतानाच आपल्यालाही कधीतरी काहीतरी लिहावंसं वाटलंच तर आवर्जून लिहावं, लोकांना आवडेल न आवडेल याचं गणित न मांडत बसता लिहिलेलं लोकांपर्यंत पोहचू द्यावं, मग वाचकच ठरवतील आपले लिखाण त्यांच्या पसंतीस उतरले आहे की नाही.

पुस्तके खरोखरंच आपल्याला जीवनाचे गणित शिकवत असतात, कसे वागावे, काय बोलावे, कसे बोलावे, हे वाचनातूनच निर्माण होत असते.
पण नुसतं वरवरचं वाचन नको, ते आवडीने आणि गोडीने वाचले पाहिजे, या पुस्तकातून मला काहीतरी शिकायचे आहे, काहीतरी घ्यायचे आहे, मला माझ्या आयुष्यात त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, असे गृहीत धरूनच वाचावे, जीवन नक्कीच आनंदी होईल.
खरंतर वेळ हा कोणाकडेच नसतो आणि कोणासाठी थांबतही नसतो, मग वाचनासाठी तरी कसा मिळेल, पण खरंच वाचनासाठी आपण आत्ताच वेळ दिला तर आपले जीवनही समृद्ध होऊ शकेल.
कितीतरी उदाहणे देता येतील ज्यांचे आयुष्य पुस्तकांनी बदलून टाकलंय तर काहींचे जीवन पुस्तकांनीच घडलंय.
आपण वाचन केले तर आपल्याच ज्ञानात भर पडणार आहे, याच ज्ञानातून समाजातही आपल्यालाच मान सन्मान मिळण्यास मदत होईल.

मी स्वतः खूप वाचन करतो, मोबाईलमध्ये कितीतरी पुस्तकांचा साठा आहे, वाचत बसतो.
वेळ मिळेल तेव्हा नाही, वेळ काढून वाचतो, घरी एक कपाट आहे पुस्तकांचा.
माझ्या जीवनावरही खूप मोठा प्रभाव या पुस्तकांमुळे पडलेला आहे. खूप वाचन करत असल्यामुळे मलाही लिहावंसं वाटलं, मग मीही लिहायला लागलो, आधी छोटे छोटे कोट्स लिहीत असताना कविता लिहू लागलो.
बुद्धी आणि मन प्रगल्भ झालं ना, मग आपल्याला काही न काही सुचत जातं तसंच झालं आणि मी कथा लिहू लागलो.
काही कथा माझ्याच जीवनावर आहेत आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी लिहून काढाव्याश्या वाटल्या, लिहिल्या, आणि वाचकांना आवडल्याही, यातूनच काल्पनिक कथा लिहू लागलो, लिहिल्या, त्याही वाचकांना आवडू लागल्या, पुढे कथा मालिका तयार करू लागलो, लिहिल्या, याही वाचकांना आवडल्या, एक भाग वाचून झाला की वाचक म्हणतात
“पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे” हीच पोचपावती असते आपल्या लिखाणाची.
एखादा विषय घेऊन नेहमीच मी लेख लिहीत असतो,- जसा हा आजचा लेख आहे.

पहा वाचनाने किती फरक आणि बदल आपल्या जीवनात घडू शकतो, म्हणूनच आपली वाचन संस्कृती आपणच जपायला हवी, त्याची गोडी चाखायला हवी…

✍️ विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )

लेख आवडल्यास प्रसारित करणयास माझी हरकत नाही

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular