Homeकृषीसुगीतील पाहुणे

सुगीतील पाहुणे

साधारण दसरा आला की भात सुगीचे दिवस सुरू होतात.घरातील कर्त्या पुरुषाने आलेल्या भाताची लोंम्ब आणायची,ती भरडून जुन्या तांदळात टाकायची.भात नवं करायचं आणि सुगीला सुरवात करायची असा रिवाज.आधीच पंधरा दिवस खुरपी,दोऱ्या, पोती, सूप याची जुळवाजुळव. जुन्या कणगी,तट्टे, ब्याच्या भाताची टोपली शेणाने सारवून घ्यायच्या.सुगी सुरू होणार म्हंटल्यावर शेतात खळे करण्याची घाई सुरू व्हायची.खळ्याच्या जागा वर्षानुवर्षे ठरलेल्या असायच्या.भांगलुन,सारवून खळे तयार झाले की मग भात कापणीचा दिवस ठरायचे.बायकांनी दिवसभर भात कापायचे,पुरुषांनी ते भारे बांधून खळ्यावर आणायचे आणि व्हळी रचायची. जेवणात वरण्याची डाळ,गोलमा,खारी मासळी,बांगडा,खर्डा असा चमचमीत बेत असायचा.दिवसभर भात कापून झाले की रात्री किंवा पहाटे मळणीचे नियोजन असायचे.मळणीला आठदहा जण गोळा करायचे.घरातील एकादा कोंबडा कापून पावणेर चा बेत असायचा,दिवसभराचा शिणवटा घालवायला थोडी दारूची पण सोय केली जायची.खळ्यावर गोलाकार भात पसरून तीवड्याला बांधलेली बैलांची दावन फिरायला सुरू व्हायची.मळणी सुरू झाली की बैलांच्या मागे शेण धरण्याऱ्याची कसरत बघण्यासारखी असायची.सकाळी झुंजूमंजू होईपर्यंत या मळण्या सुरू असायच्या.पिंजर बाजूला करून मळलेले भात गोळा करायचं,सकाळी भात वाळत गाळून वारं द्यायचे काम बायका करायच्या. वाळलेल्या भाताची रास करायची,त्यावर नारळ ठेवायचा,शेतातील राखण करणाऱ्या देवाला नारळ,दहीभात नैवेद्य दाखवून असच घर धान्याने भरुदे,पोराबाळाणा,गुराढोरांना चांगलं ठेव म्हणून हात जोडायचं. शहाण्यासुरत्या माणसानं लाभ,दोन,तीन भात मोजायचे,पोती भरायची.
बलुतेदारी पद्धतीने गावगाडा सुरू असायचा,वर्षभर लागणारी शेतीची औजारे तयार करणारे सुतार,लोहार लोक खळ्यावर भात न्यायला यायचे.देवाच्या पालखीचे मानकरी असणारे हरिजन,मातंग,नाभिक,गुरव असे सर्वच लोक खळ्यावर भात न्यायला यायचे.सुगीचे दिवस म्हणजे उत्साह. शेतरयांची घरे धान्याने भरून जायची.धान्य हीच त्यांची संपत्ती. वर्षभर पुरेल इतके धान्य ठेवून उरलेले विकायचे आणि संसाराची गाडी चालवायची,तक्रार कुणाकडे करायची नाही असा हा शेतकरी राजा.आयुष्यभर काळ्या आईची सेवा करायची इतकंच त्याला ठाऊक. मोबदल्याची अपेक्षा न करणारा हा जगाचा पोशिंदा. निसर्गाने भरपूर दिले तर त्याचे उपकार मानणारा आणी नुकसान झाले तर कधीही त्याला दोष न देणारा त्याच्यासारखा सहनशील फक्त देवचं असू शकेल.
याच सुगीच्या दिवसात दरवर्षी प्रमाणे येणारे पाहूनेही कांही कमी नसायचे.पहाटेच हातात चिपळी घेऊन वसुदेवाचे आगमन व्हायचे.सकाळच्या मंगल वातावरणात त्याचे सूर आपोआप उठायला लावायचे.त्याची मोरपिसाची टोपी बघायला फार आवडायचे. स्वतःचे भविष्य टांगणीला असून देखील पिंगळा जोशी मात्र लोकांचे भविष्य सांगायला गावात हमखास यायचा.अस्वलाच्या नाकात दोरी घालून दरवेशी प्रत्येक घरात यायचा.सोबत अस्वलाच्या केसांची पेटी पण विकायला आणायचा. लहान पोराच्या गळ्यात ती पेटी बांधली की पोरं झोपेत घाबरत नाहीत अशी श्रद्धा होती.लाडलक्ष्मी आली की अंगावर काटा मारायचा.पाठीवर चाबकाचे फटके मारून घेणारा तो माणूस,डोक्यावर देव्हारा घेतलेली उंचीपूरी,कापळभर कुंकू,हिरवीगार साडीतील बाई आणि देव्हाऱ्यात बसलेली ती कडकलक्ष्मी ची मूर्ती मनात भीती निर्माण करायची.पोट भरण्यासाठी पाठीवर फटके खाणारी ही माणसं.
पिढ्यानपिढ्याची माहिती सांगणारे हेळवी पुढच्या दाराला पाठ लावून बसायचे आणि काय सांगायचे ते देखील कधीकधी कळायचे नाही.त्यांना सुपातून भात द्यायचे आणि मागील अनेक कुळीची माहिती घायची.त्यांची ठेवण,संकलन अफलातून असायचे.या दिवसांत हमखास करमणूक करणारे डोंबारी,कोल्हाटी लोक चावडीजवळ यायचे लहान मुलांचे धाडसी खेळ बघून सगळेच घाबरून जायचे.धान्य,पैसे जे मिळेल ते घ्यायचे आणि रोज एका गावचा प्रवास करत ही मंडळी फिरायची.कणगी,तट्टे,बुट्ट्या, भाकरीची थाबडी वळणारे कोरवी लोक तर माझ्या गावचे हक्काचे पाहुणे.गेली कित्येक वर्षे ही कुटुंबे शाळेजवळ असणाऱ्या वडाखाली उतरतात. दोनतीन महीने या ठिकाणी थांबून वर्षभर पुरेल इतका धान्याचा साठा हे लोक इथे गोळा करतात.भातावर गारेगार विकणारे,बॉम्बे मिठाईवले,फुगेवाले हमखास सुगीत येणारे हे पाहूणे. झिंगे, गोलमा,खारी मासळी विकणाऱ्या बायका या दिवसात यायच्या.सुया,दाबन,दोरा, फणी घेऊन येणारी नंदीबैलवाली हौसाबाई ही तर आमच्या गावची हक्काची पाहुनी(हौसाबाई चा विशेष लेख मी गेले वर्षी लिहिला आहे) शेणगाववरून मातीच्या चुली,मडकी,घेऊन येणारे कुंभार हेदेखील सुगीतील आग्नतुक पाहुनेच. वयाच्या सत्तराव्या वर्षीदेखील पाठीवर खोबरेल तेलाचा डबा,हातात मोजायला माप घेऊन येणारा रामू तेली आजही नजरेसमोर आहे.हा तेली कोकणातील नरडवे गावचा.गारगोटीत सुताराच्या घरात मुक्काम करायचा आणि खेडोपाडी खोबरेल तेल विकायचा.उतारवयात देखील त्याची जिद्ध फार मोठी होती अलीकडे नाही आला बरेच वर्ष.दसऱ्याच्या सणात पालखी सोबत वाजवणारे वाजंत्री,गोंधळी सुगीतील हक्काचे पाहुणे.अश्या कितीतरी पाहुण्यांनी गाव गजबजून जायचे.शेताशिवारात चैतन्य निर्माण व्हायचे.स्वतः राबून गावात येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना मुठफसा धान्य देऊन त्यांचे समाधान करणारा हा शेतकरी खरंच जगाचा पोशिंदा आहे.

http://linkmarathi.com/आणि-कविता-जिवंत-राहिली/


आता ते दिवस राहिले नाहीत.ऊसशेतीचे प्रमाण वाढले.आपल्या कुटुंबाला पुरेल इतके भात करायचे अशी पद्धत सुरू झाली आहे.यांत्रिक शेती सुरू झाली,रात्रीची मळणी बंद झाली.ती ओढ संपली,गोडवा संपला, सुगी कधी सुरू झाली आणि संपली हे देखील कळत नाही.खळी बंद झाली,पावणेर बंद झाले,मळण्या बंद झाल्या आणि सोबतच गावात येणारे पाहूणेही बऱ्याच प्रमाणात कमी।झाले.


अंबादास देसाई ,म्हसवे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular