नवीदिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यात ८६ तास चाललेल्या संघर्षानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधीची घोषणा झाली. दोन्ही देशांनी याबद्दलचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्ताननं अवघ्या ३ तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पु्न्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे. पाकिस्तानकडून ड्रोन हल्लेदेखील केले जात आहेत. श्रीनगरमध्ये स्फोटांचे ४ ते ५ आवाज ऐकू आलेले आहेत. सांभा सेक्टरमध्ये सायरन वाजू लागले आहेत. पाकिस्तानी हल्ल्यांना जशास तसं उत्तर देण्याच्या सूचना सीमा सुरक्षा दलाला देण्यात आलेल्या आहेत.

जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरु झाला आहे. शस्त्रसंधीची घोषणा होऊन अवघे तीन तास उलटले आहेत. पण पाकिस्ताननं पु्न्हा एकदा आगळीक केली आहे. काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात संशयास्पद ड्रोनचा स्फोट झाला. अखनूर, राजोरी, आरएसपुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्ताननं उखळी तोफांचा वापर सुरु केला आहे. बारामुलामध्ये ड्रोन हल्ला झालेला आहे. जम्मूच्या पलनवाला सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. पाकिस्ताननं गोळीबार सुरु केल्यानंतर जम्मूतील बहुतांश भागात ब्लॅकआऊट करण्यात आलेला आहे. बारामुलामधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. श्रीनगरमधील अनेक भागांमध्येही अंधार पसरला आहे.

राजस्थानच्या पोखरणमध्येही मोठ्या संख्येनं ड्रोन दिसत आहेत. हवाई सुरक्षा यंत्रणा त्यांना नष्ट करत आहे. राजोरीमध्येही गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानचे ड्रोन्स पाडण्याचं काम हवाई सुरक्षा यंत्रणेकडून केलं जात आहे. भारताची एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडत आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला. शस्त्रसंधीचं काय झालं, असा सवाल त्यांनी विचारला. श्रीनगरमधील अनेक भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचं अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे तणाव कायम आहे.
व्हॉट्सअँप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
यूट्यूब चॅनेल लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=zZp9YPoR3HWvLeFD

मुख्यसंपादक