Homeघडामोडीसाळगावात स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचे मोफत वाटप; पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

साळगावात स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचे मोफत वाटप; पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

साळगाव (ता. आजरा) येथे ग्रामपंचायत साळगाव, सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) आणि हरित क्रांती नैसर्गिक शेती शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना विविध स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच मा. धनंजय पाटील होते.

प्रास्ताविक करताना समन्वयक महादेव निऊंगरे यांनी तापमानवाढ, हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांवर स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड आणि संवर्धन हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगितले.

सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील यांनी जल, जंगल आणि जमीन यांचा शास्त्रशुद्ध व काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. तर प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस यांनी साळगाव ग्रामस्थांच्या वृक्षसंवर्धन उपक्रमाचे कौतुक करून अधिकाधिक झाडे लावून त्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात सरपंच धनंजय पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सरपंच परिषदेने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करत ग्रामस्थ पूर्ण सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली.

या कार्यक्रमास सोहाळे-बाचीच्या सरपंच सौ. भारती डेळकर, पेरणोलीच्या सरपंच सौ. वनश्री देसाई, माध्यमिक शिक्षक रविंद्र देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव जाधव, माजी उपसरपंच अरविंद गावडे, माजी कृषी सहाय्यक पांडूरंग वेंगुळकर, शिवाजी कांबळे, बाबू बादेस्कर, अशोक तानवडे, कृष्णा नार्वेकर, कृष्णा निऊंगरे, रामचंद्र भाडभगत, विलास दोरुगडे, निवृत्ती भालेकर यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

हरित क्रांती नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे अध्यक्ष पांडूरंग पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पर्यावरण संरक्षणाचा सामूहिक संकल्प करून करण्यात आली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular