शुक्रवारी 1 एप्रिल ला मराठी सरत्या वर्षाला निरोप देत असताना रूण पराडकर वाडीचा आधारवड अनंतात विलीन झाला. आज या घटनेला १२ दिवस झाले. त्यांचा परिवार तर दुःखात बुडालाच मात्र त्यांचा प्रभाव असणारी पंचक्रोशी ही शोकाकुल झाली. आजपर्यंत स्वतः आक्रमक न होता शांत संयमी आणि कणखर नेतृत्व पराडकर वाडीला देणारा आमचा सर्वांचा आण्णा म्हणजेच कै लवू पराडकर काळाने हिरावला.
प्रयत्नांची पराकाष्ठा करत, दगडाचे काठिण्य भेदून पाण्याचा झरा शोधणारा भगीरथ पंचक्रोशीने गमावला. दिव्याचा प्रकाशाची मर्यादा संपवून लाईट चा भव्य प्रकाश वाडीत उजळणारा कर्ता करविता आण्णा निघून गेला. वाडीचे पाण्याचे अनेक वर्षाचे दुर्भिक्ष संपवून स्वपुढाकाराने घरोघरी पाणी आणणारा आण्णा डोळ्यात पाणी आणून निवर्तला. अडीअडचणींची पायवाट मोडून वाडीत रस्ता आणण्याच्या कामात पुढाकार घेणारा आण्णा आम्ही गमावला. नमनामध्ये सत्यवानाची अजरामर भूमिका साकारणारा कलाकार पडद्याआड झाला. पूर्वीच्या काळात आजारी पडताच डॉक्टर गाठणे म्हणजे महाकठीण मात्र न डगमगता अनेकांच्या अडचणीत स्वतः पुढे होत आधार होणारा समाजसेवक हरपला.
स्वतःच्याच मुलांनाच नाही तर वाडीतील मुलांना कधी ही रागाचा शब्द न वापरणारा कटुंबवत्सल बाप परिवाराने गमावला. विविध कार्यात संयमी नेतृत्व करत नौका किनारी लावणारा नावाडी परत न येता झाला. आधुनिकतेची कास धरत नव्या पिढीला कळत नकळत सहकार्य करणारा दूरदृष्टीचा कर्ता गेला. अनेक संकटांचा नेटाने सामना करणारा योद्धा देवा घरी हवासा झाला. दुःख तर होणारच परंतु यातून सावरण्याचे बळ देणारा आण्णा जरी आता नसला तरी त्यांचे विचार हे अमरत्वाला जात नित्यनेम बळ देतील.
पराडकर वाडीचे आण्णा गावकार तसेच ग्रामविकास मंडळ पराडकर वाडीचे ग्रामीण अध्यक्ष म्हणून राहताना त्यांनी अनेक गंभीर परिस्थितीत स्वतः पुढाकार घेऊन वाडी हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत. राजकारणात तितकासा आपल्या वलयाचा फायदा करून न घेता समाजकारणात मात्र यांनी आदर्शवत कर्तृत्व दाखवले.
पाण्याच्या विहिरी खोदणे, बांध घालणे याची कॉन्ट्रॅक्ट घेणारा आण्णा पक्का व्यावसायिक अन तितकाच निस्वार्थी देखील होता. वाडीच्या विकासकामात चार पाऊले मागे येत यशाची गुढी उभरणारा आण्णा होता. अनेक कठीण काळात शांत डोक्याने विवाद सोडवत एकीचे बळ निर्माण करणारा आण्णा होता. आयुष्याशी जिद्दीने लढणारा लढवय्या नव्या वर्षात पदार्पण करण्या आधीच गत वर्षाबरोबर निरोप घेता झाला. काळाने वेळ साधली मात्र त्यांच्या कर्तुत्वाचा आदर्श वड आमच्या मनातुन हिरावून घेणे काळाला शक्य नाही.
अशी सामाजिक कर्तृत्व कधीच अंत पावत नाहीत. त्यांनी उभे केलेले कर्तृत्वाचे,नेतृत्वाचे गड किल्ले त्यांची ओळख अमर करत राहतात. आमचा आण्णा ही त्यातलाच एक. नित्यनेम आमच्या सोबत राहील, ऊर्जा देईल, लढण्याचे बळ देईल, कठीण काळात सामर्थ्य होईल…
आण्णा, तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली🙏🏻🌸
✍️राजन सुर्वे…
समन्वयक – पालघर जिल्हा