HomeघडामोडीCMMRF मध्ये गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कक्षानेच उचललं कडक पाऊल; गैरप्रकार करणाऱ्यांना...

CMMRF मध्ये गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कक्षानेच उचललं कडक पाऊल; गैरप्रकार करणाऱ्यांना दणका

CMMRF मध्ये गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कक्षानेच उचललं कडक पाऊल; गैरप्रकार करणाऱ्यांना दणका

वैद्यकीय मदतीत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करताच रुग्णालयांवर ‘संक्रांत’; कक्षाकडून कठोर पाऊल

CMMRF मधून बोगस निधी मिळवण्याचा प्रयत्न केल्यास बसणार दणका; कक्षाच्या पथकांकडून अचानक भेटी

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात २०२२ मध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला (CMMRF) नवसंजीवनी मिळाली आणि या कक्षाच्या कामाचा वेगाने विस्तार झाला. या कक्षातून मिळणाऱ्या अर्थसाहाय्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अवघ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात तब्बल १८० कोटी रुपयांहून अधिकचे अर्थसाहाय्य गरजू रुग्णांना वितरीत करण्यात आलं आहे. मात्र या कक्षाच्या कामाची व्याप्ती वाढवत असतानाच या कक्षातून दिल्या जाणाऱ्या निधीचा गैरउपयोग होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडूनच खबरदारी घेतली जात असून एका पथकाद्वारे या कक्षांतर्गत येणाऱ्या राज्यभरातील रुग्णालयांमध्ये अचानक भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. तसंच बनावट कागदपत्रांद्वारे अर्थसाहाय्य मिळवण्याचा प्रयत्न होत असेल तर संबंधित रुग्णालयाला थेट ब्लॅकलिस्ट करण्याचा कठोर निर्णय घेतला जात आहे.

वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या कामाची व्याप्ती वाढवली जात असताना बनावट कागदपत्रांचा वापर करून निधी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश येऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तात्काळ पावलं उचलत यापूर्वीच पथक तयार करत या कक्षाच्या अखत्यारित येत असलेल्या रुग्णालयांमध्ये अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेण्यास सूचित केले होते. त्यानुसार कार्यवाही केली जात असून अनेक ठिकाणी असा गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. तसंच सदर रुग्णालयांना ब्लॅकलिस्टही करण्यात आलं आहे.

दरम्यान, जे रुग्णालय किंवा संशयित व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यासंबंधित माहिती लोकांसाठीही उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून मिळणाऱ्या मदतीत विक्रमी वाढ होत असताना या कक्षाचा कारभारही अधिकाधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत असलेल्या कुठल्याही रुग्णालयाच्या माध्यमातून अनुचित प्रकार आढळल्यास रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष – (022) 22026948/22025540

आवाहन! आवाहन !!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गंभीर किंवा दुर्धर आजारांवरील उपचारासाठी गरजू रुग्णांना दिल्या जाणाऱ्या मदतीची/अर्थसहाय्याची प्रक्रिया ही पूर्णतः निशुल्क आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व गरजू रुग्णांनी/ रुग्णांच्या नातेवाईकांनी याची विशेष नोंद घ्यावी.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामध्ये गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची आर्थिक देवाणघेवाण होत नाही.

महाराष्ट्रातील तमाम रुग्णसेवकांना तसेच वैद्यकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन करण्यात येते की, “रुग्णसेवा” हे पवित्र कार्य असून या कार्याला डाग लागेल अशा पद्धतीचे कोणतेही गैरवर्तन करु नये. असे आढळल्यास आपल्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या योजनेशी अंगीकृत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांना सुचित करण्यात येते की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णाच्या उपचारासाठी आपणास प्राप्त होणारी रक्कम, ही संबंधित रुग्णाच्या उपचाराकरिता पूर्णतः उपयोगात आणावी. टीडीएस व अन्य चार्जेसच्या नावाखाली, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्राप्त झालेल्या रकमेत आर्थिक अपहार करु नये. ही कारणे देवून रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल करु नये. असे निदर्शनास आल्यास संबंधीत रुग्णालयाचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे अंगीकरण कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल व संबंधीत रुग्णालयाचा काळ्या यादीत समावेश होईल, याची सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी.

अशाप्रकारच्या गैरवर्तणूकीच्या घटना महाराष्ट्रात कोठेही घडल्यास, रुग्णांनी अथवा रुग्णांच्या नातेवाईकांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीशी संपर्क साधावा.

मंगेश नरसिंह चिवटे
कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular