” तुला कोणता फ्लेवर आवडतो “..?
एवढ्यापुरताच तो तिच्या फेवर मध्ये असतो..
बाकी त्याच्या पुरुषत्वाचा फिवर,
अजूनही तिला
कोणत्याच थर्मामीटर मध्ये,
मोजता आला नाही..
” बापाच्या मिठीवर शंका घेणारी पैदास “
पैदा झाल्यापासून
तिला कोणताच पुरुष
मनोभावे पुजता आला नाही..?
सिगारेट चे चटके देऊन
कोर्टाची पायरी चढून आलेल्या शाहिराने,
आत्ताच डफावर थाप देऊन,
जगाचं पाप सांगणारा
स्त्री मुक्तीचा पोवाडा गायला आहे..
रावणाने तर,
साधा स्पर्श ही केला नाही सीतेला,
पण सीतेची खरी परीक्षा रामानेच पाहिली आहे…
” परक्या घरचं धन “
ह्या एकाच वाक्याच्या ओझ्याखाली
तिच्याच माणसांनी तिला,
लुटारुंच्या हवाली करावं..?
आणि तिनेही स्वतःला हसत हसत लुटू द्यावं..?
” दिल्या घरी सुखी रहा “
हा आशिर्वाद सुद्धा किती फसवा असतो ना..
मनाच्या काळोखात
शंकेची चुकचुकणारी पाल
आणि
भितीचा चकचकणारा काजवा असतो ना..?
पांढऱ्या शुभ्र आभाळात मनसोक्त उडणारे
आनंदी पक्षी,
खटकतात इथल्या समाजाला..
माणसाचा मुखवटा लावलेल्या
दोन पायांच्या श्वापदांची
भूक सुद्धा
दोन पायांच्या मधेच असते…
‘ मादीभक्षी ‘ नर कुठले…
गुणधर्म बदलत नाही
माहीत असूनही
तिच्या पिढ्यांपिढ्या कार्ल्यालाच साखर चारतात,
स्वतःच्याच जखमेवर
स्वतःच फुंकर घालतात..
आणि
हुंदका दाबून सांगत राहतात पुढच्या पिढीला..
” सगळेच पुरुष सारखे नसतात बायांनो “
- सुमित गुणवंत (अहमदनगर )
मुख्यसंपादक