Homeसंपादकीयसामाजिक परिवर्तनातील सावित्री- श्रीमती छाया भास्कर मोरे व सौ. अलका अरुण मोरे

सामाजिक परिवर्तनातील सावित्री- श्रीमती छाया भास्कर मोरे व सौ. अलका अरुण मोरे

माणसाला माणूस म्हणून जगता यावे, अशी प्रथा सुरू केली

हेरवाड या गावाने घेतलेल्या ‘विधवा प्रथा बंदी’ ठरावाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये हा ठराव संमत करण्यात आला.
महाराष्ट्र शासनानेही राज्यातील ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदी ठराव मंजूर करून घ्यावा, अशा आशयाचा अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर या अध्यादेशाला महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये चांगला प्रतिसादही मिळाला.

पण… पण पुढे काय???

पुढे अंमलबजावणी कशी करायची? ठरावानुसार काही अंशी विधवा प्रथा कमी होतीलही, पण समाजात विधवेला मिळणारी जाचक वागणूक कमी होणार आहे का ? किंवा तिला इतर स्त्रियांप्रमाणे समाजात सन्मानाने जगता येईल का ? इतर स्त्रियांप्रमाणे तिला सौंदर्य आभूषणे, अलंकार वापरता येतील का ? लोकांचा विधवेकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो बदलेल का ? हे व असे अनेक प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहेत.

महापुरुष जन्माला यावेत, पण आमच्या घरी नकोत, कारण महापुरुष बनण्यासाठी जी दाहकता सहन करावी लागते, त्या दाहकतेची झळ आपल्या घरातील कुणालाच लागू नये. अशी सर्वांची मानसिकता असते.
त्याचप्रमाणे समाजात प्रबोधन व्हावे, समाज सुधारला पाहिजे, समाजात परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते, पण प्रत्यक्षात अशा बदलाची सुरुवात स्वतः पासून कोणीच करत नाही…

अशा परिवर्तनाच्या बीज पेरणीची सुरवात आपल्या घरापासूनच करण्याचे काम सौ. अलका अरुण मोरे यांनी करून दाखवले आहे.

निमित्त होते वटपौर्णिमेचे…

सासरे कै. भास्कर बाबूराव मोरे यांचे २ जुलै २०२१ रोजी कोरोना काळात निधन झाले. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या एका शाखेचे अनेक वर्षे सचिव म्हणून काम पाहिले आहे. कै. भास्कर मोरे यांच्या अनपेक्षित निधनाने घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. काही दिवस गेल्यानंतर घरातील लोक या धक्क्यातून हळूहळू सावरत गेले, पण कै. भास्कर मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती छाया मोरे यांना परंपरेनूसार चालत आलेल्या प्रथा, जसे कपाळावर कुंकू न लावणे, गळ्यात मंगळसूत्र न घालणे, पायात जोडवी न घालणे, सण उत्सव समारंभात उपस्थित न राहणे, अशा अनेक अभद्र प्रथांना सामोरे जावे लागणार होते.
पतीच्या निधनानंतर एखाद्या स्त्रीच्या मनाची अवस्था काय होत असते, हे फक्त तिलाच माहीत… त्यात अशा अभद्र प्रथा तिच्यावर लादण्याने तिचं उरलंसुरलं आयूष्यही निरस व कोरडे होऊन जाते. त्यामुळे अशा धक्क्यातून सावरणे त्यांना कठीण होऊन बसले होते.

लोक रहाटामुळे काही अंशी या प्रथांना स्विकारणे त्यांना भागही होते. पण श्रीमती छाया मोरे यांच्या सुनबाई सौ. अलका या पहिल्यापासूनच माणसाच्या माणूस म्हणून जगण्याच्या आड येणाऱ्या प्रथा आपण का म्हणून पाळायच्या ? व किती दिवस असं रडत कुढत, आश्रितासारखं, लोकं म्हणतील तसंच रहायचं ? या विचाराने चालणाऱ्या आहेत. सौ. अलका यांना त्यांच्या या विचारांना घरातील इतर सदस्यांचाही पुर्ण पाठिंबा होता व आहे.

माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आपण करायच्या. हा विचार त्यांनी आपल्या सासूबाईंमध्ये रूजवला.

वटपौर्णिमे निमित्त सर्व सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी
जात असताना, त्यांनी आपल्या सासुबाईंनाही वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करायला जाण्यासाठी तयारी करायला लावली.

नवऱ्याचं निधन होऊन एक वर्षही पुर्ण झाले नाही आणि ही वटपौर्णिमा साजरी करत आहे, असे म्हणून लोकं नावे ठेवतील किंवा लोक काय म्हणतील, असा विचार करून सासुबाई शांत बसून होत्या, पण सौ. अलका यांनी सासुबाईंना वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात हे समजावून सांगितले व त्यांना आग्रह करत वडाच्या झाडाची पूजा करायला घेऊन गेल्या. फक्त सौभाग्यवती स्त्रियांनीच वडाच्या झाडाची पूजा करण्याच्या पारंपरिक प्रथेला मोडीत काढून माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रथा त्यांनी सुरू केली.

पुर्वापार चालत आलेल्या प्रथा न पाळता, त्या डावलून असा क्रांतिकारी विचार करणे, हे खरंच खूपच धाडसाचं व मनाच्या दृढ निश्चयाचं प्रतिक आहे. लोक काय म्हणतील या विचारांना सामोरे जाण्याचं धाडस व ती कृती त्यांनी आज करून दाखवली.

शेतकरी चळवळींचे गाव म्हणून ‘हणमंत वडीये’ या गावाची ओळख अगोदरपासूनच आहे. या गावात जशी परिवर्तनवादी विचार करणारी लोकं आहेत. तसेच त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्याही पुढे जाऊन परिवर्तनाची बीजाक्षरे खोलवर पेरण्याची हिम्मत असणाऱ्या स्त्रियाही या गावात आहेत. हे सौ. अलका अरुण मोरे यांनी दाखवून दिले आहे.

निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे, अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी.

एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला, की त्याची सहसा तोड होत नाही. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
त्यामुळे फक्त ‘पतीला दिर्घायुष्य मिळावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा’ हा एकच उद्देश ठेवून वडाची पूजा करणे, हे संकूचित विचारांचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे ज्या स्त्रीचा पती हयात आहे, त्याच स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा करावी, या एकाच विचाराने कृती करत राहिल्यास मानसांमध्ये जी मानवता शिल्लक आहे, ती संपून जाईल. त्यामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या आड येणाऱ्या कोणत्याही प्रथा पाळायच्या नाहीत व त्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरातून करायची, असा निर्धार करून, सौ अलका मोरे यांनी वटपौर्णिमे निमित्त आपल्या सासूबाईंना सोबत घेऊन सर्वांसमोर वडाच्या झाडाची पूजा केली व सासुबाईं कडूनही करवून घेतली.

सासुबाई श्रीमती छाया मोरे व सौ. अलका मोरे यांच्या कृतीने इतर स्त्रियांसमोर आदर्श निर्माण घालून दिला आहे. त्यांनी केलेल्या या सामाजिक परिवर्तनाच्या कृतीबद्दल त्यांचे समाजात, गावात कौतुक केले जात आहे.

लेखक व कवी-

सुभाष आनंदा मंडले

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular