आज दिनांक ४ जानेवारी २०२३ अनाथांची माय सिंधूताई सपकाळ माईंच प्रथम पुण्यस्मरण त्या निमित्ताने मी सौ.भाग्यश्री आपेगांवकर त्यांच्या पुण्यस्मरणार्थ माझ्या ३६५ कविता आणि चारोळींचा संग्रह फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या पावन चरणी समर्पित करत आहे.नावाप्रमाणेच उदार,विशाल हृदयाची वात्सल्यमुर्ती होत्या सिंधूताई.
जिचा संघर्ष ऐकूण पाषाणालाही पाझर फुटेल असा त्यांचा भयाण संघर्ष ‘मी वनवासी’ या आत्मचरित्रातून कळला.आणि हृदय पाझरलं डोळ्यात अश्रू तरळले.अन् अंगावर रोमांच उभारले.त्या महान विभूतीबद्दल मला पामराला दोन शब्द लिहिण्याचं अहोभाग्य लाभलं असं मी म्हणेन.
मी माईंबद्दल लिहिलेल्या काही निवडक कविता आणि चारोळ्या देत आहे. –
१- फुलांच्या पायघड्या माहित नव्हत्या तिच्या पायांना
रक्तरंजीत काटेच होते बेचणारे…
शब्द होते पतीचे काळीज कट्यार
घाव ते थरारी कधीही न भरणारे….
२- भूत लागू नये म्हणून अंगारा
लावून झोपतय जग अजून
पण पोटाची आग विझवण्यासाठी खाल्ली तिनं जळत्या प्रेतावर भाकरी भाजून…..
३- अनाथांची वाली होती
भुकेल्यांची झोळी होती
संस्काराचा ज्योती ती
माय माझी लयी साधी भोळी होती…
कविता– संघर्ष
चिमुरडं साडीच्या पदरात बांधून जी हिंडली दारोदार मागत भिक्षा....
आपल्यांनीच केलं हेतं रक्तरंजीत आणि बेघर,नवऱ्याने च दिली होती
तिला भयान शिक्षा….
रक्षिण्या तिस गोमाता म्हणे धावली
काय वात्सल्य तुझे थोर माते
मुक्या जनावराला वाचा फोडलीस…
पोटाची आग विझवण्या जळत्या
प्रेतावर भाकरी भाजली
अनवानी फिरली माय ती
जीवना तुझ्या वाटेवर ती ओक्साबोक्शी रडली….
भूकेल्यांना दिले अन्न तिने
तहानलेल्यांना पाजले पाणी
होती ती फाटकीच पण दिनदुबळ्यांना जागली…
डोईवरचा पदर नाही ढळला कधी
माय माझी शेवटपर्यंत इज्जतीनच वागली….
पुन्हा एकदा माईंच्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांना त्रिवार वंदन करते आणि मी माईंवर लिहिलेला ३६५ कवितांचा संग्रह लवकरच रसिकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न करेन अशी आशा व्यक्त करते.ईश्वर माईंच्या आत्म्यास चिर शांती देवो अशी श्री शिवचरणी प्रार्थना करते.
– सौ.भाग्यश्री आपेगांवकर
रा-आपेगांव
ता-अंबेजोगाई
जि- बिड
मुख्यसंपादक