Homeवैशिष्ट्येशिवकालीन ऐतिहासिक मालिका . झुंज -: भाग १४

शिवकालीन ऐतिहासिक मालिका . झुंज -: भाग १४

झुंज : भाग १४ –

दिवस उजाडला. खानाचा तोफखाना सिद्ध झाला. इकडे गडावर देखील किल्लेदाराने सगळ्यांना जमवून योग्य त्या सूचना दिल्या.

परत एकदा तोफा धडाडल्या. यावेळेस त्यांचा आवाज आधीच्या तोफांपेक्षा जास्त होता. तोफेच्या तोंडून बाहेर पडलेला गोळा बुरुजाच्या पायथ्याशी पडला आणि किल्लेदाराचे धाबे दणाणले. यावेळीही तोफगोळे बुरुजापर्यंत पोहोचणार नाही असेच किल्लेदार समजून होता पण या पहिल्याच तोफगोळ्याने त्याला वास्तवात आणले. त्याला काही समजायच्या आतच दुसरा गोळा बुरुजाला येऊन धडकला. जबरदस्त मोठा आवाज झाला आणि किल्लेदाराने सावधगिरी म्हणून किल्ल्याच्या तटाजवळ असलेल्या बायकामुलांना सुरक्षितजागी नेण्याचा हुकुम केला.

वेळ खरंचच आणीबाणीची होती. तटाजवळ थांबणे धोकादायक होते. पण तिथून बाजूला होणे त्यापेक्षाही धोकादायक ठरणार होते. काहीही करून खानाच्या तोफखान्याला निर्बंधित करणे गरजेचे होते. पण कसे? उत्तर एकच… प्रतिहल्ला…

“तुका…” किल्लेदारानं आवाज दिला.

“जी किल्लेदार…” तुका काहीसा पळतच किल्लेदाराजवळ हजर झाला.

“पुन्यांदा तुजी तोप वापरायची हाय आपल्याला…” किल्लेदाराने सांगितले आणि गडावर लगबग सुरु झाली. तुकाने बनविलेल्या दोन्ही तोफा दोन बाजूला ठेवण्यात आल्या. त्यातील एका तोफेच्या चामडी भागात तोफगोळा ठेवण्यात आला आणि काही वेळातच तो तोफेतून सुटला. हा गोळा खानाच्या तोफखान्याच्या काही अंतर समोर पडला आणि त्याचा स्फोट झाला. गोळ्याचे तुकडे इतस्ततः विखुरले गेले. कित्येक तुकड्यांनी बंदुकीच्या गोळीप्रमाणे आपले काम चोख बजावले. समोर असलेले अनेक जण जखमी झाले. काही वेळासाठी खानाची तोफ थंडावली. हा किल्लेदारासाठी शुभशकून होता.

“भले शाब्बास…” किल्लेदाराचा उत्साह दुणावला. किल्लेदाराच्या शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे गडावरील सैन्यात देखील उत्साह आला.

इकडे मात्र तोफखान्याच्या समोरच तोफगोळा पडल्याचे पाहून खान पूर्णतः संतापला.

“या अल्ला… इन मरहट्टोके पास तोपे कहांसे आयी? मैने तो सुना था, इस किलेपर एक भी तोप नही है?” त्याने त्याच्या अधिकाऱ्याला विचारले.

“हुजूर… जितना पता चला है… उपर एक भी तोप नही है…” त्याने घाबरत घाबरत उत्तर दिले.

“तो? ये जो गोला किलेपरसे आया है वो क्या किसीने हाथसे फेका है?” खानाने संतापून विचारले.

“-“ काय बोलावे हे न समजल्याने तो अधिकारी मान खाली घालून उभा राहिला.

“बोलो…” खान परत गरजला…

“गुस्ताखी माफ हुजूर…”

खरे तर जी अवस्था अधिकाऱ्याची होती तशीच काहीशी अवस्था खानाचीही होती. काय होते आहे ते त्याला तरी कुठे समजत होते? तेवढ्यात एका घोडेस्वाराने खानाजवळ येवून मुजरा केला.

“हुजूर… अल्ला कि मेहेर हुई है… पीछे की तरफ से किलेकी तटबंदी तुट गयी है…” त्याने खानाला माहिती दिली आणि खानाचा राग कुठल्या कुठे पळाला.

“बहोत बढीया…” म्हणत खानाने घोड्याला टाच मारली आणि तो गडाच्या मागील बाजूस निघाला.

खान आला त्यावेळेस तोफखान्याचा गडावर जोरदार मारा चालू होता. काही वेळापूर्वी गडावरून येणारे तोफगोळे काहीसे थांबले होते. खानाने वर पाहिले त्यावेळेस गडाच्या तटबंदीला खिंडार पडले होते. सैय्यदशा तिखट मारा करत होता.

“सय्यदशा… किलेपर हमला करो…” त्याने उत्साहात सांगितले…

“जी हुजूर…” म्हणत सय्यदशाने जवळपास २ हजार पायदळ बरोबर घेतले आणि गड चढायला सुरुवात केली. गडावरून काहीही प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे त्याचा उत्साह वाढत होता. जवळपास अर्धा गड चढून झाला आणि परत अघटीत घडले. किल्ल्यावरून हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दणाणला. कुणाला काही समजण्यापूर्वीच मोठमोठे दगड खाली घरंगळत आले आणि त्यांनी त्यांचे काय चोखपणे बजावले. हा अनुभव जुन्या सैन्याला असला तरी खानाच्या नवीन सैन्यासाठी पूर्णतः नवा होता. त्यामुळे त्यांच्यात हाहाकार माजला. एकेक जण जायबंदी होऊ लागला आणि मुगल सैन्याला पुढे पाऊल टाकणे दुरापास्त झाले. शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. स्वतः सैय्यदशा देखील अगदी थोडक्यात बचावला होता.

माघारी परतणारे सैन्य पाहून मात्र खानाचा पारा चढला. पण वरून होणारा दगडांचा मारा इतका तिखट होता की स्वतः खानाला देखील माघार घ्यावीच लागली असती.

आतापर्यंत सूर्य अस्ताला गेला होता. थंडीचा कडाका वाढला होता. सैन्य देखील थकले होते त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच गडावर पुन्हा तोफांचा मारा करण्याचे त्याने ठरवले. या वेळेस देखील जवळपास हजार जण निकामी झाले होते.

सकाळ उजाडली तसा तोफखाना तोफगोळ्यांचा मारा करण्यासाठी सज्ज झाला. सैय्यदशा तोफखान्याजवळ पोहोचला. त्याने वर पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. डोके गरगरले. आपण काय पाहतो आहोत त्यावर त्याचा विश्वासच बसेना. तेवढ्यात खानही तिथे आला. त्याचीही गत सैय्यदशा सारखीच होती. ज्या ठिकाणी तटबंदीला खिंडार पडले होते ते रात्रीतून बुजवण्यात आले होते. किल्ल्याची तटबंदी पुन्हा पहिल्या सारखीच दिमाखात उभी होती. त्याला ती आपल्यावर हसते आहे असा भास झाला. आणि त्याच्या मनात आता फक्त एकच विचार घोळत होता… तो म्हणजे… “किल्ल्यावर माणसेच आहेत की भुते ???”

क्रमशः

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular