Homeसंपादकीयचिंतारोग

चिंतारोग

लेखक – श्री.किसन आटोळे सर
वाहिरा ता आष्टी जि बीड

सध्या सोशल मीडियावर एका गोष्टीचा व्हिडिओ फिरत आहे. ती गोष्ट अशी . एक गृहस्थ प्रवासासाठी निघालेले असतात. त्याकाळी वाहनांची सोय नव्हती. त्यांचा प्रवास पायीच सुरू असतो. मजल दरमजल करत ते निघालेले असतात. त्याच्याजवळील शिदोरी संपलेली असते. त्याला प्रचंड भूक लागलेली असते. रस्त्याने दूरपर्यंत घरही दिसेना. तो चालतच राहिला. खूप पुढे गेल्यानंतर त्याला एक घर दिसले. मनात आशेचा किरण चमकला. लगबगीने त्या घराकडे गेला. घराचा दरवाजा वाजवला. एक छोटीशी मुलगी बाहेर आली. तिने विचारले कोण पाहिजे?. प्रवासी म्हणाला,’ मला खूप भूक लागली आहे, मला थोडं खायला मिळेल का’? आतून मुलीची आई बाहेर आली. त्या माऊलीने प्रवाशाला घरात बोलावले. छान स्वयंपाक केला. तो प्रवासी आणि कुटुंब यांनी जेवण केले. प्रवासी गृहस्थाची भूक शांत झाली. त्याला खूप बरे वाटले. त्या कुटुंबाला धन्यवाद देऊन तो पुढच्या प्रवासाला लागला. प्रवासी निघून गेला. जेवण करून थोडी शिल्लक भाजी राहिली होती. त्याकडे त्या माऊलीचे लक्ष गेले. ती तर किंचाळलीच. काय झालं म्हणून तिचा नवरा, मुलगा, मुलगी जवळ आले. पाहतात तर काय ? त्यांनी जे अन्न खाल्लं होतं. त्यात पाल पडली होती. घरात एकच गोंधळ सुरू झाला. आपल्या पोटात पालीचे विष गेल आहे. आपण आता नक्की मरणार. आपले काही खरे नाही. हे प्रत्येकाच्या मनात बिंबले. अगोदर ती माऊली गतप्राण झाली. या विषाने नक्की मरते. असा समज तिघांना झाला. थोड्याच अवधीत नवरा मुलगा मुलगी मरण पावले. जवळच शेजारी वस्ती होती. तेथील माणसं पळत आली. त्यांच्या हा प्रकार लक्षात आला होता. आताच यांचं जेवण झालं आणि हे मरून गेली. परंतु यांच्यात आणखी एक माणूस होता. तो तर निघून गेला आहे. त्याचं काय झाले असेल ? हे त्यांच्या मनात आले. नक्कीच तो मरून गेला असेल ? असे त्यांना वाटले.
जेवण करून गेलेला गृहस्थ परतीच्या प्रवासाला निघाला होता. ज्या माउलीने आपल्याला भरपूर जेवण दिलं. त्यांच्यासाठी काहीतरी त्याने घेतले. त्यांना आपण हे जाताना देऊ असा त्याच्या मनात विचार आला. आठ दिवसानंतर तो त्या दारासमोर उभे राहिला. दरवाजा वाजवला पण उघडला नाही. शेजारच्या वस्तीवरील माणसाने या प्रवाशाला ओळखले होते. तो लगबगीने प्रवाशाकडे आला. त्याने सर्व हकीकत सांगितली. तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवशी हे विषबाधेने मरून गेले. त्यावेळेस तुम्ही जेवण करून गेला होता. त्या चौघांच्या पोटात पालीचे विष गेले होते. त्या प्रवासी गृहस्थाचे हातपाय थरथरू लागली. तो तसाच रस्त्याने चालत होता. मनात वेगवेगळे विचार चक्र सुरु झाले. मी मरणार तर नाही ना ? माझ्याही पोटात पालीचे विष गेले आहे. सारखा तो ती गोष्ट मनात घोकत होता. त्या चिंतेने पूर्ण त्याला घेरले होते. चिंतारोग त्याच्या मनामनात नसानसात गेला. चालता चालताच तो धाडकन कोसळला आणि मरून गेला.
चिंता किती भयानक असते. ही गोष्ट आपल्याला सांगते. अशी चिंता घरोघरी सुरू आहे. गावातील एखादा मृत्यू झाला की आपलंही काही खरं नाही. मनात चिंता घर करते. तो तर चांगला धडधाकट होता. मग आपलं कसं होणार ? पुन्हा चिंतारोग पाठीशी लागतो. दवाखान्यात कोरोनाग्रस्तांच्या गर्दीत अशी चिंता सर्वांच्या मनात सतावत आहे. आपल्या शेजारचा व्हेंटिलेटरवर आहे. अमक्याला ऑक्सिजन कमी झाला. कुणास रेमडीसिव्हर इंजेक्शन आणावी लागली. चांगला माणूसही चिंता करू लागला. नसलेलं दुखणं तो त्याच्या शरीरात वाढवु लागला. जगातील 90 टक्के लोक या चिंतेने ग्रासलेले आहेत.कुणाला आजची,कुणाला उद्याची चिंता. कोणाला आपल्या मुला मुलीची चिंता. काहींना पुढच्या पिढीची चिंता. काहीतर होऊन गेलेल्या गोष्टीची चिंता करतात. ‘चिंता चीती ते वैरी न चिती’. ब्लड प्रेशर, मधुमेह, ताणतणाव,आजारपण हे सगळे चिंतेची लक्षण. बरेचसे आजार डॉक्टरांना दाखविले तर काहीच दिसत नाही. ही माणसं एक्स-रे काढतात. संपूर्ण शरीर तपासणी करतात. परंतु डॉक्टर सांगतात तुम्हाला काहीच झालेले नाही. परंतु रोग्याला ते खरे वाटत नाही. आपण आजारी का पडतो ? याचा तो विचार करत नाही. त्याचे उत्तर असतं निगेटिव्ह विचार.
कोरोनाची पहिली लाट गेली. दुसरी लाट ही जात आहे. परंतु तिसरी लाट कशी असेल ? याची चिंता करत घरोघरी बसले आहेत. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज , सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ सुरू आहे. तिसरी लाट येणार तिसरी लाट येणार . पुन्हा चिंतारोग मनात घर करत आहे. नैसर्गिक संकटे येत असतात जात असतात. विनाकारण चिंता करणे व्यर्थ आहे. जे आपल्या हाती नाही त्याची का करावी चिंता. आज 90 टक्के मृत्यूचे प्रमाण हे चिंतारोगाने झालेले आहे. चिंता माणसाला घाबरून सोडते. माणूस तोच तोच विचार करू लागतो. त्यामुळे तशाच घटना होत असतात. जे करण्यासारखे आहे ते आनंदाने करा. सकारात्मक विचाराने करा.असं म्हणतात, ‘चींता से घटे शरीर. चिंता चिते समान असते’. चिंता जिवंत माणसाला जाळते. तर चिता मेलेल्या माणसाला जाळते.
या चिंता रोगापासून दूर राहा. सकारात्मक विचार करा. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. हा कोरोना नक्की जाणार आहे. हे मनात रुजवा. टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूज, सोशल मीडियावर आलेल्या कोरोनाच्या बातम्या याकडे दुर्लक्ष करा. या विषयावर कोणाशी जास्त चर्चा करू नका. मित्र नातेवाईक यांना फोन करा. वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारा. आपले छंद जोपासा. वाचन करा लिहा. कुटुंबात आहात सुसंवाद साधा. घरातील लहान मुलांशी खेळ खेळा. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारा. आनंद द्या आनंद घ्या. नवनवीन गोष्टी शिका. फावल्या वेळेचा सदुपयोग करा. नक्की जीवन परिवर्तन होईल. हा कोरोनाही आला तसा निघून जाईल. चिंता केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर आणखी वाढतात. म्हणून लक्षात ठेवा निश्चिंत रहा.

 उगाच कशाला चिंता ,जित्या देहाला जाळते
 तुझ्या सुखी संसाराला,क्षणोक्षणी हि पोळते….

चिंतारोग महाभयानक,सार्‍यांनी समजून घ्यावे
नकारात्मक विचार सोड,सकारात्मक जीवन जगावे….

महामारी संकट येतीजाती,काळजी तेवढी घ्यावी
शिल्लक जेवढे आयुष्य,माणसा आनंदाने जगावी…..

नको देऊ आजाराला,विनाकारण निमंत्रण
आनंदी रहा घरी राहा,नियमाची ठेव आठवण……

 नक्की सर्वजण या गोष्टीचा विचार करतील. नको त्या गोष्टीची, नको त्या विषयावर चर्चा बंद करतील. एकमेकाला आधार द्या. समजून घ्या. सकारात्मक वातावरण तयार करा. नक्की जीवन बदलेल. तुम्ही जसा विचार करता तशाच घटना जीवनात होत असतात. मग चांगलाच विचार करायला काय हरकत आहे. रडत रडत जगण्यापेक्षा हसत हसत जगणे केव्हाही चांगले. गर्दीत जाऊ नका. मास्क सॅनिटायझर वापरा. जरी आजार झाला तरी घाबरु नका. मनाला सांगा. मी तंदुरुस्त आहे. मला काही होणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा. चिंता तर मुळीच करू नका. कोरोनाची लढाई शांत, संयम, सहनशीलता, सकारात्मक विचाराने लढा.   हीच कळकळीची विनंती.  
  नकोच ती चिंता व्यर्थ/
  नसे त्यासी काही अर्थ//

 आयुष्य असते थोडे
कशाला चिंतेचे घोडे //

सुख दुःख व्यक्त व्हावे
 शक्य तेवढे करावे//

मार्ग धर सोपा साधा /
कशाला येईल बाधा//

कृष्णा सांगतो तुम्हास/
दूर ठेवावे चिंतास //

          *लेखक*
  • श्री किसन आटोळे सर
    श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज चरित्रकार
    वाहिरा ता आष्टी जि बीड

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular