-दीपक बोरगावे
संतोष पाटील हा आंबे वडगाव (तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव) या एका छोट्या गावात एक अल्पभूधारक तरुण शेतकरी म्हणून शेतात राबतो आहे; शेतात काम करतो आहे.
बरड मातीची जमीन. सिंचनाची कुठलीच व्यवस्था नाही. शेतीला लागणारा खर्च जास्त आणि उत्पन्न त्या मानाने फारच कमी. निव्वळ चरितार्थ चालवण्यापुरती शेतात पिकणारी शेती. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न सण-सणावर सारं काही अवघड आणि जेमतेम. ही खरंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांची प्रातिनिधिकच परिस्थिती आहे. महात्मा फुले यांनी हा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ दीडशे वर्षापूर्वीच आपणांला सांगितला आहे. हा आसूड अर्थातच व्यर्थ जाणारा नाही.
विशेषतः आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान, माननीय पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालखंडात शेतीविषयक धोरण हे निश्चितच प्रागतिक होते. रशियाच्या धर्तीवर पंचवार्षिक योजना त्यांनी राबवली होती. ग्रामीण भागातील खूप इंटेरियर भागात या सर्व गोष्टी तरीही पोचल्याच नाहीत. या सरकारने मोठी धरणे बांधली, कालवे काढले. पण याचा अधिक फायदा प्रस्थापित शेतकऱ्यांनाच झाला. इतक्या महाकाय देशांमध्ये हे सर्व इतक्या कमी काळात साध्य करणे कोणत्याही सरकारला ते केवळ अशक्यच होते. नंतर येणाऱ्या प्रत्येक शासनाचे शेतीकडे दुर्लक्ष होत गेले. महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा एक अपवाद सोडला आणि इतरत्र अजून असे काही सन्माननीय अपवाद सोडले तर बाकी कृषीक्षेत्र हे नेहमी उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेले आहे, यात काही शंका नाही. आज तर शेतकऱ्यांची उपेक्षांच्या आणि दुर्दशांच्या कक्षा वाढतच चालल्या आहेत.
याचा संताप, क्रोध आणि विद्रोह हा संतोष पाटील सारख्या तरुण शेतकऱ्यांना होत असेल तर यात आश्चर्य काहीच नाही. संतोषच्या शब्दांतून, कवितांमधून हा संताप, क्रोध आणि विद्रोह व्यक्त होतोय, हे साहजिकच म्हटले पाहिजे.
प्रस्तापित कविता आपल्या कवितेकडे दुर्लक्ष करते असे संतोषला वाटते. “माझी कविता जसं मी जगतो आहे तसेच ती कवितेतून येत आहे,” असे एकदा त्याच्या बोलण्यातून आले.
मी त्याला म्हणालो, संतोष, तू भाषेचा आणि प्रस्थापितांचा अजिबात विचार करू नकोस. तुझी कविता तुला जे म्हणायचे आहे, ते बरोबर पकडते. आशय हा अधिक महत्त्वाचा असतो; समीक्षा नाही. भाषा हे त्यातील एक साधन आहे, एक परिणामकारक हत्यार आहे आणि ते तुला तिथेपर्यंत बरोबर घेऊन जाते.
प्रस्थापित नावाची एक भाषा असते; व्यवस्था त्याला पकडून असते. त्यामुळे तू जे लिहित आहेस ते व्यवस्थेला धरून कसे असेल? त्याचा विद्रोह करणारा तुझा हुंकार आहे, आणि तो तसाच असायला पाहिजे ! प्रस्थापित साहित्याच्या साच्यात तुझ्या कवितांना बसवण्याची तुला काही गरज नाही. हे माझे म्हणणे त्याला पटले आहे. म्हणजे तो सुरुवातीपासून असाच लिहितो आहे आणि त्याचा स्वभावही तसाच आहे. उगा अधेमध्ये लेखनातला न्यूनगंड कुणीतरी त्याच्या डोक्यात घातला असणार असा माझा ग्रह आहे. पण त्याच्यावर एका काडी इतकाही काही परिणाम होत नाही / होणारही नाही. शेतातील आणि शेतीतील सर्वच प्रश्न संतोषशी संवाद करत असतात. त्याच्या कवितेचा हाच प्रमुख स्त्रोत आहे.
त्याच्या खालील काही ओळी पहा- फुले, शाहू, आंबेडकर यांची परंपरा घेऊन चालणारा हा कवी आहे.
संतोष असाच लिहित रहा.
तुला खूप खूप शुभेच्छा
- दीपक बोरगावे
•••
|| माझ्या कवितेला ||
माझ्या कवितेला विद्रोहाचे बोल
अन मर्दाची चाल आहे
ना कुठल्या पुस्तकात स्थान
ना व्यासपीठावर सन्मान आहे
दीनदुबळ्या शोषितांची ढाल
रस्त्यावरच्या लढाईतली
नंगी तलवार आहे
समीक्षेत न गुंतता
समस्येतून जन्मली आहे
माझी कविता टाळ्यांसाठी नसून
टाळक्यांसाठी आहे
तिला टाळ्यांचा कडकडाट कशाला
ती दंड थोपटून आली आहे
•••
|| आगे मोहोळ ||
भीमरायांची लेखणी
शिवरायांची तलवार घेऊन आलो
शाहूंची विचारधारा
फुलेंचा आसुड होऊन आलो
मी एकटाच नाही दोस्त हो
दीन ,दुबळ्या, वंचित, शेतकऱ्यांच्या
प्रश्नांचे आगे मोहोळ घेवून आलो
•••
|| देश स्वतंत्र झाला ||
देश स्वतंत्र झाला
आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा केला
गोऱ्यांच्या हातातून
काळ्यांच्या हातात
सत्ता आली
आम्ही प्रजासत्ताकदिन साजरा केला
तीन रंगाचा झेंडा आला
आमच्या छाताडावर रोवून
झेंडा गर्वानं फडकू लागला
आम्ही झेंड्याला सलाम केला
संविधान घटना राष्ट्रगीत प्रतिज्ञा सारं काही ठिक झालं
निवडणुका आल्या
निवडणुका गेल्या
स्वतंत्र देशाचा प्रधान मंत्री झाला
देश आनंदानं नांदू लागला
मात्र,
आमच्या विरोधातील कायदे
व्यवस्था
तशीच ठेवली गेली
राष्ट्र उभारणीच्या कार्यात
मोलाचे योगदान देवून
भाकरीचे झाड लावणारी
आमची जमात
भारत माता की जय म्हणत
न्यायासाठी तिष्टतच राहीली
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.
www.linkmarathi.com
संतोष पाटील
मुख्यसंपादक