Homeघडामोडीविकास पाण्यात गेला आणि प्रगती अजुन झालीच नाही

विकास पाण्यात गेला आणि प्रगती अजुन झालीच नाही

आजरा (प्रतिनिधी) :
आजरा- पोळगाव मार्गावरील रस्त्याची अवस्था पाहता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक, शालेय विद्यार्थी तसेच पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या मार्गावरून पोळगावसह अनेक गावांतील नागरिकांची रोजची ये-जा सुरू असते. परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती ही केवळ विकासकाम नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरवर्षी दुरुस्ती होऊनही पावसाळा सुरू होताच पुन्हा त्याच समस्या उभ्या राहत असल्याने नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. “विकासाचे फलक उभे राहिले, मात्र प्रगतीची पावले अजूनही रस्त्यावर उमटलेली दिसत नाहीत,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया परिसरातून ऐकायला मिळत आहे.
स्थानिक राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील मतभेद अनेक विषयांवर दिसून येतात; मात्र या रस्त्याच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे ठोस प्रयत्न होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे या मार्गावरून पुढे कृषी पर्यटन स्थळाकडेही पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे तालुक्याची प्रतिमा जपण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठीही या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
पावसाळा अद्याप शिल्लक असताना परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये या विषयाची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

बातम्या देण्यासाठी संपर्क -: अमित गुरव 8421666667

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular