व्हॅलेंटाईन डे ! ललित लेख…
तुम्ही दोघी आज असता तर !
१४ फेब्रुवारी २०२२.
आई,आजी आता तुम्ही दोघीही
आमच्यात नाही.
हे अतिव दु:ख सहन करण्यापलीकडले तरीही…
तुमचे तेव्हाचे सगळेच विचार ,
लक्षात आहेत अजून…
आत्ता मी दहा कार्यशाळा केल्या,
कितीही पैसे भरून तरीही…
जे शिकता येणार नाही.
ते सगळंच तर शिकवून गेलात तुम्ही, माझ्या अजाण वयात.
समृद्ध करुन टाकलंय…
तू म्हणायची शाळेत जा,तर आजी
म्हणायची शिकून काही बदलणार
नाही, बाईच्या जातीला…
तुम्ही आपल्या म्हणण्यावर ठाम
असायच्या.त्यावर तुमचं क्लेरिफिकेशनही भारी असायचं.
मला मग दोघींचंही पटायचं.
पण तरीही मी कायमच कन्फ्युज,
चांदोबा तील विक्रम-वेताळच्या
गोष्टीतील वेताळाच्या प्रश्नांनी विक्रमही हतबल झाला नसेल
इतकी.
अलिकडे तर मला रोजच कुटील,
जटील प्रश्न पडतात,पण त्याची चपखल उत्तरं काही केल्या सापडत नाही, आणि मग विचार
करुनच डोक्याची शंभर काय हजार शकले माझ्या पायावर पडतील कि काय असे वाटते.
आणि तुम्ही दोघी आज असता तर ! एक मात्रं आहे, तुम्ही तेव्हा मला ऐकवलेल्या अनेक गोष्टींपैकी
तू सांगितलेल्या वाल्या कोळ्याच्या गोष्टीमुळे मात्र माझा माझ्या लेखणीच्या विश्वास कधीच
ढळला नाही.हा,आता रामायण लिहीन असं नाही,पण तळागाळातील जो माणूस लढा देवू शकत नाही,त्याचं दुःख मांड
हे तुझे शब्द अजून कानात घुमतात,माझे लेखन तुम्हा दोघींमुळे आहे,हे लक्षात आहेच.
आज तुम्ही असता तर,माझं नाटक नुसतं एकदा जरी रंगमंचावर सादर झालेलं पाहिलं असतं तर गावभर दवंडी पिटली असतीत,कि आमच्या चडवान नाटक लिल्यान,बायलमानूस आसान !
आई गं, एकदा मात्रं म्हणाली होतीस,जे मी कधीच विसरू शकत नाही.
बाय माजे! याक आयकच माजा…
तू ह्या नाटकाच्या वाटेक जावंच नको.आणी माझ्या काळजात एक ओरखडा उठलाच होता तेव्हा.पण आपली ऐकत राहिले..
तुझा नाटक ह्या झिलग्यांका पचाचाच नाय.बायलमानूस काय नाटक लितंला,ह्या एकाच सबबीर
ते तुका खोडून काडतले.
इतकी वर्षा आमी काय वगीच रांधा,वाढा, उष्टी काढा,केला ? हा,थयसर तेंचो विरोध नसता,ही कामा बायलमानसांचीच असा तेंच्या टाळक्यात बर्यापैकी भरलंला आसा.मगे आमची आवस काय रांधता? आमची बायल काय रांधता?अशी वाहव्वा
सुदा करतंत ते ! मगे आमीय चुलीवर पानी मारून सगळीच धग विझवन टाकतो…
सोशीकतेचो आव हाडून…
तू मात्रं चूल विजव नको.विचारांची…कारण तुझी पहिली पावलंच दशावतार पहाण्यासाठीच पडलेली आम्ही बघलीत गो !
खरंच सांगते,आई,आजी त्यावेळी
या गुलाबाच्या दिवसांची गोष्टंच
ऐकिवात नव्हती गं ! नाही तर तुम्ही दोघीच होत्या ना माझ्यासाठी व्हॅलेंटाईन द ग्रेट !
आज तुम्ही दोघी असता तर मीही
परत एकदा लहान होवून तुम्हाला
महागडा गुलाब देऊन साजरा केलाच असता “व्हॅलेंटाईन डे”!
- स्नेहा राणे-बेहेरे, ठाणे/वेंगुर्ला.
मुख्यसंपादक