” श्रीधर”
सकाळी सकाळी कामाचा उरक आवरला पाहिजे म्हणून नुसती सगळ्यांची गडबड असते. अंघोळ ,देवपूजा, आजोबांचा चहा -नाष्टा, नवऱ्याची ऑफिसला जायची घाई, मुलीचं खाणंपिणं मग त्यांची शाळेची तयारी. जरा जरा म्हणून उसंत मिळत नाही ‘बाईई’ या जातीला. कुठे कुठे पुरं पडायचं?त्याच्यात भर कमी की काय म्हणून या वर्षीच एक आजून गावची नवीन जबाबदारी अंगावर आली. गावची म्हणजे “अंबड” ची मी सरपंच झाले.
रोजच्या या कामातून कधी स्वतः कडे बघायला वेळच नाही हो!
पण आजचा दिवस असा कसा सकाळ पासून कोणच गावातील ,गल्लीतील घरी आले नाही म्हणून मीच बाहेरच्या बाजूला आले . पाहते तर काय???? सगळे कुठे एवढ्या सकाळी सकाळी नुसते पळत सुटले आहेत. ऐका मागून एक पाळतोच आहे. अरे कोणी सांगेल काय? का पळताय ? …. अरेच्या! कोणच बोलत नाही . नुसते हात दाखवतात .. पाळतात.
दारातून मीच पुढे झाले आणि बघू तरी लोकं अशी का पळत सुटलेत म्हणून शेजारच्या पारू आज्जीना हाक मारली.” पारू आज्जी काय हो काय झाले ?काय माहीत आहे काय? लोक नुसती पाळतात का? आणि जातात तरी कुठं?
माझा आवाज ऐकून लोहाराचा विनायक मला म्हणाला.” सरपंच बाईई .. श्रीधर .. उठत नाही बघा.”
“का रे ? काय झाले त्याला?”
“काय माहीत नाही बाईई ” परत विनायकने मला हे उत्तर दिले.
कशी तरी पायात चप्पल चढवली, साडीचा पदर कंबरेत गच्च खोवला आणि मी पण अंगात बळ आहे त्या आवेगाने पळत सुटले.
श्रीधर निपश्चिच पडला होता. सगळा गाव श्रीधरच्या आजूबाजूला जमा झाला होता. जो तो रडत होता. आमच्या शंभर एक उंबऱ्याच गाव असणाऱ्या अंबड गावचा तो प्रत्येक घरचा लेक होता.
पंधरा वीस वर्षे झाली असतील गावात माधुकरी मागणारी लोक आली होती त्यांच्यातील कोणाचा तरी हा पाच सहा वर्षाचा श्रीधर हा मुलगा इथेच विसरून राहून गेला होता. आजूबाजूच्या गावात चौकशी करून बघितली होती की या मुलांचं कोणी आहे काय? पण तसं काही आढळलं नाही. मग आपला श्रीधर इथेच राहिला. गावात कोणाचं काही काम असेल तर श्रीधर कश्याचीच कुरकुर न करता सगळयांच्या मदतीसाठी धावत.पडेल ते काम करायचा पण कोणाकडे फुकट काही मिळेल म्हणून जायचा नाही. इतकंच काय रोज रोजनदारीला कामाला जायचा पण कोणाकडून कधी रुपया पगार घेतलेला कोणालाच आठवत नाही. फक्त संध्याकाळच्या जेवणाची त्याची सोय झाली की झाली. मंदिरातच राहत होता. त्यामुळे घराचा प्रश्न सुटलेला.
अंबड गाव लहान असल्यामुळे गावात तशी साधनं अपुरीच . एकच किरणामालाचे दुकान, दळण कांडप ची गिरण ही गावात नाहीच. मग सगळ्यांचं दळण कांढप एकत्रच बैलगाडी करून गावापासून चारकिलो मीटर पर्यंत घेऊन जावे लागते हे काम ही श्रीधर कोणतीही कुरकुर न करता अगदी आनंदाने करत असे.
आता निपचित पडलेल्या श्रीधरच्या जवळ उभे असताना एक गोष्ट पटकन आठवली ती अशी “अंबड मध्ये सुतार मामांची सुतार कामाची शाळा आहे . तिथे रोज न चुकता श्रीधर भाता मारायचे काम करायला येत असे .तिथले सगळे काम झाले की मग तिथेच सुतारमामी कडे दुपारचे जेवण करत. असेच एक दिवस सुतारमामां कडे काहीच काम नव्हते म्हणून त्यांची शाळा बंद होती. दुपारची वेळ श्रीधर ला भूक लागली होती . तो दुपारी सुतारमामीच्या घराशिवाय जेवत ही नव्हता, आजच्या जेवणाचा प्रश्न उभा होता श्रीधरच्या समोर. तो रोजच्या सारखाच गेला सुतारमामीच्या घरी जेवायला द्या म्हणून” पण त्या दिवशी सुतारमामी श्रीधरला खूप बोलल्या.” माझाचं घर आहे काय तुला? गावात काय बाकीची लोकं नाहीत काय?तुझा रोजचा जेवणाचा ठेका मीच घेतलाय काय? ” श्रीधर शांत बसून ऐकत होता. खाली मान घालून बाहेर निघताना सुतारमामीला म्हणाला. ” माय तू मला नको देऊ जेवायला मी काय एक दिवस उपाशी राहून मरणार नाही. पण मी तुझं घर सोडून कुठेच दुपारचं जेवणार नाही.” त्या दिवशी श्रीधर उपाशी राहिला. मग तो परत उपाशी राहू नये म्हणून सुतारमामा आपली शाळा रोज सुरू करत आणि थोडं थोडं काम करून श्रीधरच्या मुखाला ही अन्नाचा घास देत.
सगळा गाव आज श्रीधरला उठवत होता पण श्रीधर मात्र निरव शांततेत कसा गाढ झोपला होता.
माणूस असताना किंमत नसते पण तो जेव्हा असा जातो तेव्हा त्याची किंमत खूप जाणवते. हेच आज अंबडच्या लोकांच्या डोळयातून जाणवत होते. श्रीधर नुसता माणूस असूच शकत नाही कारण तो गावात आल्यापासून गावाच्या लोकांच्यातील ऐकी वाढली होती. श्रीधरचा धाक चांगलाच आठ दहा गावात होता त्यामुळे गावच्या पोरीबाळींची काळजी नव्हती. त्या बिनधास्त शाळा कॉलेजला जाऊ शकत होत्या. गेल्या वीस एक वर्षात तरी अंबड गावात एक ही चुकीचा प्रकार झाला नव्हता. याच कारण श्रीधरच आहे. ते अस “गावात जर चुकून कोणच्यात भांडण झाले तर श्रीधर त्यांच्या घरचं कुठलंच काम स्वतः करत नसे आणि गावातील ही कोणाला करूं देत नसे. त्याचबरोबर अंबड गावातील कोणाला जर बाहेरच्या लोकांनी त्रास दिला तर त्याची हाडामोडून दिल्याशिवाय श्रीधर घरी गावात येत नसे. त्यामुळे श्रीधरला घाबरून गाव सुरक्षित होता. पण आता काय होईल याची भीती मात्र प्रत्येकाच्या मनात आहे. श्रीधर चुकून आलेला गावात मुलगा होता ? की गावाला शहाणपण आणि सद्बुद्धी देणारा एका देवदूत होता??काही कळत नाही. कितीही विचार केला तरी एक प्रश्न उरतोच? श्रीधर नक्की कोण होता…? आमच्या साठी तो एक चांगला माणूस होता, मेहनत करून खा, कोणाला चूक नसताना त्रास देऊ नका आणि प्रत्येकानी आपल्या गावातील मुली या आपल्याच घरच्या मुली आहेत म्हणून वागले पाहिजे असे अनेक संदेश देणारा तो पृथ्वीवरचा क्षणभराचा आत्मसन्मानीत पाहूणा होता ..? जे असेल ते असेल पण श्रीधरची उणीव कोणीच भरून काढू शकणार नाही हे मात्र खरं.
गावातील प्रश्नांचा डोंगर डोळ्यासमोर उभा होता. श्रीधर मात्र पंचतत्वात विलीन झाला होता.
( सदर कथा ही काल्पनिक असून यातील पात्र, घटना जर याशी काही साम्य असेल तर तो निवळ योगायोग समजावा. तसेच कोणत्याही जाती जमाती मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नाही .)
( लेख रजिस्टर आहे )
लेखिका
सौ.वर्षा विजय तावडे ( कमल)
आजरा, मुंबई
मुख्यसंपादक
वर्षा ताई खूप सुंदर डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे. खरं तर प्रत्येक गावात असा एक श्रीधर असतो ज्याची आपल्याला कदर नसते. तो गेल्यानंतर त्याची किंमत कळते. 👌🙏