परवा क्लिनिकमध्ये एक आई तिच्या पाच वर्षाच्या मुलीला घेऊन आली होती. घरी त्या मुलीला सांभाळायला कोणी नव्हते. आईची ट्रिटमेंट चालू असेपर्यंत तिला कशात तरी गुंतवून ठेवावे म्हणून माझ्या मदतनीस मुलीने तिला रंगपेटी आणि कोरा कागद दिला. तिला म्हटले तुझ्या आवडीचे चित्र काढ.
तिला कळेचना आवडीचे म्हणजे कुठचे चित्र काढायचे ते. तुला काय आवडते ते फूल, झाड, प्राणी,घर कशाचेही चित्र काढ मी म्हणाले.
बराच वेळ विचार करुन तिने आईला विचारले, “ममा मी कसले चित्र काढू?”
“अग, ते अंब्रेलाचे काढ.” तिच्या आईने माझ्याकडे टाईमप्लीज मागत म्हटले.मग मात्र पुढची दहा मिनिटे शांततेत गेली.
परत थोडा वेळाने तिची चुळबुळ सुरू झाली.” ममा, कोणते कलर देऊ?” ममाने परत माझ्याकडे क्षमायाचनेच्या नजरेने पहात तिला कोणते रंग कुठे द्यायचे ते सांगितले. परत ती आणि मी आपापल्या कामाला लागलो.
माझे काम झाल्यावर मी ते चित्र पाहिले, “अरे वाऽऽ काय मस्त आहे तुझी छत्री” मी म्हणाले. तेवढ्यात माझ्या पाठीमागून जोरदार आवाज आला.
“ईऽऽ, हे काय केलेस,किती वाईट रंगवलेयस. काहीतरीच दिसतेय ती छत्री. मी तुला रेडच्या शेजारी यलो आणि त्याच्या शेजारी ग्रीन कलर सांगितला होता. तू सगळे कॉंबिनेशनच बदललेस. एक काम धड नाही करत ही मुलगी.” शेवटचे वाक्य मला उद्देशून होते.
त्या छोटीच चेहरा पार उतरला होता.” मम्मा मला आवडतो ग पिंक कलर”, ती रडवेल्या आवाजात म्हणाली.
मला त्या मुलीची कीव आली मी तिची समजूत काढली. छानसा स्टीकर तिला कागदावर चिकटवायला दिला. चित्रावर पाच स्टारपण दिले. ती खुश झाली.
वरील घटनेतून आपण काय शिकलो ? असे पालक आपण तर नाही ना??
मुले मुलांच्या वाट्याचे विचार करू शकतात. तुम्हीच ते काम करू नका. त्यांच्यासाठी सगळेच रेडीमेड, बिनचूकअसायला हवे असा विचार करणे थांबवूया.
आपल्या मुलांना विचार करण्याचे, चुका करण्याचे, वेगवेगळे प्रयोग करायचे स्वातंत्र्य द्या. त्यांना जुन्या चाकोऱ्या मोडून नवीन वाटा तयार करू द्या.त्यांना चुका करू द्या. चुकांमधून शिकू द्या. आपल्याला आईन्स्टाईन हवेत की विचार न करता येणारे मॅनेजर हे तुम्ही पालकांनीच ठरवा.
- डॉ. समिधा गांधी
मुख्यसंपादक