पोल्ट्री_waste
गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ
संपन्नजैवविविधतेला धोका
आज दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी सात वाजता तिलारी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या ओढ्यात आम्ही पोल्ट्री वेस्ट टाकणाऱ्या पोल्ट्री वाहनधारकांना रंगेहाथ पकडले, यामध्ये मेलेल्या कोंबड्या, स्किन, वेस्ट, हे सर्व अत्यंत दुर्गंधी युक्त व अपायकारक टाकाऊ पदार्थ होते.
त्यांनंतर आम्ही त्यांना योग्य शब्दात समजावून सांइगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी बाकीच्या मृत कोंबड्या घेऊन गाडी सुरू करून तिथून पळ काढला. त्यांना समज देऊन सर्व कोंबड्यांचे वेस्ट परत पोत्यात भरून गाडीतून घेऊन जायला सांगितले होते हे सर्व सांगायचे कारण म्हणजे तिलारी मध्ये हा प्रकार नेहमीचा झाला आहे, राजरोसपणे हे पोल्ट्रीवाले मेलेल्या कोंबड्या घाटात टाकतात, ओढ्यात वाहत्या पाण्यात टाकतात. तेच पाणी पुढे जाऊन अर्ध्या किलोमीटरवर असणाऱ्या गावातील लोक पिण्यासाठी वापरतात. परत तेच पाणी पुढे एक किलोमीटरवर असणाऱ्या भारतातील सर्वात महत्वाचं जैविक वारसास्थळ म्हणून ओळखले जाणारे myristica swamp जायफळाची राईत जाते.
नदीच्या १ ते २ किलोमीटर आधी घडणाऱ्या या राजरोसपणे होणाऱ्या प्रकारामुळे ( हे पोल्ट्रीवाले आपल्या गाड्या धुतात व कोंबड्यांची घाण, त्यांची विष्ठा, त्यांची पिसे, मृत कोंबड्या ओढ्यात टाकतात ) जवळपासच्या गावातील लोकांच्या आरोग्याचा व स्थानिक जैवविविधतेला वारंवार धोका निर्माण होत आहे.
हाच प्रकार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी घडला होता व त्यावेळी आम्ही पोल्ट्रीच्या गाड्यांना घाटात स्वस्तिक पॉइंटजवळ सुमारे २५ ते ३० कोंबड्या टाकताना रंगेहाथ पकडले होते पण त्यांना योग्य ती समज देत असताना त्यांनी आमच्यासोबत झटापट करून तिथून पळ काढला. ही घटना पण संबधित यंत्रणेला आम्ही कळवली होती.
गोव्याला पोल्ट्री कोंबड्या भरून घेऊन जायचे व परत येताना वाहतुकीदरम्यान मेलेल्या कोंबड्या तिलारी घाटात, ओढ्यात टाकायच्या हा नेहमीचा रुटीन कार्यक्रम झाला आहे. आम्हाला कोण अडवतो पाहूच या अविर्भावात असतात ते नेहमीच व त्याचा धोका अन्य वन्यप्राण्यांना होतो, तेथील जैवविविधतेला होत आहे.
या प्रकारावर आम्ही यावर्षीच्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये आवाज उठवला होता व तसे निवेदन ही संबंधित यंत्रणेला दिले होते. पण हा प्रकार थोडे दिवस बंद होऊन पुन्हा राजरोसपणे सुरू झाला. आम्ही बऱ्याच पोल्ट्रीधारक वाहनांना पकडून त्यांना समजावून सांगितले आहे, त्यांना या जैव कचऱ्याचा निसर्गावर होणारा परिणाम ही सांगितला आहे, पण हे प्रकार अजिबात बंद झालेले नाहीत, उलटे वाढलेले आहेत.
आजची घटना यासाठीच लिहलेली आहे की, या घटनेची व वारंवार होणाऱ्या कृत्याची वरिष्ठ पातळीवर अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी. हा सर्व प्रकार आम्ही वरिष्ठ यंत्रणेला सांगितला आहे, ते या प्रकाराची दखल घेतलीच पण एक निसर्गप्रेमी म्हणून आमचे हेच सांगणे आहे की असे प्रकार कुणीही करू नका. असे प्रकार करताना पुन्हा सापडल्यास वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसार होणाऱ्या कारवाईला व शिक्षेला सर्वस्वी पोल्ट्री वाहनधारक व पोल्ट्री कचरा टाकणारे जबाबदार असतील.
अभिजीत सुनिल वाघमोडे
मुख्यसंपादक