Homeक्राईमयात्रेहून परतताना काळाचा घाला ! भरधाव कारने चौघांना चिरडले, १४ वर्षीय मुलीसह...

यात्रेहून परतताना काळाचा घाला ! भरधाव कारने चौघांना चिरडले, १४ वर्षीय मुलीसह सर्व गंभीर

आजरा : अमित गुरव -:
आजरा तालुक्यातील हाळोली गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. गोव्याकडून हैदराबादच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने बसची वाट पाहत उभ्या असलेल्या चौघांना तसेच एका मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात संजय काळू कांबळे (वय ४५), उषा संजय कांबळे (वय ४०), श्रुतिका संजय कांबळे (वय १४, सर्व रा. सोहाळे, ता. आजरा) आणि मालुबाई अशोक कांबळे (वय ३५, रा. महागोंड, ता. आजरा) हे गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण हाळोली गावातील यात्रेनिमित्त पाहुण्यांकडे रविवारी आले होते. यात्रा आटोपल्यानंतर सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या गावी परत जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबले होते. त्याचवेळी गोव्याकडून हैदराबादकडे जाणाऱ्या एमएच १४ एचडी २७६१ क्रमांकाच्या भरधाव चारचाकी वाहनाने नियंत्रण गमावून बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या नागरिकांना व एमएच ०९ एफझेड ०७७६ क्रमांकाच्या मोटरसायकलला धडक दिली.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाचा चालक भरतराज सुब्रमण्यम (रा. हैदराबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular