Homeवैशिष्ट्येकातळशिल्प-कातळगाव

कातळशिल्प-कातळगाव

      "कोकण" बद्दल काय बोलावे ! जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले हे नाव आहे. सर्वांना माहीतच आहे की, कोकणात खूप काही गोष्टी आहेत ज्या सर्वश्रुत आहेतच शिवाय ऐतिहासिक वारसाही कोकणाला लाभलेला आहे. आपल्याला इथे राहूनही बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, जेव्हा त्या गोष्टी आपल्याला माहीत होतात त्यावेळी आपण मात्र अचंबित होतो. आपल्याच आजूबाजूच्या गावात किंवा आपल्याच गावात असणाऱ्या गोष्टी बहुतेक वेळा माहीत असूनही त्याची माहिती आपल्याकडून घेतली जात नाही किंवा आपल्याकडून त्याकडे दुर्लक्ष होत असते.

काही ठिकाणी आपण पोहचतो परंतु फक्त पर्यटन करण्याच्या हेतूने; त्याचा इतिहास आपण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न करत नाही, तशी आपल्याला गरजही भासत नाही, कारण ज्याठिकाणी आपण पर्यटन स्थळाला भेट द्यायला जातो तिथला एक माणूस आपल्या दिमतीला म्हणजेच तिथली माहिती सांगण्यासाठी आवर्जून असतो, नव्हे- आपणच त्याला बरोबर येण्यास सांगतो, त्यामुळे त्या जागेचा इतिहास आपल्याला कळतो. ….असो.

कोकणातील वातावरण खूपच आल्हाददायक असते, मनाला भुरळ पाडणारे, मनाला भावणारे असते. तशीच इथली माणसेही मनमिळावू आहेत. अगदी सहज एखाद्या अनोळखी माणसाला आपलेसे करून टाकतात आणि परतीच्या वेळी मात्र मग इथे येणाऱ्यांना पाय काढावासा वाटत नाही.
कोकण म्हणजे परशुरामाची भूमी; कोकण म्हणजे निसर्गाची खाण! कोकण म्हणजे सह्याद्री पर्वत! कोकण म्हणजे समुद्राच्या लाटा! कोकण म्हणजे झुळझुळनारं पाणी! प्रचंड पाऊस कोसळत असताना नटून-थटून भिजणारी नटलेली हिरवीगार नारी…!
कोकण म्हणजे हापूस आंबा, काजू गर, काजूची बोंडे, रातांबे.
कोकण म्हणजे काळी मैना!! कोकण म्हणजे करवंद, बोरं, कोकण म्हणजे मस्स्त हसणारी, खेळणारी, बागडणारी पोरं.
किती किती बोलावं कोकणाबद्दल, शब्द अपुरे पडतात.
अशाच निसर्गरम्य आपल्या कोकणातल्या जावडे गावातील कातलगाव इथे असणाऱ्या काही वास्तू, लेणी, पुरातन गुहा, मंदिर, मंदिरात असणाऱ्या अपरिचित मुर्त्या म्हणजेच आपण त्या कधीच पाहिलेल्या नाहीत. या सुंदर अशा गावाला लाभलेली ही एक पर्वणीच म्हणावे लागेल. आपण याच विषयी जाणून घेऊया…

कातळगाव- जावडे गावातील एक विस्तीर्ण असे हे एक गाव आहे, छोटे तलाव, नदी, प्रशस्त असा निसर्ग आणि काही ऐतिहासिक लाभलेला वारसा.
कातळगाव हे नाव बहुधा इथे सगळीकडे कातळ आढळून येतात त्यावरून पडले असावे. या कातळांमुळेच इथलं निसर्ग टिकून आहे असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
गावात एक गुहा आहे. या गुहेबद्दल कुणालाच काही माहीत नाही, याच गुहेच्या बाजूला एक छोटेखानी गुहा आहे. पलीकडे हिरवीगार झाडे आहेत. त्यामुळे इथे खूपच छान असं हिरवंगार वातावरण निर्माण झालेले आहे. इथे थोडं डेव्हलपमेंट झाल्यामुळे सुंदर असे बंधारे बांधलेले आहेत. त्या पलीकडे पाहिलं तर, छान संथ नदीचे पाणी वाहताना दिसते. नदीच्या डाव्या बाजूला नयनरम्य असा एक जारा वाहताना दिसतो. झऱ्याच्या दुतर्फा हिरव्यागार झाडांमुळे निसर्गाचा थाट अगदी साजेसा पाहायला मिळतो. बाजूलाच वाहणारा नदीचा प्रवाह दगड वाटांमधून खळखळ करत निरंतर वाहत आहे. अगदी मे महिन्यातही हा झरा स्वतःच्या तालात, डौलत वाहत असतो.

  नदीच्या पात्रात उभे राहिल्यावर उजव्या हाताला निसर्ग निर्मित गुहा निर्माण झालेली आहे. या गुहेच्या वरच्या भागावर हिरवेगार वाढलेले रान आणि पायाखालून नदीचा प्रवाह, यामुळे ही गुहा खूपच सुंदर दिसते. या गुहेचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथून ही गुहा सुरू होते ती सापुचे तळे या ठिकाणी उघडते असे इथले ग्रामस्थ सांगतात. 

गावात काही कार्यक्रम केला जातो त्यावेळी या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीने इथे नारळ दिला जातो.
गुहेच्या समोरील वाहणाऱ्या पाण्याचा रंग काहीसा लालसर आहे. पांडवकाळात इथे वाघाचे आणि रेड्याचे वाद होऊन त्यांच्या झटापटीत इथे त्यांचं रक्त सांडल्याने या पाण्याला असा रंग प्राप्त झाला अशी एक दंतकथा आहे. नदीच्या प्रवाहातून वाट काढत पुढे गेल्यावर एक जाणीवपूर्वक बनवलेली गुहा दिसते. या गुहेत मानवी आकाराच्या मुर्त्या आहेत. विशेष म्हणजे कोकणात आशा प्रकारची शिल्पे आपल्याला बघायला मिळतात ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.ही सर्व शिल्पे कातळात कोरलेली आहेत; या वरूनच कदाचित या भागाला काळताळवादी हे नाव पडले असावे.
काही अंतरावर पाण्याच्या प्रवाहाच्या दुसऱ्या बाजूस दगडात कोरलेली मूर्ती आहे, या मूर्तीला तीन तोंडे आहेत व हातात कमंडलू आहे, यावरून ही मूर्ती दत्तांची असावी असा भास होतो.

खळखळ वाहणाऱ्या पाण्यातून अनवाणी चालत जाताना थंड पाण्याचा स्पर्श पायाला सुखावून जातो, मन प्रफुल्लित होऊन या निसर्गरम्य वातावरणातून जाऊच नये असेच वाटते. काचेसारखे नितळ स्वच्छ पाणी अगदी कोकणातल्या माणसांसारखे. पाण्याकडे पाहत राहावे असे वाटते, पाणी इतकं स्वच्छ आहे की, पाण्याखालची जमीन आणि त्यावरील प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसते.
याच ठिकाणी एक विरमुद्रावस्थेत काहीशी मनुष्याकृती तर काहीशी वाघाच्या मुखाप्रमाणे असलेली मूर्ती आहे. हातात एक आयुध आहे. मूर्तीला दोन हात आणि दोन पाय अगदी स्पष्टपणे दाखवलेले आहेत. दोन्ही बाजूला तशाच दोन मुर्त्या आहेत.
इथून उजव्या बाजूने खाली चालत येताना निसर्गाचं अप्रतिम असं सौंदर्य पाहायला मिळते. चहू बाजूंनी हिरवीगार झाडे तसेच चालताना हिरवीगार चादर अंथरलेली आहे असा भास होतो. त्या हिरव्या गवताचा स्पर्श तळव्यांना गुदगुल्या करतोय की काय असे जाणवते. कोकण म्हणजे काय ? हे कोकणात आल्याशिवाय अनुभवता येत नाही, हेच खरे…!!
इथून खाली आलो की अजून एक गुहा पहायला मिळते. या गुहेच्या प्रवेश द्वाराजवळ भव्य अशी सात-आठ फुटांची मूर्ती आहे. ही मूर्ती कोणत्या देवाची आहे हे सांगणे कठीण आहे. उजव्या हातात सुदर्शन चक्र आहे तर डाव्या बाजूच्या दोन्ही हातात एक-एक शस्र आहे. मूर्ती संपूर्णतः जांभा दगडात कोरून बनवलेली असून, मूर्ती स्पष्ट दिसावी म्हणून इथल्या गावकऱ्यांनी सेंदूर लावलेला आहे. पायाजवळ दिवा लावून ठेवलेला आहे. तळेगावतील हा “गोल्डन स्पॉट” असावा. गुहेत बऱ्यापैकी थंडावा जाणवतो. गुहा चौकोनी आकारात आहे. या गुहेचा आकार, ताशीव काम, कोरीव पद्धत, बनवलेली मूर्ती या गोष्टी विचारांत घेतल्या हे सर्व वैभव पांडवकालीन आहे असे तिथले ग्रामस्थ सांगतात.

कातळवडीतून पुढे जाताना बौद्धवाडी ओलांडून पलीकडे गेलो की, नामये वाडी आहे. याच वाडीत मधोमध आल्यावर एक वेगळ्या आकाराचा दगड दृष्टीस पडतो जो इतर तीन दगडांवर उभा आहे. हा दगड नसून ती “त्रिदेवी” आहे असे मानले जाते.
इथून जाणारा प्रत्येक व्यक्ती या देवीचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. देवी शेत माळ्यावर असल्यामुळे ही शेकऱ्यांचीच देवी असावी.

आपल्या गावाला हा नैसर्गिक, ऐतिहासिक ठेवा कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी, लाभलेला आकार, नैसर्गिकता निघून जाईल असे न करता या गावातल्या लोकांनी अगदी मनापासून जपून ठेवलेला आहे. यापुढे हा निसर्ग असाच जपावा, ही विनंती… इथला निसर्ग, थंड हवा, पाण्याचा खळखळणारा झरा, हिरवंगार वातावरण, स्वच्छ-नितळ पाणी खूप सुंदर आहे. या निसर्ग सर्वांनीच जपायला हवा.

साभार- RJG CREATION (YouTube channel )
राजेश गोसावी- यांच्या परवानगीने.
विशेष आभार- सखाराम जानू नामये ( माजी सरपंच-१५ वर्ष )
विशेष आभार- किशोर साळुंखे ( अभिनेते )

शब्द संकलन-
विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular