आजरा (हसन तकीलदार):- गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येक गावातील गणेश मंडळ आणि जागरूक नागरिकांनी घेण्याचे तसेच उत्सवाच्या काळात कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, सामाजिक उपक्रम, सामाजिक सौहार्द वाढवणारे, जनजागृती करणारे कार्यक्रम करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शांतता समिती बैठकीत पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले.
गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, तहसीलदार समीर माने, सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक पार पडली. मार्गदर्शन करताना सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर म्हणाले की, तालुक्यात 114 गणेश मंडळे आहेत प्रत्येक मंडळाने मंडपाजवळ सी सी टी व्ही कॅमेरे लावा. मार्गाची पाहणी करून मूर्तीची उंची किती असावी हे निश्चित करा. ज्या ठिकाणी गर्दी होते त्याठिकाणी शक्यतो महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा. आक्षेपार्ह देखावे, बॅनर टाळा, समाजप्रबोधन व सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम आयोजित करा. सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारे पोस्ट टाकू नका. आवाजाच्या मर्यादेचे पालन करा. त्याचबरोबर या वर्षीपासून गणराया अवॉर्ड सुरु करणार असलेने पारंपरिक वाद्य, एक गाव एक गणपती, सामाजिक संदेश, पर्यावरण वाचवण्याबाबत, अंमली पदार्थ विरोधी संदेश तसेच सी सी टी व्ही यासारखे निकष पूर्ण करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार समीर माने म्हणाले की, नकारात्मक गोष्टी करू नका. जर एखादी आक्षेपार्ह घटना घडत असेल तर पोलीस पाटलांनी किंवा संबंधितांनी त्वरित संपर्क साधा. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध शासकीय योजनांची माहिती, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करा. मंडपाजवळ याची सोय करा. कोणतीही अडचण असेल तर संपर्क साधा अडचणीचे निरसन करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी मागील वर्षी कोणकोणत्या अडचणी आल्या ते सांगण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे गणेश मंडपात कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नका, जुगार किंवा माध्यप्राशन सारख्या गोष्टी टाळा, गैरकृत्य करू नका, महाप्रसादाचे शिल्लक पदार्थ योग्य असतील तरच गरीब किंवा जनावारांना द्या. नसतील तर ते खड्डा काढून गाडून टाका, स्पीकर लावताना नियमांचे पालन करा, आपल्यावर अथवा आपल्या मंडळावर कारवाई होणार नाही याची दक्षता घ्या. लेझर शो वापरू नका, महिला व मुले यांची स्वयंसेवकांनी काळजी घ्या. झाडांच्या फ़ांद्या, विजतारा याची अडचण येणार नाही याची दखल संबंधित खात्यानी घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. बाप्पांच्या उत्साहात सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करा. जेणेकरून समाजात व इतर गावात देखील एक चांगला आणि आगळा वेगळा संदेश जाईल. पोलीस प्रशासन हे जनताभीमुख आहे. समाजाच्या भल्यासाठी कायद्याची सांगड घालून पोलीस प्रशासनाला रात्रंदिवस काम करावे लागते त्यामुळे गणेशोत्सव काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे आणि कारवाईची कटुता टाळावी असे त्यांनी मार्गदर्शन केले.
महवितरणाच्या वतीने संतोष डोंगरे यांनीही काही मार्गदर्शक तत्वे मांडली. मंडप वगैरे इलेक्ट्रिक पोलला बांधू नका, विजदिव्यांच्या खाली मंडप घालू नका,आणताना किंवा विसर्जनासाठी निवडलेल्या मार्गाची कल्पना महामंडळाला द्या जेणेकरून काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यास मदत होईल, मूर्तीची उंची किती आहे ते महावितरणाला कळवा त्यानुसार नियोजन करता येईल असे त्यांनी सांगितले. तर गांधीनगर गणेश मंडळाचे पदाधिकारी आकाश शिंदे यांनी परोली बंधाऱ्यावर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात कारण याठिकाणी विविध प्रकारे अपघात झाल्याने काहींचे बुडून मृत्यू झालेले आहेत त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने, नगरपंचायतीने, पाटबंधारे विभागाने योग्य ती दखल घ्यावी व योजना आखाव्यात असे मत मांडले
यावेळी विजमंडळाचे उपकार्यकारी अधिकारी अष्टेकर, नगरपंचायतचे प्रतिनिधी म्हणून नेहाल नाईकवाडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंकज सुर्वे तसेच तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आदिजण उपस्थित होते.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक



