Homeवैशिष्ट्येकरावी वारी डोळा पहावी पंढरी

करावी वारी डोळा पहावी पंढरी

कोरोनामुळे दोन वर्षापासून वारी बंद होती. या काळात वारकरी बेचैन होता. कधी कोरोना जाईल आणि माझ्या पांडुरंगाची मी भेट घेईल अशी त्याची अवस्था झाली होती. वारकऱ्यांचा जीव तळमळत होता विठ्ठलाच्या भेटीसाठी.

  • धाव पांडुरंगा जावू दे कोरोना /
    पाहीन चरणा आवडीने //
    जीव कासावीस भेटीसाठी तुझ्या /
    ध्यानी मनी माझ्या विठ्ठलच //
    वारकऱ्यांच्या प्रार्थनेला यश आले. हे कोरोनाचे संकट निवारण झालं. दोन वर्षानंतर पुन्हा ही वारी मोठ्या जोमाने सुरू झाली. यंदा पंढरीची वारी मोठ्या उत्साहाने सुरू आहे. वारकऱ्यांच्या मुखावर हास्य आहे. ज्ञानदेवे रचिला पाया / भिंत उभारली नामदेवे //
    तुका झालासे कळस / शेख महंमद झेंडा रोवला//
    युगानुयुगापासून सुरू असलेली ही वारी संतांनी मोठ्या उत्साहाने सुरू केली. समाज एकत्र आला तरच क्रांती होऊ शकते. यासाठी सर्व समाजाला वारीसाठी संतांनी हाक दिली. ‘तीर्थक्षेत्र पंढरपूर ते आपले माहेर.’ आपल्याला या माहेरी जायचे आहे. या हाकेला सर्वजण धावून आले. संत त्यांना आपलेसे वाटले. प्रपंच करून परमार्थ करता येतो हा त्यांनी संदेश दिला. समाजात भक्ती, ज्ञानाचा, समतेचा, एकतेचा प्रचार, प्रसार केला. सगळा वैष्णवांचा मेळा पंढरपुरात येऊ लागला. अभंग, किर्तन, प्रवचन, भजनात दंग झाला.
    या रे या रे लहानथोर / चला जावूया पंढरपूर //
    पांडुरंगा व्यापिले चराचर / करू विठू नामाचा गजर //
    भेदाभेद नसे वारी / काला खाऊ चंद्रभागातीरी //
    होऊ भक्तीत दंग / म्हणा पांडुरंग पांडुरंग //
    प्रसन्न होईल मनमंदिर / भेटेल शारंगधर //
    या वारीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीला येतात. आषाढी कार्तिकीला ही वारी असते. आषाढी एकादशीच्या वारीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूर पर्यंत पदयात्रा करत जाणे. चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे. हीच वारकऱ्याची मनोभावे इच्छा असते. यातून अध्यात्मिक सुखाची वारकरी अनुभूती घेतो. वारी म्हणजे चैतन्य, वारी म्हणजे ऊर्जा, वारी म्हणजे वारकऱ्यांचा जीव की प्राण. घरचे कितीही मोठे कार्य असू द्या परंतु तो वारी चुकवत नाही. शेतकरी शेतात पेरणी करून वारीत जातो. पाऊस नाही आला तर तो पेरणी न करता तसाच जातो परंतु वारी चुकवत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पालख्या येतात. त्यातील आळंदीवरून ज्ञानेश्वरांची. देहूवरून तुकोबाची, वाहिरा येथून संत शेख महंमद महाराजांची, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची, पैठणवरून एकनाथांची , अशा सर्व संतांच्या गावांमधून मोठ्या प्रमाणात दिंड्या निघतात. तशा प्रत्येक गावातून दिंड्या निघतात.
    पंढरीची वारी म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. तशी ती सांस्कृतिक परंपरा सुद्धा झाली आहे. समस्त महाराष्ट्राचे दैवत विठोबा आहे. सर्व जाती-धर्माचे लोक या वारीत सहभागी होतात. वारी ही शिस्तबद्ध चाललेली असते. पुढे पताका घेऊन चालणारे झेंडेकरी, त्यांच्या पाठीमागे तुळशी कळशी घेऊन चालणाऱ्या वारकरी माता-भगिनी. मध्यभागी रथात पालखी असते. पाठीमागे काकडा , ओव्या ,हरिपाठ , भजन म्हणणारे वारकरी टाळकरी असतात. तहान भूक विसरून विठ्ठल भेटीच्या ओढीने ते चाललेले असतात. ध्यानी, मनी , स्वप्नी विठ्ठलच असतो. पंधरा दिवस हा एक त्याग असतो. वारीत दुपारी प्रवचन, संध्याकाळी कीर्तन असते. गावोगावी वाटेत अन्नदान करणारे अन्नदाते वारकऱ्यांना अन्नदान करतात. वारकऱ्यांची सेवा करतात. खरच ही वारी एक अद्भुत असते. तो आनंद आगळा वेगळा असतो. तो पंढरीचा सोहळा पाहून मन प्रसन्न होते.
    मनोभावे करावी वारी / डोळा पहावी पंढरी //
    दुःख दैन्य हरवते / वारी जीवन घडवते //
    ( लेखक – श्री किसन आटोळे
    संत शेख महंमद महाराज चरित्रकार

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular