Homeमनोरंजनआज बॉबी 50 वर्षे झालीत. त्याच्या निर्मितीची अपरीचीत बाजु……..!

आज बॉबी 50 वर्षे झालीत. त्याच्या निर्मितीची अपरीचीत बाजु……..!

कर्जबाजारी राजकपूर आणि बॉबी सिनेमा

मेरा नाम जोकर आपटला. आत्तापर्यंतची कमाई, बायकोचे दागिने, आर. के. स्टुडिओ गहाण ठेवून धाडकन पडला. १९७० मधली घटना.
त्यात आर. के फिल्म्सचा ‘कल,आज और कल’ पण फारसा चालला नाही.
कर्जबाजारी राजकपूरला कर्ज फेडण्याची चिंता लागून राहिली. वेळेत फिटले नाही, तर सगळ विकून टाकावे लागणार होते. अक्षरश: कफल्लक होण्याची स्थिति. त्यात लोक म्हणू लागले, ’राजकपूर दिग्दर्शन भूल गया है’. हे तर खूपच क्लेशदायक होते.
आता हे कर्ज फेडण्यासाठी पुन्हा नवीन चित्रपट बनवायचा. पण तोही चालला नाही तर सगळ विकून कुटुंबासह रस्त्यावरच येण्याची वेळ. आर्थिक संकट दूर करणे महत्त्वाचे होते. स्वत:ची इमेज सांभाळणे ही नंतरची गोष्ट.
राजकपूरची कर्जबाजारी अवस्था ही चित्रपटसृष्टीतील मंडळीत चर्चेचा विषय ठरली होती. एखाद्याने रामराम ठोकला असता चित्रपटसृष्टीला.
पण…
चित्रपट हा राजकपूरचा श्वास होता. त्याने नवीन चित्रपट काढायचे ठरवले.

सुपरस्टार झालेल्या राजेश खन्नाला घेतलं तर चित्रपट चालेल असे त्याला वाटले. पण राजेश खन्ना पाच लाख रुपये मानधन घ्यायचा. फक्त एका नायकासाठी एवढे मानधन कर्जबाजारी झालेला राजकपूर देऊ शकत नव्हता. अर्थात राजेश खन्नासाठी राजकपूर हे दैवत होते. त्याने विनामोबदला काम करायची तयारी दाखवली. पण स्वाभिमानी राजकपूरला हे योग्य वाटेना.

अगदी नवीन कलाकार घेऊन त्याने चित्रपट काढायचे ठरवले.
किशोरावस्थेत पदार्पण केलेल्या एका मुलाची व मुलीची प्रेमकथा हा विषय.

चालला तर ठीक. नाही चालला तर ..? कर्जाचा डोंगर पर्वत होणार.
त्यासाठी अतिशय कमी खर्चात हा चित्रपट बनवायचा होता.

राजकपूरचा चित्रपट म्हणजे भव्य-दिव्य सेटिंग. त्याने त्यास पूर्ण फाटा दिला.
हिरो घेतला आपला चिरंजीव ऋषि. वय वर्षे १८. हिरॅाईन घेतली एकदम नवीन. डिंम्पल कपाडिया, वय वर्षे १६.
प्राण व प्रेमनाथ दोघेही जवळचे मित्र. प्रेमनाथ तर मेव्हणाही होता. बायको कृष्णाचा सख्खा भाऊ. दोघेही मोठ्या मनाचे. ते मानधन घेणे शक्यच नव्हते.

चरित्र अभिनेत्री दुर्गा खोटे यांना साजेशी भूमिका दिली. सानिया सहानी ही २६ वर्षाची अभिनेत्री. तिला १८ वर्षाच्या मुलाची आई बनवले. ती या भूमिकेसाठी तयार नव्हती. पण राजकपूरसाठी पांढरे केस करायला तयार झाली.

शंकर-जयकिशन हे नेहमीचे संगीतकार. पण त्या काळात लता मंगेशकर यांनी काही कारणास्तव त्यांच्याकडे गायचे बंद केले होते. लताचा आवाज आपल्या चित्रपटात हवाच हा राजकपूरचा आग्रह. कारण लता यांचे एकही गाणे ‘मेरा नाम जोकर’ मध्ये नव्हते. त्यामूळेच चित्रपट पडला अशी राजकपूरची भावना. लताची गाणी असतील तरच आपला सिनेमा हिट ठरतो, यावर त्याची एक श्रद्धा. मग संगीतकार बदलले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना आणले. त्याच्या दृष्टीने राजकपूरच्या सिनेमाला संगीत द्यायची संधि मिळाली, हाच खूप आनंदाचा क्षण होता.

आता गायक पण नवीन हवे होते. कारण बजेट. जुने कोणतेही गायक वापरायचे नाहीत, असे राजकपूरने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना बजावले होतेच.
नवीन नायक नवीन आवाज. शैलेन्द्रसिंग हा पुण्याच्या फिल्म इंस्टीट्यूटमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत होता. वय वर्षे १९. त्याला गायनाची आवड होती. पण त्याला व्हायचे होते अभिनेता. त्याचे वडील व्ही. शांताराम यांचे सहाय्यक. राजकपूर नवीन आवाजाच्या शोधात आहेत, हे समजल्यावर ते मुलाला घेऊन राजकपूरकडे गेले. राजकपूर व लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्याच्या आवाजाची टेस्ट घेतली. त्यासाठी एक गाणे गायला दिले. गाण्याचे बोल होते,.. ‘मै शायर तो नही.’ शैलेन्द्रसिंग सिलेक्ट. या गाण्याने इतिहास घडवला.

दुसरा गायक नरेंद्र चंचल. हा अमृतसरचा. पंजाबातील एका ऑर्केस्ट्रा मध्ये तुटपुंज्या पैशात गाणे गायचा. मुंबईच्या पंजाब असोसिएशनने या ऑर्केस्ट्राचा बैशाखी निमित्त मुंबईत कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा आमंत्रित असलेले राजकपूर यांनी चंचल यांचे गाणे ऐकले. त्याचा तो पहाडी, जोशपूर्ण आवाज ऐकून ते भारावून गेले. त्यांनी त्याला आर. के. स्टुडिओ मध्ये बोलावले. राजकपूर व लक्ष्मीकांत -प्यारेलाल यांनी त्याच्या आवाजाची टेस्ट घेतली. त्यासाठी एक गाणे गायला दिले. गाण्याचे बोल होते,.. ‘बेशक मंदिर-मस्जीद तोडो.’ याही गाण्याने इतिहास घडवला. कारण हा आवाजच वेगळा होता.

आता गीतकारही नवे हवे होते. नेहमीचे प्रचलित नको होते. त्यापैकी एक होते विठ्ठलभाई पटेल. हे मध्यप्रदेशचे. तेथे कॉँग्रेस नेते. काही काळ मंत्री होते. गीतकार शैलेंद्रचे मित्र होते व स्वत:ही कवी होते. राजकपूरची त्यांची ओळख होती. त्यांनी दोन गाणी लिहिली. ‘झूठ बोले कव्वा काटे’ आणि ‘ना चाहू सोना चांदी’.

दुसरे गीतकार इंद्रजीतसिंग तुलसी. जास्तीकरून देशभक्तीपर गीत लिहणारे. सरकारने यांना ‘राजकवी’ हा किताब दिला होता. त्यांनी गाणे लिहिले, ‘बेशक मंदिर-मस्जीद तोडो ..’ हे गाणं आणि चंचलचा आवाज लोकांना खूप आवडले. मग इतर गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली.

वसंत साठे हे कॉँग्रेसचे नेते. राजकपूरचे जवळचे मित्र. त्यांनी पटकथा लिहिली. सोबत कथाकार के. ए. अब्बास होते.

प्रेम चोप्रा मित्रच. त्याला घेतले. त्याला चित्रपटात एकच वाक्य. ‘माय नेम इज बॉन्ड,.. जेम्स बॉन्ड’.. या धर्तीवर “प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा”.
राजकपूर साठी तोही तयार झाला. नंतर हे वाक्यच प्रेम चोप्राची ओळख बनली. एवढा हा डायलॉग गाजला.त्याला पाहून थिएटरमध्ये लोक शिट्या मारत. हा डायलॉग लोकांनी डोक्यावर घेतला.

शूटिंग सुरू झाले. ५०-६०% पूर्ण झाले…आणि..

१६ वर्षाच्या डिंपलने ३१ वर्षाच्या राजेश खन्नाशी लग्न केले. मार्च १९७३ मध्ये. राजेश खन्नाने तिला चित्रपट सोडायची अट घातली. आली पंचाईत. शूटिंगच थांबले. कर्जबाजारी राजकपूरच्या पायाखालची जमीनच हादरली.
शेवटी समेट झाला. ‘हा तुझा पहिला व शेवटचाच चित्रपट’ या अटीवर राजेश खन्नाने डिंपलला परवानगी दिली. तोपर्यंत स्विमिंग टँक वरचे डिंपलचे पोस्टर चर्चेचा विषय झाले होते.
‘अक्सर कोई लडका’ या गाण्याच्या शूटिंग च्या वेळेस डिंपल गरोदर होती.
यातील अभिनयाबद्दल तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. इतक्या लहान वयात हा पुरस्कार घेणारी ती पहिली अभिनेत्री ठरली.

कथेमध्ये नायक पंजाबी खानदानातील. तर नायिका ख्रिश्चन कॅथलिक. ‘बॉबी’ हे नाव पंजाबीमध्ये मुलांचे असते. पण सिनेमात हे नाव नायिकेचे ठेवले. लोकांच्या तोंडात हे नाव रुळणार हा राजकपूरचा अंदाज होता. तेच नाव चित्रपटाला द्यायचे ठरले. आणि अंदाज खरा ठरला. चित्रपट एवढा चालला की, पंजाब, उ. प्रदेश राज्यात खेड्यातील लोकांना शहरात आणून सिनेमा दाखवणेसाठी थिएटर पर्यन्त बसेस सुरू झाल्या. त्या परत गावात नेऊन सोडत. त्यांना नाव पडले ‘बॉबी बसेस’.

एक अत्यंत साधी प्रेमकहाणी असलेल्या या चित्रपट निर्मितीची ही कहाणी. राजकपूरला दिवाळखोरीतून बाहेर काढून खोऱ्याने पैसे ओढायला लावणारी ही कहाणी. अनेक नवकलाकारांना घडवणारी.
त्याचबरोबर संकटाला घाबरायच नसत असा संदेश देणारी.

ती आज सांगायचे कारण,
या चित्रपटास काल ५० वर्षे पूर्ण झाली…..!!!


सोशल मीडिया व्हायरल पोस्ट

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular