आजरा ( अमित गुरव )
कृषी विभाग आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाला आजरा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मौजे सोहाळे येथे शेतकरी रणजित देसाई यांच्या शेतात भात रोपलावणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतीशी बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी सरपंच भारती डेळेकर, वनक्षेत्रपाल कल्याणी गोडसे, विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, ग्रामसेवक अजित रणदिवे, वनपाल संजय निळकंठ, वनरक्षक दीपक कदम, विद्या मंदिर सोहाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून रोपलावणीत सहभाग घेतला.
यानंतर हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत सोहाळेवाडी येथे सामाजिक वनीकरण विभाग, गडहिंग्लज आणि ग्रामपंचायत सोहाळे यांच्या संयुक्त विद्यमाने १,५०० विविध प्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेत ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या दोन्ही उपक्रमांमधून कृषी, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभागाचा उत्कृष्ट संगम घडून आला असून, शाश्वत विकासासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव सर्वांनी व्यक्त केली.


मुख्यसंपादक



