लेखक – श्री.किसन आटोळे ( प्रा.शिक्षक)
आज जागतिक कुटुंब दिन.१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये जागतिक कुटुंब दिन साजरा करण्याचे ठरवले.शांतता, विचार, भावनांची देवाण-घेवाण व्हावी. प्रेम वृद्धिंगत व्हावे. म्हणून हा दिन सुरू करण्यात आला. अमेरिका, युरोप खंडात व इतर देशात कुटुंब व्यवस्था असली तरी त्यात जिव्हाळा नव्हता. गरजेपुरते एकत्र येणे व पुन्हा सोडून देणे. घटस्फोटाचे प्रमाण वाढले होते.अमेरिकेतील लिंडा ग्रोवर या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेने ‘सिटीझन्स फॉर ग्लोबल सोल्युशन’ या चळवळीद्वारे दहा वर्ष या दिनाचा जगभर प्रसार केला. विविध उपक्रम आयोजित केले.या चळवळीचा उद्देश एकत्र या, संवाद साधा, प्रोत्साहन द्या, संपर्क साधा असा होता. इतर देशांच्या तुलनेत भारतातील कुटुंब व्यवस्था ही मजबूत व्यवस्था मानली जाते. स्वतःपेक्षा कुटुंबाची काळजी घेणारी आपली संस्कृती. कुटुंब व्यवस्था ही भारतीय संस्कृतीच मानली जाते. देशात मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव ,अतिथी देवो भव ,वसुधैव कुटुंबकम ,हे विश्वचि माझे घर ही जगाला शिकवण देणारी आपली संस्कृती. जगात आदर्श अशी आपली कुटुंब व्यवस्था आहे.
कुटुंब म्हणजे काय ? जिथं आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा एकत्र राहतात. गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांना समजून घेतात. सुख-दुःखात उभे राहतात. ते म्हणजे कुटुंब. कुटुंबाचा आधार म्हणजे आपली ऊर्जाच असते. घरात कोणतेही कार्य निघाले की सारे कुटुंब एकत्र येऊन ते पार पाडतात. आनंदात दुःखात सहभागी होतात.
माणसाची जडणघडण कुटुंबात होत असते. चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव कुटुंबातच होते. माणसाला सुसंस्कारी करण्यासाठी कुटुंब व्यवस्थेची नितांत गरज आहे. कुटुंबातच त्याच्या जीवनाचा पाया घातला जातो. रामायण, महाभारत यातही कुटुंब एकत्र आले तर प्रगती किंवा त्यात वाद झाले तर अधोगती होते हेच आपल्याला दिसून येते. आपल्या इतिहासात पावलोपावली याचा आपल्याला अनुभव येतो. कुटुंबव्यवस्था ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असते. आपली भारतीय कुटुंबव्यवस्था ही मूल्यांवर आधारित आहे. परंतु अलीकडच्या पंधरा-वीस वर्षात या व्यवस्थेला ग्रहण लागले. परकीयांचे अंधानुकरण, चंगळवाद, सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पिढी वेगळ्याच दिशेने वाटचाल करत आहे. अजूनही ग्रामीण भागात ही कुटुंब व्यवस्था टिकून आहे. परंतु घराघरातले मोबाईल, टीव्ही यामुळे सगळीकडे सारखीच परिस्थिती ओढवली आहे काय? असाही प्रश्न निर्माण होतो. आज एका घरात राहून भिन्न दिशेला तोंड करून बसलेली माणसं. मोबाईल, टीव्हीत तोंड खूपसणारी माणसं. धावपळीच्या काळात एकमेकांना वेळ न देणारी माणसं. असंवेदनशील झालेला समाज. थोड्याशा कारणांवरून घरोघरी होणारे वाद, व्यसनांच्या आहारी गेलेली पिढी, आई वडिलांना मारहाण करणारा मुलगा, अविचाराने पळून जाऊन होणारे गुपचूप विवाह. सासु सुनेचे मतभेद. यामुळे हुंडाबळी, घटस्फोट, विसंवाद वाढले.
आज घराला वंशाला दिवा हवा म्हणून सर्रास स्त्री भ्रुण हत्या केली जाते. मग प्रश्न पडतो हीच का ती भूमी जिथे महापुरुष संतांचे जन्म झाले. संतांनी संसार करून परमार्थ केला. संत तुकाराम ,संत एकनाथ ,संत शेख महंमद महाराज यांनी,” प्रपंच करावा नेटका/ परमार्थ करावा विवेका “// हेच सांगितले. समाज प्रबोधन करता करता आपला संसारही चालविला. जिजाऊंमुळे छत्रपती शिवराय घडले. छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य उभारले. अहिल्यादेवींनी रयतेलाच आपले कुटुंब मानून राज्यकारभार केला. सावित्रीबाई फुले यांनी स्वतःचा संसार करून समाजाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही भूमी आहे. आज त्यांच्याच भूमीत कुटुंबव्यवस्था ढासळली. ही मोठी शोकांतिका आहे.
फेसबुक ,व्हाट्सअपवर नुसते फॅमिली ग्रुप झाले. परंतु त्यातला जिवंतपणा हरपला. प्रेम माया ममता जिव्हाळा आपुलकी नामशेष झाली. माणुसकी मानवता हरवते की काय असा प्रश्न निर्माण झाला.
अचानक कोरोना नावाचं वादळ आल. त्यानी जगभर थैमान घातले. आजही हे तांडव सुरूच आहे. माणसाला आपली माणसं आठवली. गावची माती आठवली. या लॉकडाऊनच्या काळात तो घरातच बसला. मरणाची भीती माणसाला माणुसकी शिकवते. कोरोनानी ती जागी केली. आपले पूर्वज, त्यांनी दिलेले संस्कार, त्यांचे विचार त्यांचे राहणीमान डोळ्यासमोर उभे राहिले. दररोज हजारो पेशंट निघू लागले. कोरोणाने शेकडो माणसे मरू लागली. कित्येकांच्या घरातील आईबाप, नवरा, मुलगा, मुलगी जवळचे नातेवाईक मरू लागले. माणूस संवेदनशील झाला. प्रत्येकजण कुटुंबाची काळजी घेऊ लागला. माझे कुटुंब माझी जबाबदारी काय असते हे त्याला कळाले. स्वतःच्याच कुटुंब नाही तर इतरांना मदत कशी करता येईल हेही तो पाहू लागला. दररोज मरणारी माणसं पाहून त्याचे मन सुन्न होत आहे. माणसाला माणसाची किंमत कळली. कुटुंबाचा आधार हे जगण्यासाठी किती मोठी ऊर्जा असते हे त्याला कळले. चौफेर उधळत असलेला माणूस आज शांततेत घरात बसून आहे. आज कुटुंब दिनानिमित्त एवढंच सांगावसं वाटतं, माणसाचे जीवन हे एकदाच असते. मिळालेला हा अनमोल देह सत्कारणी लावा. झालेल्या चुका दुरुस्त करण्याची ही योग्य वेळ आहे. कुटुंबाला वेळ द्या, प्रेमाने बोला, आदराने वागा. कुटुंबाचा जपा, नाती जपा.
संत श्रेष्ठ शेख महंमद महाराज म्हणतात की,
मनुष्यजन्म रत्न/ तेथे का हो वाईटपण//१//
नरदेह संचित दैवे/ सर्वांभूती गोड व्हावे//२//
नका निघू अध:पाती/ शेख महंमद विणविती//३//
आज समाजाने महापुरुषांचे, संतांचे विचार वाचा, ऐका आणि अनुकरण करा ही काळाची गरज आहे.
या लॉकडाऊन मध्ये निश्चय करा.
जतन करीन मी संस्कृती
जपेल कुटुंब ही नाती.
दररोज आनंदी राहील
कुटुंबांला आनंदी ठेवेल.
दररोज असेल कुटुंब दिन
हर क्षण हर दिन सुदिन.
हे विश्वची माझे घर
राहील मी जबाबदार.
लेखक – श्री.किसन आटोळे सर
( वाहिरा ता.आष्टी जि.बीड )
मुख्यसंपादक