Homeवैशिष्ट्येश्री. स्वातंत्र्यसैनिक

श्री. स्वातंत्र्यसैनिक

कृतानेक साष्टांग नमस्कार
सेवेशी सादर,

तुम्हाला पत्र लिहिण्याचा प्रसंग आज पहिल्यांदाच येतो आहे. आयुष्यभर तुमची सावली म्हणून वावरले. आपल्या गावातल्या प्रख्यात वकिलांचे
तुम्ही सुपुत्र. तुम्ही देखील वकिली शिकून मोठेपणी वडिलांची गादी चालवाल असेच सगळ्यांना वाटत होते. मी एका कर्मठ कुटुंबातून आलेले. मोठ्या प्रकांडपंडिंताची थोरली लेक. कळायला लागल्यापासून सणवार, कुलाचार, उपासतापास, नैवेद्य, सोवळेओवळे याच गोष्टी सतत कानावर पडत असत. घरची श्रीमंती होती. घरच्यालेकीसुना सोन्याच्या दागिन्यांच्या भाराने वाकलेल्या असत. माझ्या वयाच्या सातव्या वर्षी आपले लग्न झाले. तुमचे वडील माझ्या वडिलांचे बालमित्र. त्या दोघांनी म्हणे मी पाळण्यात असतानाच आपले लग्न ठरवले होते. लग्नानंतर सासरी आल्यावर मला अनेक गोष्टींचे नवल वाटे. तुमच्या घरी रोज केसरी येत असे. रोजचा स्वैपाक सोवळ्यात होत नसे. सासूबाई आणि आजेसासूबाई सोडून सगळ्यांना लिहिता वाचता येत असे. तुमच्या बहिणी शाळेत जात. तुमच्या घरातल्या बायका घराबाहेर जाताना जोडे घालत. घरची पूजा सासूबाई करत. या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडायला मला खूप वेळ लागला.
पुढे मी तिथेच रहायला आल्यावर तुम्ही व मामंजी मी लिहावाचायला शिकावे म्हणून आग्रह धरलात. मी वाचण्यासाठी हातात पुस्तक धरले तर सासूबाई आणि आजेसासूबाई रागे भरत मी अगदी कानकोंडी होत असे. पण तुमच्यापुढे माझे काहीएक चालत नसे. तुमचे ऐकण्यावाचून तरणोपाय नव्हता. मी चोरून, रात्री जागून अभ्यास करून वाचालिहायला शिकले. मलाही हळूहळू गोडी लागली म्हणा.
अचानक तुम्ही वकिलीचे शिक्षण सोडून बेचाळीसच्या स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतलीत. माझा, आपल्या दोन्ही लेकरांचा, घरातल्या इतरांचा विचारही केला नाहीत. आम्हाला मामंजींच्या भरवशावर सोडून आपण भूमीगत झालात. जवळपास अकरा महिन्यांनी परत आलात. येताना चरखा घेऊनच आलात. मला खादीच्या साड्या नेसायचा हुकूमच केलात. दागिने घालायची मनाई केलीत. तुमच्यासमोर ब्र काढायची घरातल्या कोणाची हिंमत नव्हती पण तुमची पाठ फिरल्यावर दीरजावा चेष्टा करत. त्यातच तुम्ही पोटापाण्यासाठी काही करत नाही म्हणून सासरमाहेरकडून टोमणे मारणेही सतत सुरू असायचे.
पुढे आपण मुलांना घेऊन मुंबईतल्या चाळीत आलो. घरनं धान्य आणि इतर गरजेच्या वस्तू मामंजी पाठवत असत. थोडी उचलून मदत करत असत. पण चार माणसांचे घर चालवायला काय लागत नाही? त्यात तुम्ही कार्यकर्त्यांना घेऊन कधीही जेवायला येत असत. घरात काही आहे नाही याची तुम्हाला फिकीर नसे. अगदी ताकभात सुद्धा तुम्हाला चालत असे.
आपल्या मुलांना छानछौकी तर सोडाच पण अगदी साध्या साध्या आनंदापासून वंचित रहायला लागले.त्यांना बिचाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिकाची मुले या शब्दाचा सतत ससेमिरा लागलेला असे.
पुढे भारत स्वतंत्र झाला पण आम्ही तिघे पारतंत्र्यातच होतो. आपली मुले लवकर शहाणी झाली. शिक्षण नादारीवर झाले. दोघेही काहीतरी उद्योग करून स्वतःपुरते पैसे मिळवित असत. नंतर इतके लांब गेले की स्वातंत्र्यसैनिकांची मुले म्हणून तिथे त्यांना कोणी टोमणे मारणार नाही. आपल्याला बोलावत होती पण मी तुमची साथ कधीही सोडली नाही. सावलीसारखी सतत सोबत केली.

मी तुमच्यावर आरोप करतेय किंवा तुम्हाला जाब विचारतेय असे मुळीच समजू नका. मी माझा पत्नीधर्म पाळला. तुम्ही कधीतरी कौतुकाची थाप पाठीवर द्याल एवढीच अपेक्षा होती. तुम्ही स्वतःच्या शरीराप्रती दाखवलेली बेपर्वाई अंगलट आली त्यातच तुमचे देहावसान झाले…
तुमच्या नंतर सुरुवातीला माझ्याकडे अनेक लोक भेटीदाखल येत पण हळूहळू ते ही यायचे बंद झाले. शेवटी मुलाने हट्टाने मला त्याच्या गावी नेले. आता तिथेच नातवंड पंतवंडात रमलेय. आज पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस. तुमच्याशी बोलावेसे वाटले म्हणून हे पत्र लिहीत आहे.

आणि आजच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने साऱ्या देशाला सांगावेसे वाटते की आम्ही आणि आमच्यासारख्या अनेकांनी संसाराची होळी ज्या स्वातंत्र्यासाठी केली ते तुम्ही स्वैराचार करावात म्हणून नव्हे.
तुम्हाला सहज मिळाले असेल पण आम्ही त्याची पुरेपूर किंमत मोजली आहे.
आम्हा स्वातंत्र्यसैनिकांच्या मनाला क्लेश होतील असे वागू नका.
आमच्या नावाचे रस्ते, चौक नकोतच फक्त आमच्या कामाची जाणीव ठेवा.
देश वाचवा. स्वातंत्र्य अबाधित ठेवा.

तुमच्याशी अधिक काय बोलू?
तुम्ही जिथे असाल तिथे सुखी आणि आनंदात असाल माझी खात्री आहे. मलाही लवकर तुमच्याकडे बोलवा.
इथे चारचौघांसारखा संसार करायला जमले नाही. तिथे तरी करूया.

                 कळावे आपली विनम्र
                   सहचारिणी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular