भादवण ( सुभाष पोवार ) -: हिरण्यकेशी नदीवरील हिरलगे-कोवाडे बंधाऱ्यालगत रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत मामा व भाचा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील विष्णू सुतार (वय 50) व त्यांचे भाचे प्रवीण पांडुरंग सुतार (वय 36) हे हिरलगे येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर दुपारी मामाला कोवाडे येथे सोडण्यासाठी दोघेही दुचाकीवरून हिरलगे बंधाऱ्यालगत आले होते.
यावेळी नदीकाठी वाहन उभे करून दोघेही बंधाऱ्यालगत पाण्यातून जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला. दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास परिसरात कोणीही नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार साजिद सिकलदार यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

मृत सुनील सुतार यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तर प्रवीण सुतार यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.


मुख्यसंपादक


