गडहिंग्लज (प्रतिनिधी)- ‘रोटरी क्लब’ गडहिंग्लज आयोजित बांबू लागवड कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवराज कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडहिंग्लजच्या रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष दीपक मांगले होते. तर उपविभागीय कृषी अधिकारी विनायक देशमुख, अँड दिग्विजय कुराडे आणि बांबू तज्ञ अरुण वांद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वांद्रे यांनी बांबूच्या जाती, जमिनीची निवड, पाणी पद्धत, खते, लागण करण्याची वैज्ञानिक पद्धत, तोडणीसाठी लागणारा कालावधी, स्थानिक, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यांची सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी त्यांनी बांबूच्या वेगवेगळ्या प्रजातीचे बांबू, ब्रश, डायरी, पेन, सॉक्स, दागिने आदी वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या.
देशमुख यांनी बांबूसाठी शासनाचे धोरण तसेच अनुदान याविषयी सविस्तर माहिती सांगितली व उपस्थित शेतकऱ्याच्या शंकांचे निरसन केले. शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव लवकरच एक दिवसीय कार्यशाळा घेण्याचेही निश्चित करण्यात आले.
दीपक मांगले यांनी बोलताना ‘रोटरी’ बांबू लागवडीसंदर्भात प्रतिवर्षी कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांची मजुरापासुन सुटका करेल असे आश्वासन दिले. कमी श्रमात आणि पाण्यात, एकदा लागवड केल्यानंतर पन्नास वर्षे पुन्हा त्रास न देणाऱ्या पिकाचा शेतकऱ्यांनी विचार करावा असे आवाहन केले.
बाळ पोटे पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर धनाजी कल्याणकर यांनी आभार मानले. यावेळी बाबासाहेब आजरी, अमरनाथ घुगरी, राजू मोळदी, राम पाटील, सतीश कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इव्हेंट चेअरमन सुधाकर गवळी, जितेंद्र रनणवरे, राम दुरुगडे, सचिन शेंडगे, अश्वत्थामा रेडेकर, डॉ. अमोल पाटील, सुमित देसाई यांच्यासह अन्य रोटेरीयन्स यांचे सहकार्य लाभले.
मुख्यसंपादक