आज जागतिक टपाल दिन,योगायोग असा की आज अनेक वर्ष्यानी माझ्या घरी पोस्टमन पोस्टकार्ड घेऊन आले,माझा मुलगा आदित्य सहावीत शिकत आहे. त्याच्या मित्राने हे पत्र लिहून पाठवले आहे.वाचून खूप अप्रूप वाटले.गावामध्ये कांही घरात टेलिफोन आले आणि साधारणपणे वीस वर्षे झाली पत्रांचा प्रवास हळूहळू कमी होत आला.अलीकडच्या काळात मोबाईल आल्यानंतर हा प्रवास जवळजवळ थांबला असंच म्हणावं लागेल. आज पत्र वाचून कांही पत्रव्यवहार नजरेसमोर आले म्हणून हा खटाटोप.
मराठी शाळेत असताना पत्रलेखन शिकवले गेले.आणि अनेकवेळा ही पत्र लिहावी लागली.माझे आजोबा आमदार आण्णा हिंदी पंडित होते, कविता खूप छान करायचे,पण अक्षर किचकट होते.त्याकाळी आमदार आण्णा,निवासराव देसाई(आण्णाजी)व शिंदे सरकार ही मंडळी नेहमी एकत्र बसून गावातील अनेक गैरसोयी आहेत त्याविषयी सरकारला(महाराष्ट्र शासनास) पत्रव्यवहार करायचे ,ही सगळी पत्र मी लिहून देत असे,कार्बन घालून एका वेळी चार प्रति काढून ही मंडळी पाठवत असे,हे लोक सरकारला पत्र पाठवतात या गोष्टी माझ्या बालमनाला खूप भावायच्या.सरकारकडून बरेच वेळा उत्तर यायचे,त्यावेळी शासन आणि प्रशासन मध्ये प्रामाणिक काम करणारे लोक खूप होते असे वाटायचं.मिल्ट्री मध्ये काम करणारे अनेक जवान घरापासून हजारो किलोमीटर अंतरावर असतात,त्यांना घरच्या लोकांना संपर्क करण्याचे एकमेव साधन पत्र होत.माझ्या शेजारी सांडूगडे नावाचे मिल्ट्रीत जवान होते,त्यांच्या घरी त्यांची पत्नी,आईवडील, मुले असायची.तिला आम्ही आबई म्हणायचो,त्याकाळी आपल्या आईच्या वयाच्या महिलांना एकेरी हाक मारताना कांही वाटत न्हवते,त्यात प्रेम,आपुलकी,जवळीकता होती.आबई माझ्याकडून पत्र लिहून घ्यायची,मी काय काय लिहायचे ते विचारून लिहायचो,इतक्या दूर काम करण्यास गेलेल्या पतीने वर्षात एकदा यावे असाच कांहींसा भाव असायचा,मग सुट्टी मिळावी म्हणून अनेक खोटी कारणे लिहावी लागायची,मामा आजारी आहेत,संदीप आजारी आहे,घरफाळा भरायचा आहे,पावसाळी बाजार करावा लागेल, पत्र मिळताच सुट्टी घेऊन लवकर यावे,अस कांहींसा मजकूर असायचा.आलेली उत्तर आबई माझ्याकडून वाचून घ्यायची,मोबदला म्हणून कायतरी खायला द्यायची.
मी दहावीला होतो,परीक्षा फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे न्हवते,माझा एक मित्र,नातेवाईक संजू साळोखे, गिरगाव(कोल्हापूर) हा मिल्ट्रीत होता,त्याला मी माझी अडचण लिहून पाठवली,मला आजही त्याने मला पाठवलेले पत्र आठवणीत आहे.त्याने आंतरदेशीय पत्रातून मला 200 रु पाठवले होते.ती आठवण आली की मन आजही गहिवरून येते.त्याकाळी वर्तमानपत्र अगदी मोजक्या घरात यायचे,वाचकांचा पत्रव्यवहार नावाचे एक सदर असायचे,या सदरात देखील अनेक पत्रव्यवहार मी केले होते,माझी अनेक पत्र नावासह पेपरमध्ये छापून आली होती, ती वाचताना खूप समाधान वाटायचे.माझ्या बहिणीने पन्हाळा तालुक्यातील नावली गावातून पाठवलेली बरीच पत्र माझ्या आजही आठवणीत आहेत,त्यातील मजकूर,अक्षर देखील माझ्या नजरेसमोर जसेच्या तसे आहे .कॉलेज जीवनामध्ये या पत्रात आणखी एका पत्राची भर प्रत्येकाच्या आयुष्यात पडायची,त्या पत्राला प्रेमपत्र म्हणायचे,फार भावनिक,गुंतागुंतीचा हा विषय असायचा,त्यावेळी प्रेमपत्र लिहून जिच्यावर आपण प्रेम करतो तिला प्रत्यक्ष देण्याचे अघोरी धाडस पण कांही मंडळी करायचे,त्यांच्या धाडसाला सलाम ठोकावा अस वाटायचं .मी आणि सतीशने एकदा आमच्या एका मित्रासाठी तो प्रेम(अर्थात एकतर्फी)करत असलेल्या मुलीला पत्र लिहिण्याचे काम केले होते. प्रिय…..तुला प्रिय म्हणायचा मला नैतिक अधिकार नाही,पण तुझ्यावर प्रेम करतो म्हणून प्रिय लिहिले आहे,राग आला असेल तर माफ कर, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं असेल तर मला कळव वगैरे वगैरे गोष्टी लीहिल्या होत्या.आणि हे पत्र देण्यासाठी आम्ही तिघे शूरवीर गेलो,पण जशी ती मुलगी जवळ आली तशी आम्ही सायकल दुप्पट स्पीड लावून पळवली आणि या संकटातून बाहेर पडलो याचा मनोमनी आनंद लुटत होतो. आम्ही त्या मित्राला ते पत्र तिला देणासाठी फार बळजबरी केली, त्याचाही नाईलाज झाला आणि त्याने ते अघोरी धाडस केले, पुढचे दोन दिवस आम्ही घाबरून कॉलेजमध्ये गेलो नाही.या आनंदात आम्ही मित्राकडे पार्टी मागायला सुरवात केली,त्यानेही देतो अस म्हणत आठ दिवस लावले,आमचा तगादा जसा वाढत गेला तस त्याने मी लिहून दिलेले आणि याने पुस्तकात लपवून ठेवलेले चोळामोळा झालेले ते प्रेमपत्र माझ्या हाती दिले आणि म्हणाला तुम्ही सोबत असताना जे धाडस झाले नाही ते मला एकटा असताना कस होईल?पार्टी आणि पत्र या सगळ्यातून आम्ही सर्वजण सुखरूप बाहेर आलो याचा आनंद झाला,पण हसुन हसून बेजार झालो,दोन दिवस कॉलेज चुकवल आणि आठ दिवस ती मुलगी दिसली की छाती धडपड करायची हे दुखणं उगाच लावून घेतलं अस झालं होतं
कांही पत्रातील मजकूर फार विनोदी वाटायचे,मी स्पेअर पार्ट दुकानात कामाला होतो, त्या दुकानात दिल्लीतून माल यायचा,तो व्यापारी येणार असेल तर अगोदर महिनाभर तो पोस्टकार्ड पाठवायचा,coming 7 dec इतका तो मजकूर लहान असायचा.किंवा आता पत्रास कारण की तुमचे पत्र मिळाले,वाचून आनंद झाला,इकडील सर्व मंडळी बरी आहेत,तुम्ही कसे आहात ते कळवावे,कोल्हापूरची तारूआज्जी परवा वारली,भातकापनी सुरू झाली आहे,माणसे मिळत नाहीत,अजून अजून गावंदर कापायला आली नाही,मोठी म्हैस आठ दिवसांपूर्वी व्याली,रेडा दिला आहे,मागच्या वेळी पण रेडा दिला होता मला वाटलं होतं यावेळी रेडी देईल पण नाही.बाकी तुमचं काय चाललंय,मोठ्यांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, पत्र पुरे करतो,उत्तर पाठवा,वाट बघत आहे,इतका मोठा मजकूर देखील असायचा,ही सगळी पत्र त्या पेटीत टाकताना आपलं तोंड कायम उघडून बसलेली ती पेटी खूप भारी वाटायची,गावात चावडीत, मध्यवर्ती ठिकाणी या पेट्या होत्या,आतमध्ये फार फार मोठा खजिना आहे असं वाटायचं, त्या उघड्या तोंडातून आत हात घालण्याचा बरेचदा प्रयत्न केला पण जायचा नाही,हे माहीत असूनदेखील बरेचदा हा प्रयोग केला होता.
या सगळ्यात एक प्रेम होतं,जिव्हाळा होता,वास्तववादी जीवन होत,एकेक पत्र चारचार वेळा प्रेमाने,काळजीने वाचलं जायचं.अनेक सुखदुःख वाटण्याचे आणि वाटून घेण्याचे ते माध्यम होत.पत्र लिहिणारा समोर आहे ,आपल्याशी बोलत आहे असं वाटायचं,इतकं ते निखळ,निर्मळ होत.प्रेम,आपुलकी, काळजी, जिव्हाळा,आत्मीयता, सुखदुःख सगळं सगळं त्यात होतं
मोबाईल आले,इंटरनेट आले,हळूहळू हा पत्रलेखन प्रवास बंद होत आला,आभासी जग निर्माण झालं,भावना कोरड्या झाल्या,मित्र,पाहुणा समोर दिसला की आम्ही बोलायचं कमी केलं आणि त्याला फोनवरून शुभ सकाळ असे संदेश देऊ लागलो,सगळं व्यवहारी झालं,प्रेम कमी झालं,माणसं भावना शून्य होत गेली.फक्त दिखाऊपणा सुरू झाला.पत्राचा प्रवास थांबला तसं प्रेम कमी होत गेलं.आज घरी आलेलं पत्र वाचून आठवणी जाग्या झाल्या, आठवणी या वारुळातील मुंगीसारक्या असतात,एक मुंगी वर आली की हजरो येतात,त्यातील कांही आठवणी लिहिण्याचा हा प्रयत्न केला आहे.
✒️अंबादास देसाई,म्हसवे
मुख्यसंपादक