माणुसकी व व्यवहार या दोन गोष्टी एकमेकांशी चिकटलेल्या आहेत. त्यांना एकमेकांपासून अलग करता येत नाही. निसर्गाच्या जीवन चक्रात माणूस म्हणून जन्म घेतल्यावर माणूस म्हणून जगण्यासाठी माणसांना एकमेकांशी जो नैसर्गिक व सामाजिक देवाणघेवाणीचा व्यवहार करावा लागतो त्यालाच माणुसकीचा व्यवहार म्हणतात. या व्यवहारात सातत्य असेल तरच मानवी संबंध टिकतात नाहीतर ते हळूहळू नष्ट पावतात. माणुसकी ही माणसांनी माणसांशी माणसांसारखे वागून एकमेकांना माणसासारखे जगण्यासाठी मदत करण्याची नैसर्गिक भावना आहे. पण ही मदत म्हणजे दयेची भीक नव्हे तर माणसासारखे जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांची सामाजिक निर्मिती करून योग्य त्या आर्थिक मोबदल्यात त्यांची सामाजिक देवाणघेवाण करण्याची अर्थात माणुसकीच्या व्यवहाराची योग्य ती संधी सर्व माणसांना देणे असा त्याचा अर्थ आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा माणुसकीचा व्यवहार थांबला की आंतरमानवी संबंध संपले. कौटुंबिक जिव्हाळा, जिवलग मैत्री या गोष्टी या व्यावहारिक नियमाला अपवाद असल्या तरी त्या खूप मर्यादित असतात. फेसबुकवर किंवा व्हॉटसॲपवर स्वतःचे ज्ञान फुकटात पाजळणे किंवा इतरांच्या पोस्टस इकडून तिकडे फिरवणे यात माणुसकीचा व्यवहार नसतो. तो मानसिक विरंगुळा (इंग्रजीत टाईम पास) असतो. म्हणून तर फेसबुकवर कोणी जास्त आगाऊपणा केला की त्याला किंवा तिला पटकन ब्लॉक करण्यात मन जराही कचरत नाही. कारण हे संबंध फार प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नसतात व शिवाय त्यात माणुसकीचा आर्थिक व्यवहारही नसतो. म्हणून हे संबंध टिकण्याची शास्वती नसते. गुंतता हृदय हे हा प्रकार समाजमाध्यमावर दुर्मिळ असतो. हृदय तरी का उगाच गुंतून राहील जर माणुसकीचा व्यवहारच तिथे नसेल तर! हे तर कटू सत्यच आहे की समाजमाध्यमावरील गुड मॉर्निंग, गुड नाईट सारखे संदेश हे औपचारिक संदेश असतात. माणूस म्हणून जगण्यासाठी समाजमाध्यमी विरंगुळा (टाईम पास) थोड्या प्रमाणात ठीक असला तरी त्यात व्यवहार नावाची गोष्ट नसल्याने तेवढी जवळीक निर्माण होत नाही. माझ्या आयुष्यात किती माणसे आली आणि गेली. व्यवहार संपला की त्यांचे संबंध संपले. म्हणून व्यवहारात सातत्य ठेवा. कारण व्यवहार संपला की संबंध संपले!
- ॲड.बी.एस.मोरे
मुख्यसंपादक