Homeघडामोडीजंतनाशक गोळ्या अंगणवाडीपर्यंत वेळेत पोहचवा-जिल्हाधिकारी अमोल येडगे

जंतनाशक गोळ्या अंगणवाडीपर्यंत वेळेत पोहचवा-जिल्हाधिकारी अमोल येडगे

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून आरोग्य विभागाचा आढावा

कोल्हापूर, दि. 8 : दिनांक 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो. या दिवशी 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला मुलींना जंतनाशक गोळी देवून विशेष मोहीम राबविली जाते. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील मोहिमेत सहभागी आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांपर्यंत वेळेत जंतनाशक गोळ्या पोहचवा, असे निर्देश दिले. 1 ते 19 वयोगटातील मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे यासाठी या गोळ्या सर्वांना आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

1 ते 19 वयोगटातील शाळेत जाणाऱ्या सर्व बालकांसाठी व किशोरवयीन मुला मुलींसाठी, शासकीय अनुदानित व विना अनुदानित सर्व शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये व अंगणवाडी केंद्रांमध्ये 13 फेब्रुवारी रोजी शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना (6 ते 19 वर्षे वयोगट) जंतनाशक गोळ्या देतील. या काळात आजारी व अन्य औषधे घेणाऱ्या बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार नाहीत. ते बरे झाल्यानंतरच गोळ्या दिल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या मोहिमेत सहभागी यंत्रणा यात आरोग्य विभाग, महिला व बालविकास, शिक्षण, ग्रामपंचायत तसेच पाणी पुरवठा विभाग यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामस्तरावर आवाहन करावे, पालकांना माहिती द्यावी तसेच ऊसतोड कामगारांची बालके यांच्यापर्यंत गोळ्या पोहचतील, असे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

जंतनाशकाचे फायदे- रक्तक्षय कमी होतो व आरोग्य सुधारते, बालकांची वाढ भराभर होते व ती निरोगी बनतात,
अन्य संसर्गांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते, शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होते, बालकाची आकलनशक्ती सुधारते व ते शाळेत अधिक क्रियाशील बनतात, मोठेपणी काम करण्याची व दीर्घकाळ अर्थार्जन करण्याची क्षमता वाढते, महत्त्वाचे अप्रत्यक्ष फायदे समाजातील व्यक्तींना जंतनाशकाच्या उपचाराची आवश्यकता भासत नाही कारण परिसरातील जंतांची संख्या कमी होते.


अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular