काठी नि घोंगडी घेउद्या की रं
मला बी जत्रंला येउद्या की….
काय …..गाणं म्हणतोयस राजा, चल पटापट, पाय उचल, पाऊस थांबलाय तोपर्यंत जाऊया …चल लवकर…
डोक्यावरची भाकर-तुकड्याची परडी सावरत, शांता, राजाला म्हणत पाय भराभर उचलत होती…
ये आई आज पर्यंत मी कधी नांगर धरला नाही बघ, आज बाबांना सांगून मी नांगर धरणार…
बरं बाबा, पण आधी चल तरी पटकन, बाबांना भूक लागली असेल….
राजाला शेतातून बाबा दिसताच चेहऱ्यावर हसू उमटले आणि धावतच बाबा जवळ गेला…
बाबा, आज मी नांगर धरू का ओ, दर वर्षी तुम्ही, मी लहान आहे सांगता आणि पुढच्या वर्षी घे, म्हणून वेळ मारून नेता…
बघा मी आता सोळा वर्षाचा आहे, लहान आहे का आता मी, तो माझ्या वर्गातला सिद्धेश, माझ्या एव्हढाच आहे ना, तो धरतोय नांगर….
होय रे दादा, तू आता मोठाच झालायस, पर्वा माझ्या चपला घातल्यास आणि आलास गाव धुंडाळून तेव्हाच समजून गेलो मी, तू आता मोठा झालायस….
घे पोरा धर नांगर….पण हळू हळू बरं का !
बैलांना पण बघ धाप लागलेय, थोडा वेळ घे…
राजाने अगदी आनंदात नांगर धरला आणि लागला जोत हाकायला….
ही….रं ….शिवा…ही….ही….
चल चल …..जीवा….ही…रं…रं….
………………………………………………………………………….
शांता ये शांता, पाणी आण गं जरा……
हो आणते-आणते…बसा आणते…
शांता पाणी घेऊन आली आणि धनाजीकडे बघत जाग्यावरच थबकली…
धनाजींच्या डोळ्यात अश्रू होते……पण का ??
अहो काय झालं, आधी पाणी पिऊन घ्या…
नको गं पाणी शांते, आज खूप वाईट वाटलं बघ या बापाला…
मी तुला नेहमी म्हणतो ना माझा एक नाही, तीन-तीन मुलं आहेत म्हणून, त्याचेच हे, या डोळ्यांतले अश्रू आहेत…
अगं शांते मी आताच आपल्या गोठयात शेण काढायला गेलो होतो, आपले दोन्ही बैल असे काही वागत होते ना, की, मला भास होत होता की दोघेही एकमेकांना काहीतरी सांगत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत….
जीवा – अरे ऐकलंस रे….
शिवा – बोल काय म्हणतोयस, तसंही तू काय म्हणणार आहेस ते मलाही माहितेय !
जीवा – काय ? तुला कसं कळलं रे…
शिवा – तुला काय वाटतं रे, या माणसांनाच एकमेकांच्या मनातलं कळतं का ? तुझं माहीत नाही, पण मलाही आपल्या मालकांच्या मनातलं कळतंय…
जीवा – होय शिवा, मी आणि तू एक वेळ आजारी होतो म्हणून, मालकांनी आपल्याला, जोताला न बांधता, शांतेला बरोबर घेऊन अख्ख शेत कुदळीने खणून शेती केली होती…
आणि तो छोटा राजा, आपल्या आई-बाबाला बघून एवढ्याश्या वयातही त्याने, त्यांना मदत म्हणून, खणायला चालू केलं होतं…
शिवा – होय जीवा, मला आठवतायत ते दिवस, खूप यातना झाल्या असतील त्यांना त्या वेळी, पण मालकांनी आणि शांतेने आपल्याला कधीही दुखावलं नाही रे, अगदी पोटच्या पोराप्रमाणे आपला त्यांनी सांभाळ केलाय आतापर्यंत….
जीवा तुझा पाय आता बरा हाय का रं….
जरा उठून बघ…. उभा राहून बघ…..
जीवा – आरं मर्दा, आपल्या मालकांसाठी पायाचं काय घेऊन बसलास, जीव ओवाळून टाकेन मी….!
एवढं एकमेकांशी बोलत असतानाच, त्या दोघांचे अंग थरथरले आणि त्या मुक्या जनावरांचेही अश्रू अनावर होऊन तसेच डोळ्यांतून ओघळू लागले…..
आज काय झालंय काय या दोघांना, असे काय करतायत हे दोघे…..
धनाजींना काहीच कळत नव्हते, आणि अचानक त्यांची नजर दोघांच्या डोळ्यावर गेली आणि एवढा रांगडा पुरुष तो, धावला दोघांच्या जवळ, दोघांच्या गळ्यात गळा घालून लहान पोरासारखा रडू लागला….
जीवा – मालक आम्ही बोलतोय ते तुम्हाला ऐकायला जात नाहीय, पण ते जाणवतंय हे आम्हाला कळतंय….
शिवा – होय मालक, आपली शेती आपण करूच, पण तुम्ही स्वतःचं काही करून घ्यायचं नाही, आणि आत्महत्येचा विचार तर मनात सुद्धा आणायचा नाही…..
आणि …..पुन्हा एकदा त्या दोघांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाट वाहू लागला….
धनाजी समजून गेले, आपलाच विचार करत आहेत हे दोघे….
अरे पोरांनो तुम्ही माझी मुलं हायत, तुम्ही हायत म्हणून मी जीता हाय….रडू नका पोरांनो….
एवढं बोलत असताना…
जीवा कधी उठून उभा राहिला, हे धनाजींना कळले सुद्धा नाही…
अरे तुझा पाय….धनाजी अजूनच हमसून हमसून रडू लागले…..
पुढे काय होणार हे धनाजींना समजून चुकले होते….
शांते म्हणून म्हणतो मी माझी तीन पोरं हायत …..
शांता तशीच उठली आणि घरातली भाकरी घेऊन जीवा-शिवाकडे धावली….
अरे पोरांनो किती रे आमचा विचार करता…
आणि दोघांनाही बिलगलीच…..
पुन्हा अश्रूंचा पाट वाहायला लागला होता…
शांता गोठ्यातून जायला निघाली तसा जीवाने शांतेचा पदर तोंडात पकडला आणि जणू तिला सांगत होता….
जीवा – ये माझ्या आई, माझा पाय आता बरा हाय, मालकांना सांगा काळजी करू नका….काहीही मनात वेगळा विचार आणू नका…
शिवा – होय माऊली होय…आम्ही तुमची पोरंच आहोत, मग तुम्हाला उपाशी कसं राहू देऊ…..
जा माऊली, मालकांना सांग, चला नांगर घेऊन….शेती करू…
आपली शेती……
शांताने मागे वळून बघितले आणि दोघेही तिच्याकडे रडवेल्या नजरेने एकटक बघत बसले होते…
शांतेने दोघांनाही पोराप्रमाणे कवटाळले आणि तीचेही अश्रू अनावर झाले….
शांता घरात आली तेव्हा धनाजी तिच्याकडे बघतच राहिले…
शांते आपल्या पोरांनी लय कष्ट केलेत आपल्यासाठी, पण आज बघ, त्यांचा मालक आणि मालकीण काळजीत दिसल्यावर पायाचं दुखणं बाजूला ठेऊन उभा राहणारा तो पोटचा पोरगाच हाय आपला जणू, असंच वाटलं मला……
होय हो, आपली पोरंच हायत ती, आपण त्यांच्यावर केलेली माया त्यांना समजते, एकवेळ माणसांना ती कळणार न्हाय पण जनावरांना लगेच कळते…..
धनाजी पुन्हा गोठ्यात आले नि जीवा-शिवाला हिरवा चारा घातला आणि घरात गेले….
खेळायला गेलेला राजा, घरी आला—
बाबा आपण कधी जाणार शेतावर, चला ना…..
अगोदर जसं कुदळीने खणून शेती केली होती, तशी करूया, आता मी मोठा पण झालोय, पटापट काम करेन, ये आई चल ना गं जाऊया….
ती जनावरं आणि हा पोटचा पोर, एकच भाषा बोलतायत हे ऐकून धनाजी आणि शांताला गहिवरून आले…
पण त्या लहान जीवाला काहीच माहीत नसल्यामुळे तो मात्र आई- बाबांकडे केविलवाण्या नजरेने पाहत बसला होता….
…………………………………………………………………………
काय हो काय झालं, असं इथे बसून काय करताय….
काही नाही गं, गेल्या वर्षीचा दुष्काळ आठवला, पाऊस नाही आणि शेतीही नाही झाली, जे काही आदल्या वर्षिचं होतं तेच काटकसर करून त्याच्यावरच निभावून न्यायला लागलं होतं…
धान नाही पिकलं आणि धान विकायलाही नाही मिळालं त्यामुळे पैसाही जवळ राहिला नाही,….
अगं सरकार पण बघ, कसं हाय ना….
शेतकऱ्यांसाठी योजना राबवतात, पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात की नाही हे बघत सुद्धा नाही, मधले लोकंच आपले खिसे भरून मोकळे होतात….
मग आपला शेतकरी हाय, आत्महत्या करण्यावाचून त्यांच्याकडेही काही पर्याय उरत नाही….
अहो, काय बोलताय तुम्ही, दुष्काळ पडला होता मान्य आहे, पण आपण दिवस काढतोय ना कसंतरी, आणि तुम्ही पण एकदा प्रयत्न केला होता ना…….
अहो कशासाठी असं करता तुम्ही, आम्ही कोणासाठी मग जगायचं होतं……
बरं झालं त्या दिवशी आपल्या राजाने शाळेतून घरी येताना तुम्हाला बघितलं, नाहीतर आज मी काय केलं असत हो….
आणि शांता लागली हंबरडा फोडून रडायला….
अगं शांते मनात चाललेली घालमेल कोणाला सांगायची गं, कर्ज नाहीय आपल्याला, पण पुढचं आयुष्य कसं जगायचं, हाच विचार करून माणूस खचून जातो आणि या प्रयत्नापर्यंत पोहचतो….
आणि आम्ही दोघांनी काय केलं असतं मग, यायचं होतं का तुमच्या मागे….
डोळ्यांतून वाहणारे अश्रू पुसत शांता म्हणाली….
तसं नाही गं शांते….
मग कसं……
यापुढे असं काही मनात आलं ना तर तुमची गाठ माझ्याशी आहे….!!
शांता, बायकोचा हिसका काय असतो हे त्या शब्दांत बोलून गेली खरी….
पण धनाजींना समजत नव्हतं, हिने आपल्याला धमकी दिलीय की, समजावून सांगितलं….
डोळ्यांतून अश्रू वाहत असतानाही शांतेचं बोलणं पुन्हा पुन्हा आठवून धनाजींना का कुणास ठाऊक पण हसू येत होतं….
दाराआड असलेली शांता हे बघून खूप सुखावली….
आता यांच्यावर कोणतंही मोठं संकट आलं तरी त्यांच्या मनात, असे अवचळ विचार येणार नाहीत हे ती समजून गेली….
पुढे होऊन म्हणाली….अहो जास्त विचार करू नका, गुरं बाहेर काढा चला शेतावर…..मी येते भाकरी घेऊन….
………………………………………………………………………….
धनाजींनी जिवा आणि शिवाला गोठ्यातून बाहेर काढलं पण दोघांच्याही पाठीवरून हात फिरवत म्हणाले….
अरे पोरांनो माझ्यासाठी उठून उभे राहिलात हे मला कळत नाय व्हय….
एवढे बोल त्या दोघांना कळाले आणि दोघांनीही एकदम धनाजींकडे बघितले….
ही मुकी जनावरं, यांना सगळं समजतं पण बोलू शकत नाहीत, माणसांना बोलता येतं, पण तरीही न बोलताच चुकीचं पाऊल टाकतात…
अरे माझ्या बांधवांनो, एकदा बोला कोणाशीतरी आत्महत्या करून काय उपयोग, कर्ज असेल तर मागच्यांना भरावेच लागणार ना….
मग असं कृत्य करून आपण मात्र जगातून निघून जातो, परंतु भोग भोगायला राहिलेल्या माणसांना लागतात……
म्हणून आत्महत्या करणे टाळा……..असो.
चला रे पोरांनो…..
धनाजी शेतावर बैलांना घेऊन आले, दोघांच्या मानेवर जोकड ठेवले आणि त्याला नांगर जुंपला….
शेत नांगरायला सुरवात केली आणि बघता बघता सर्व शेत नांगरून झालंच होतं तेवढ्यात ….
धनाजींनी समोर पाहिलं तर आपला पोरगा राजा धावतच आपल्याकडे येत आहे असं त्यांना दिसलं…
अरे अरे हळू ये, धावतोयस कशाला, पडशील ना रे….
तेवढ्यात शांताही भाकरीची परडी घेऊन तिथे पोहचली…..
बाबा मला पण नांगर धरायचाय….
घे पण हळू हळू….
पोरं दमलेयत रे……दादा
तो जीवा बघ पायाला दुखापत झालेली असूनसुद्धा आपल्या पोटा-पाण्यासाठी उभा आहे पोर….
राजाने हातातला नांगर सोडला आणि बैलांच्या मानेला बिलगला
आरं तुम्ही जनावरं हायत की कोण हायत….
पण…पण….
ती दोन मुकी जनावरं राजाला सांगू लागली….
यापुढे ना आम्ही थकणार, नाही तुम्ही उपाशी राहणार….
ही जीवा – शिवाची बैल जोड कायमची आपल्या मालकासाठी धावणार….
म्हणतात ना लहान मुलांच्यात देव असतो…..
राजाने दोघांनाही जोखडातून मुक्त केलं आणि चरायला पाठवलं….
जिवाच्या पायाजवळ जाऊन, राजा त्याचा पाय हातात घेऊन लागलं होतं तिथे, कसलातरी पाला दगडाने कुटून लावत होता…..
आणि गाणं गुणगुणत होता….
जीवा-शिवाची बैल जोड………
आणि……
आणि..
धनाजी आपल्या तिन्ही पोरांकडे पाहत म्हणत होते, शांते मी तुला सांगतो, आपली ही तीन पोरं कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत बघ…..
- विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक