ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
प्रथम तुम्हा सर्वाना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…..
शारदीय नवरात्र ९ दिवसां चा सण, महाराष्ट्रातच नव्हे तर वेगवेळ्या राज्यात त्यांच्या पारंपरिक पद्धतीनुसार साजरा होणारा उत्सव. स्त्री ची , आदिशक्तीची सर्व रूपे या ९ दिवसात पुजली जातात. या उत्सवादरम्यान पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात, धान्याची तुरे हवेसोबत खेळत असतात.
देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते अशा सुंदर नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते.
पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात नऊ प्रकारचे धान्य पुरण्यात येते. दहा दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते. पूजेमध्ये पाच प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज नऊ दिवस वेगवेगळी चढवली जाते. तर सकाळी संध्याकाळी धूप – दीप – आरती आणि देवीला नेवैद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते.
देवीची मनोभावे पूजा केली जाते. हा हिंदू धर्मातील देवीशी संबंधित व्रत आहे. एकंदरीत आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नऊ दिवस अखंड नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, सह कुटुंब सह परिवार, देवीची आरती करणे , देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे , स्रोत म्हणणे, सर्व मिळून गरबा खेळणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. हा सण नऊ दिवसाचा आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. यावर्षी २०२२ मध्ये २६ सप्टेंबर रोजी या उत्सवाला सुरुवात होते. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठां मधेही उत्साहाचे वातावरण असते , देऊळ, राऊळ अगदी सजून धजून उभे ठाकलेले असतात. मग ती कोल्हापूर ची करवीरनिवासिनी असो किंव्हा नाशिक ची सप्तशृंगी देवी . दुर्गापूजेच्या रूपात बंगालात साजरा होतो बंगालचा हा सर्वाधिक महत्वाचा सण आहे.
देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. या सणाला शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. हा देवींचा उत्सव असतो. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले.
देवळांमध्ये नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. गुजरात , महाराष्ट्रात या काळात रात्री गरबा ची धम्माल असते.
नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात जोडली गेल्याचे दिसून येते. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. तर देवीला वेगवेगळ्या नऊ रंगांचे वस्त्र नऊ दिवस परिधान करण्यात येते.
उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.
९ दिवसाच्या या कालावधीत सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. घरोघरीच नव्हे तर गणेश चतुर्थी प्रमाणे या सणास हि भव्यदिव्य स्वरूप स्वरूप असते.
व्रत केलेल्या व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा दूध , फलाहार घेऊन व्रतस्थ रहायचे असते. घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने झेंडूच्या माळा बांधतात. नऊ दिवसाच्या अखेरीस ५ किंव्हा ७ कुमारीची पूजा करून भोजन देऊ करतात शेवटी स्थापित घट देवीच्या नावाने , कुलदैवता चे नाव घेऊन उत्थापन करतात. या दिवशी स्वयंपाक पदार्थातील कडाकण्या बांधण्याची पद्धतही असते.
नवरात्रीच्या अखेरीस आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी साजरा केला जातो. आख्यायिका आहे कि चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला. दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे. म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात. आलीकडे बदलत्या विज्ञानयुगानुसार दुर्गाभक्त व्यवसायाप्रमाण डॉक्टर असेल तर स्टेथॉस्कोप, शस्त्रक्रियेची अवजारे, विद्यार्थी असेल तर पेन-पुस्तकेही या दिवशी पूजतात. त्यावर झेंडूच्या माळा वाहतात.
आपट्याची पाने देऊन सोने घ्या , सोन्यासारखे रहा असे २ गोडाचे शब्द आपल्या नात्यातील मधुरता वाढवत असत. घरोघरी जाऊन थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन हा सण आणखीच मधुर होतो. सोने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे असते. घरी आल्यावर बहिणीने अथवा घरांतील मुख्य जी सवाष्ण स्त्री असेल तिच्याकडून ओवाळून घ्यायचे अशी परंपरा आहे.
दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई.
असा हा नवरात्री पासून विजयादशमी पर्यंत चा उत्सव खूपच पुज्यनीय असतो. भक्तिमय असतो.
धन्यवाद
सौ. रुपाली स्वप्नील शिंदे
भादवन ता. आजरा
मुख्यसंपादक