आज तिने मागून वळून पाहिलंच नाही.निरोप घेताना दहावेळा मान मागे वळवून मला पाहणारी कस्तुरी आज बदलताना पाहिली.कुणीतरी काळजात सुई घुसवावं अशी काहीशी वेदना मुक्याने बोलकी होताना मी अनुभवली.डोळ्यातून आपोआप पाणी आलं.कस्तुरी खूप दूर निघून गेली होती.नजरेआड होईपर्यंत तिला पाहतच राहिलो.कस्तुरी निघून गेली की मी कायम एक दगड उचलून कोणत्या तरी दगडावर नेम धरून तो फेकायचो.जर नेम बरोबर लागला तर समजायचं की कस्तुरीसुद्धा माझ्यावर प्रेम करते.तशी कस्तुरीची आणि माझी तुलना म्हणजे कावळा आणि बगळा अशी होईल.
आम्ही रस्त्याचे काम करायचो.जत डफळापूर रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते.कस्तुरी दगड फोडायचे काम करायची आणि मी डांबर टाकायचो.कस्तुरी जेव्हा दगड फोडायची तेव्हा येणारा जाणारा प्रत्येकजण तिच्याकडे बेरकी नजर टाकायचा.मला ते सहन होत नसायचं.त्यावेळी कस्तुरीच्या लक्षात ती बेरकी नजर आली की ती जोरात घण दगडावर आपटायची.आणि तोंडाने जोरात कसला तरी विचित्र आवाज काढायची.ते नजर टाकणारं माणूस लाजल्यागत निघून जायचं तेव्हा हळूच कस्तुरी माझ्याकडे पहायची आणि काहीतरी ओठाने पुटपुटायची.तिचे ते बोलणे आजवर मला कधी समजलेच नाही.
आज दुपारी असेच काहीसे झालेले. रोडरोलर वाल्याने बोलता बोलता तिच्या छातीवर हात ठेवला होता. तिला हे सहन झालं नव्हतं.त्या रागाच्या तंद्रीत तिने त्याला जोरात ढकलून दिले होते.तो जोरात आपटला होता.त्याला लागलं होतं खूप.मी सगळं हे पाहत होतो.पण प्रतिकार करू शकलो नव्हतो.कारण कंत्राटदाराचा खूप जवळचा कोणीतरी होता तो.त्यामुळे मी मध्ये पडलो नाही.पगार कापला जाईल याच भीतीने मी काही करू शकलो नाही.पण कस्तुरी मधलं हे रूप पाहून मी आतून थोडासा आनंदून गेलो होतो.त्यावेळी कस्तुरीने माझ्याकडे खूप कीव आल्यागत रागाने पाहिलं आणि मी मान खाली घातली.कामाची सुट्टी झाल्यावर हातपाय तोंड धुताना कस्तुरी खूप बडबड करीत होती.मी काहीच बोललो नाही.मनातून खूप खजील झालो होतो.तिच्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हतो.पण आज कुठेतरी जाणीव झाली होती की कस्तुरी माझ्यावर विश्वास ठेवते.मला जीव लावते.तिलाही मी आवडत असल्याची खात्री झाली होती.
रोजचा निरोप घेताना तिने मान मागे वळवून टाकलेली नजर माझा कायम पाठलाग करायची.रात्रभर कस्तुरी पापणीच्या आड कायम असायची माझ्या.
आज कस्तुरीने मान वळवून पाहिलंच नाही.या दिवशी रात्रभर डोळे झरझर वाहत राहिले.दुसऱ्या दिवशी कामावर हजरी लावली.पायात गणबुट घातले.डांबर रातभर उकळलेले होते.ते ढवळत बसलो.कस्तुरी आली होती.डोक्याला टॉवेल गुंडाळून तिने हातात घण घेतला.आणि ढिगाऱ्यावर उभी राहून दगड फोडायला लागली सुद्धा.दुपार होईपर्यंत कस्तुरीच्या घणाने आज विश्रांती घेतली नव्हती.मी वारंवार तिच्यावर नजर टाकत राहिलो.आज एक क्षण सुद्धा तिने माझ्याकडे पाहिलं नाही.दुपारच्या वेळी तिला आलेला घाम पाहून मी हातात पाण्याची बाटली घेऊन तिच्या जवळ जाऊन मान खाली घालुन उभा राहिलो.ती दगड फोडतच होती.तिने लक्षच दिलं नाही.मी हळूच म्हणालो,”कस्तुरे पाणी घे.”ती थांबली.हातातली बाटली हिसकावून घेतली घण बाजूला उभा केला.एका दगडावर पाय ठेवून ती उभी होती.मान उंचावून तिने ती बाटली तिरकी केली तेव्हा दोन ओठातून आत खळखळ करीत जाणारं पाणी.नरड्यातून आत घुसणारा पाण्याचा आवाज.आणि ओठावरून सांडलेले पाणी तिच्या हुनवटीवरून छातीवर ओघळत चाललेलं.मी काही क्षण तसाच एकटक तिला पाहतच राहिलो.पाण्याची बाटली सगळी संपली.आणि तिने ती बाटली माझ्या तोंडावर फेकली.पुन्हा घण उचलला आणि जोरात घाव एका दगडावर बसला.मी बाटली उचलून तिथून चालता झालो.मागे वळून पहावं वाटलं पण हिम्मत झाली नाही.पण घणाचा आवाज मात्र वाढत राहिला.मी तिला दिलेलं पाणी रोडरोलर वाल्याने हे सगळं पाहिलं.आणि घाणेरडया शिव्या देत तो खाली उतरला आणि भाडखाऊ पोरी बघून पाणी पाजतोस काय म्हणत त्याने मला खाली आपटला आणि लाथा घालायला सुरवात केली.सगळे जमा झाले.पण कुणी मध्ये आलं नाही.मी त्याच्यापुढे फार कमी होतो.तो बडबड करीत अधून मधून लाथा घालतच होता.खाली पडलो होतो.कस्तुरी हे सगळं पाहत होती पण तिने काम थांबवलं नव्हतं.ती जोरात घाव घालत होती.रोडरोलर वाला मी प्रतिकार करीत नाही हे पाहून जास्तच भडकला होता.तो थांबायला तयारच नव्हता.अचानक कस्तुरीच्या हातातून घण खाली पडला.कस्तुरी जोरात ओरडली.हातात जो बसला तो दगड तिने उचलला आणि जोरात धावत आली आणि सरळ दगड जसाच्या तसा त्याच्या डोक्यात घातला.तो खाली पडला.कस्तुरी त्याच्या छातीवर बसली आणि तोंडावर जोरात बुक्क्या मारू लागली.कस्तुरी त्यावेळी खूप जोरात ओरडत होती.मी कसंतरी स्वतःला सावरत मागून कस्तुरीला जोरात ओढलं.त्या रागाच्या भरात कस्तुरीने मलाही बुक्की घातली.
अक्षरशः त्याने तिच्यासमोर दोन्ही हात जोडले तेव्हा ती शांत झाली.ती उठली सगळी गर्दी फक्त कस्तुरीला पाहत होती.माझ्याजवळ आली माझ्या डोक्यावरून हात फिरवून तिने केसात अडकलेली माती झाडली.डोक्याला बांधलेला टॉवेल तिने सोडला आणि तिने माझं तोंड पुसलं.माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं तसं ती जोरात ओरडली.”गप्प बस,रडू नकोस.” असे म्हणत आम्ही दोघेही तिथून निघालो.कारण पुन्हा आम्हाला कामावर कुणी घेईल याची खात्री नव्हती.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या लिंबाखाली आम्ही बसलो.बराच वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही.माझ्या ओठातून रक्त येत होतं.कस्तुरी ती अधून मधून पुसत होती.
बराच वेळ गेल्यानंतर कस्तुरीकडे मी मान वर करून पाहिलं.आज सगळं मनातलं माझ्या जखमी ओठावर आलेलं होतं.हुंदका गिळत तिला म्हणालो,”कस्तुरी तू मला आवडतेस,लग्न करशील माझ्याशी.”यावर बराच वेळ कस्तुरी मान खाली घालून एक काटकी हातात घेऊन मातीत काहीतरी गिरवत होती.ती काहीच बोलली नाही.मावळतीच्या वेळेला कस्तुरीच्या एका गालावर सूर्याची किरणे पडलेली.त्यामुळे माझी नजर तिच्या गालावरून हटतच नव्हती.बराच वेळ झाला तरी कस्तुरी काहीच बोलत नव्हती.मी एक दगड उचलला आणि समोरच्या एका बारीक दगडावर नेम धरला आणि दगड फेकला.नेम बरोबर लागला.तसं मी कस्तुरीकडे पुन्हा पाहिलं.यावेळी कस्तुरी एकटक माझ्या डोळ्यात पाहत होती.तिचे ते मोठे टपोरे डोळे पाण्याने डबडबले होते.ती आतून हुंदकत होती.पण बोलत नव्हती काहीच.
मी तिच्याकडे तसाच पाहत राहिलो.आणि दोन्ही हात अलगदपणे तिच्या दोन्ही गालावर ठेवले.तिच्या डोळ्यातलं पाणी बोटाने हळुवार पुसलं.तिचे डोळे, तिचे गाल, आणि तिचं डोळ्यातलं पाणी, खूप गरम जाणवत होतं मला.कस्तुरीने माझे हात बाजूला केले.आणि खूप मोठ्याने हुंदका देत म्हणाली.”निघ इथून,घरी जा.परत कधीच भेटू नकोस.विसरून जा.”मी तसाच पाहत राहिलो.काहीच कळत नव्हतं.कस्तुरी पुन्हा ओरडली “निघतो की हाकलून देऊ आता तुला.”मी उभा राहिलो.पाठ फिरवली आणि जायला निघालो.तेवढ्यात कस्तुरीने माझा हात जोरात घट्ट आवळून धरला.मी थांबलो.तिच्याकडं पाहून फक्त एवढंच म्हणालो”काय कस्तुरी?”तेव्हा शेवटचं तिने मान उंचावून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली काही नाही.”जा तू.आणि याद राख पुन्हा कधीही भेटू नकोस.कुठे भेट झालीच तर ओळख देऊ नकोस.”निघ ना आता जा असे म्हणत तिने ओठ आतल्या आत गुंडाळून डोळे गच्च मिठले.तेव्हा शेवटचे दोन टपोरे थेंब पडताना मी पाहिले.आणि मी तिथून चालता झालो.फक्त पाय चालत होते.मन तिथंच कस्तुरीजवळ थांबलं होतं.खूपवेळा मागे वळून पाहिलं पण कस्तुरी मान खाली घालून तशीच बसून राहिली होती.
महिना संपून गेला होता.कस्तुरीच्या आठवणी झोप लागू देत नव्हत्या.आज मंगळवार तालुक्याचा बाजार.आवरून बाजारात आलो.दुपार झाली होती.भाजीपाल्याचा बाजार मोठा भरतो आमच्या तालुक्यात.अचानक गर्दीत कस्तुरी दिसली.मन सैरावरा धावू लागलं.थोडसं अंतर राखून तिला चोरून पाहू लागलो.कस्तुरीच्या हातात हिरव्या बांगड्या होत्या.कपाळावर बारीक टिकली.त्यावर कुंकू.डोक्यावर पदर,नाकात नथ आणि हातात दोन भरलेल्या पिशव्या.बिचारीला ते ओझं सहन होत नव्हतं.एक क्षण वाटलं की जावं आणि तिचं ओझं हलकं करावं.पण,तेवढ्यात कस्तुरीला शिवी देऊन कुणीतरी बोलवलं.तशी कस्तुरी घाबरली आणि पदर नीट करू लागली.आणि आवाज आलेल्या दिशेने झपझप चालू लागली.मी एकटक कस्तुरीला पाहत राहिलो.कस्तुरी एका माणसाजवळ थांबली.त्याने आणखी एक पिशवी तिच्या हातात दिली.कस्तुरी ओझ्याने वाकली.मला राग आला.
आज ठरवलं कोण आहे त्याला बाजारात तुडवायचा आणि कस्तुरीला यातून मोकळं करायचं.तिच्या उपकाराची परतफेड होणार नाही पण कधीतरी तिला माझं प्रेम दाखवून देण्याची ही संधी होती.मी पुढं झालो.आणि पाहतो तर काय?आमचे रंगराव मास्तर.आम्हाला पहिली ते चौथी लाभलेले आमचे वर्गशिक्षक.म्हणजे कस्तुरीने मास्तराशी लग्न केले.कस्तुरीने मला पाहिलं.तसं कस्तुरीचे डोळे गच्च भरून आले.माझे पाय तिथेच थांबले.नाईलाज झाला.
कस्तुरीने हातातल्या पिशव्या नीट केल्या आणि रंगराव मास्तरच्या मागे चालू लागली.मला आठवलं हेच ते रंगराव मास्तर यांची बायको वारल्यावर हंबरडा फोडून रडले होते.आणि गावातल्या ग्रामसभेत यांनी केलेली स्त्री मुक्तीची भाषणे सुद्धा मला आठवली.सगळं सगळं आठवत राहिलो.बाजाराच्या गर्दीत कस्तुरी कुठे हरवून गेली कळलंच नाही.आज कळलं मला वाघिणीवाणी लढणारी,तिच्या मनात लपलेल्या मला सांभाळणारी, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी,आणि वेळ आल्यावर स्वतःच्या प्रेमाचा खून करून संपूर्ण आयुष्य मेल्यागत जगू पाहणारी कस्तुरी आज पुरुषप्रधान देशातल्या पुरुषी रस्त्यावरून हतबल होताना निघून जाताना दिसली.
आजही रस्त्याचे काम कुठे सुरू असताना मला कस्तुरी कायम दिसत राहते.आजही बाजारात मला अनेक कस्तुऱ्या पाहायला मिळतात.आणि असंख्य रंगराव मास्तरसुद्धा.
लेखक:- दंगलकार नितीन चंदनशिवे.
मु.पो.कवठेमहांकाळ.
जि.सांगली.
मोबाईल :- 7020909521.
मुख्यसंपादक