आजरा ( अमित गुरव ) : पंचायत समिती आजरा व आरोग्य विभागाच्या वतीने “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” या अभियानांतर्गत कार्यशाळा तसेच टीबी मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळा आज (दि. 30 एप्रिल 2026) तहसील कार्यालय, आजरा येथील सभागृहात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती आजराचे सभापती जयश्री गाडे होते. यावेळी उपसभापती यशोदा पवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चौथे, समीर पाटील, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी सुभाष सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र गुरव यांच्यासह विविध अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यशाळेत “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाची उद्दिष्टे, कुटुंब नियोजन साधनांचा वापर, आरोग्य विषयक निकष, बक्षिसे व अंमलबजावणीची माहिती देण्यात आली. तसेच टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत तालुक्यातील 37 ग्रामपंचायती टीबी मुक्त घोषित झाल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये सुवर्ण 4, रौप्य 15 व कांस्य 18 ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व महात्मा गांधींचा पुतळा प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत मनिषा भांडकवळी (BNO) यांनी केले. कार्यशाळेची माहिती डॉ. रविंद्र गुरव यांनी दिली, तर आभार प्रदर्शन कोस्तुभ पाटील (आरोग्य सेवक) यांनी केले.
दरम्यान, या अभियानामुळे ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृती वाढून गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


मुख्यसंपादक



