आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यामध्ये विविध जाती, पंथाची आणि धर्माची लोक व्यापारी व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत आजरा शहरातील व्यापाऱ्यांना एकत्रित येऊन संघटना बळकट करून भेडसावत असलेले अनेक प्रश्न सोडविणे काळाची गरज बनली आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने रहात असतानासुद्धा आजरा शहरावर संवेदनाशिलतेचा शासनाचा बसलेला ठपका आजऱ्याच्या बाजारपेठेला मारक ठरत आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येत हा ठपका पुसून काढला पाहिजे अशी याठिकाणी मते मांडण्यात आली. दुरदूंडेश्वर सांस्कृतिक भवन लिंगायत गल्ली आजरा येथे हा व्यापारी असोसिएशनचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्यास सुरवात केली गेली. या मेळाव्यास सर्व व्यापारी बंधूनी सायंकाळी 5:00नंतर दुकाने बंद ठेऊन आपली हजेरी लावली होती. सर्वांनी मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी प्रत्येक मान्यवरांनी आपापली मते मांडत पुढची दिशा काय असावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे यांनी मागील काळातील लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, सुरवातीपासून मी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहे. आजपर्यँत मी प्रामाणिकपणे काम केले आहे. मला आलेल्या नोकरीचा त्याग करीत मी या व्यापारी व्यवसायात रुजलो. माझ्यावर आजपर्यँत व्यापारी बंधूनी विश्वास टाकून जबाबदारी दिली आहे ती मी प्रामाणिकपणे हाताळण्याचा प्रयत्न करीत आहे.

दयानंद भोपळे म्हणाले की, आपला व्यापाऱ्याचा पिंड आहे. आपला तालुका डोंगराळभाग आहे. 80ते 85टक्के लोक तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला येण्याचा प्रयत्न करतात. यासाठी बाजारपेठ सुरळीत करण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट, बैठक व्यावस्था याबाबी योग्यपणे हाताळण्याची गरज आहे.

प्रभाकर कोरवी यांनी अगदी प्रभावशाली मत मांडत म्हणाले की, आजरा शहराला शासनाचा संवेदनशील हा बसलेला शिक्का व्यापारी बाजारपेठेला अडचणीचे ठरत आहे. 50टक्के मुस्लिम आणि 50टक्के हिंदू असून गुण्यागोविंदाने आपापले व्यवसाय सांभाळत असतानासुद्धा हा जो शासनाचा संवेदनशिलतेचा शिक्का बसला आहे तो पुसून काढणे गरजेचे आहे. आम्ही सर्व जाती, पंथ आणि धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात असतानासुद्धा हा ठपका का? यामुळे बाहेरचे व्यावसायिक येण्यास धजावत आहेत. रोजगाराच्या संध्या कमी होत आहेत. यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. रोजगार आणि व्यापार वाढवण्यासाठी शासन पातळीवर संपर्क साधला पाहिजे आणि हा कलंक पुसून काढला पाहिजे. गवसे, सिरसंगी, वाटंगी, उत्तूर, भादवण, पेरणोली यासारख्या खेड्यातून आता आठवडा बाजार भरत असल्यामुळे खेडेगावातील लोकांचा शहरातील बाजारपेठेकडे आकर्षण कमी होताना दिसत आहे. आजऱ्याच्या बाजारपेठेची पीछेहाट होताना दिसत आहे. यासाठी संघटना बळकट करून व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी दुरगामी योजना आखणे गरजेचे आहे. तालुक्याला जो ठपका बसला आहे यामुळे बाहेरचे उद्योगधंदे शहरासह तालुक्यात येण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे याचा फटका रोजगारावर आणि व्यापारी वर्गास बसत आहे आणि हे सर्व प्रश्न मार्गी लावायचे असतील तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जनार्दन टोपले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दयानंद भुसारी, बसवराज महाळंक, श्रीकांत गजरे, सचिन शिंपी, मल्लिकार्जुन तेरणी, आण्णा फडके, सुधीर देसाई, प्रकाश टोपले, नौशादभाई बुडडेखान, महेश नार्वेकर, शरीफ खेडेकर, महंतेश गुंजाटी, रवींद्र हुक्केरी, प्रशांत बिल्ले, अभिजित रांगणेकर, ओंकार माद्याळकर, राजू विभुते, संजय सावंत, मनोज गुंजाटी,अबुल काकतिकर, बाबासो खलिफ, समीर खेडेकर, बाळू पाचवडेकर, ताजुद्दीन तकीलदार, पप्पू कुलकर्णी, युसूफ मुल्ला, भास्कर बुरुड, आरिफ माणगावकर तसेच सर्व व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाय. जी. इंजल यांनी आभार मानले.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



