सागराचे खारे पाणी उन्हाने तापले व गोडे बनून पर्वतांवर पाऊस बनून पडले. त्याचे गोडे बर्फ झाले व मग पुन्हा उन्हानेच गोड्या बर्फाच्या गोड्या नद्या केल्या. पण त्यांच्या गोडेपणाला खारेपणाचे आकर्षण निर्माण झाले. मग या गोड्या नद्या पुन्हा खाऱ्या सागराकडे वाहात जाऊन सागराला जाऊन मिळाल्या आणि मग खाऱ्या व गोड्या पाण्याचे चक्र सुरू झाले. या चक्रातूनच पुढे वनस्पती व प्राणी यांची उत्क्रांती झाली. वनस्पतींच्या जिवावर शाकाहारी प्राणी पोसले व मग शाकाहारी प्राण्यांच्या जिवावर मांसाहारी प्राणी पोसले. मग प्राण्यांतून माणूस उत्क्रांत झाला व या चक्रात घुसला. तो फारच बिलंदर निघाला. त्याला दोन्ही गोष्टी आवडल्या म्हणून तो शाकाहारी व मांसाहारी झाला. या पदार्थांच्या देवाणघेवाणीसाठी मग माणसाने पैसा शोधला.
मग या पैशात त्याने काळा व गोरा असा भेद निर्माण केला. मग काळे धंदे व त्यातून काळा पैसा आणि पांढरे धंदे व त्यातून पांढरा पैसा अशी त्याने वाटणी केली. अशी वाटणी करताना या काळ्या व पांढऱ्याच्या मध्ये माणसाने कायद्याची भिंत उभी केली.
पण पुढे या भिंतीलाच त्याने मोठी भोके पाडली. मग या भोकांतून काळा धंदा व पांढरा धंदा, काळा पैसा व पांढरा पैसा अशी आंतरमानवी आर्थिक देवाणघेवाण सुरू करीत माणूस कायद्याच्या भिंतीवरच घाव घालू लागला ! हे अती होऊ लागल्यावर शेवटी या कायद्याच्या भिंतीला पाडलेली भोके बुजवण्यासाठी चक्रावलेला माणूस आटापिटा करू लागला. कायद्याच्या भिंतीला त्यानेच पाडलेली भोके बुजवण्यासाठी मग त्याने कायदा रक्षकांची नेमणूक केली. पण यापैकी काही कायदा रक्षक हे कायद्याचे भक्षक झाले. त्यांनी कायद्याच्या भिंतीला माणसांनीच पाडलेली भोके बुजवण्याऐवजी ती भोके मोठी करण्यास सुरूवात केली. त्यात त्यांना बरेच यश आले. त्यामुळे झाले काय की काळे व गोरे धंदे हे त्यांच्यातील काळ्या व पांढऱ्या पैशासह पुन्हा एक झाले आणि अशाप्रकारे समाजात एकता प्रस्थापित झाली.
ही काल्पनिक कथा जर कोणाला सत्य आढळून आली तर तो केवळ एक योगायोग समजावा!
आपली मते द्या
- ॲड.बी.एस.मोरे
मुख्यसंपादक
आणि अशाप्रकारे समाजात एकता प्रस्थापित झाली असे शिर्षक आहे माझ्या या लेखाचे.