Homeवैशिष्ट्येगुरुपौर्णिमा विशेष…

गुरुपौर्णिमा विशेष…

   गुरू म्हणजे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. आपले आई-वडील आपल्याला जन्म झाल्यापासून मार्गदर्शन करीत असतात तर शिक्षक हे शालेय जीवनापासून आपले मार्गदर्शक असतात. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवनात बदल तर होतोच शिवाय जीवन प्रकाशमयही होते. ज्यांच्यामुळे ज्ञान प्राप्त झाले त्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.

    प्रत्येकाचा सर्वात प्रथम गुरू आईच असते. तिच्याशिवाय उत्तम शिकवण या भूतलावर कोणीच देऊ शकत नाही. कारण सर्वात पहिली जर आपली कोणाशी संगत जोडली गेली असेल तर ती आपल्याला आईच असते. स्वतःच्या कुशीत नऊ महिने वाढवत असतानाही ती माय खूप काही शिकवत असते. कितीही संकटं आली तरी आपल्या बाळाला आपल्या उदरात सुरक्षित ठेवत असते.आई आपल्याला चालण्यापासून ते बोलण्यापर्यंत आणि जगायला शिकवण्यापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली मार्गदर्शक ही आईच असते. जगातील प्राथमिक ज्ञान आपल्याला आपल्या आईकडूनच मिळते. या मायावी जगात आपला जन्म झाल्यापासून आईने गर्भात दिलेली शिकवण प्रत्येकाला जीवन जगत असताना पावलो पावली उपयोगी पडते. परंतु जस जसा मनुष्य वाढत जातो तशी हीच शिकवण मागे पडत जाते आणि आपल्या आयुष्याचे वाटोळं करून घेतो. स्वतःच्याच हाताने.

स्वतःला भूक लागली असली तरी आपल्या ताटातली अर्धी भाकर भुकेल्यास द्यावी. यामुळे एक उपाशी राहण्यापेक्षा दोघांच्याही पोटात अन्नाचे कण जाऊन जगण्याची उमेद निर्माण होते.
आपल्या माणसाच्या सहवासात राहत असताना त्याच्या सुख, दुःखात आपण सावलीसारखे उभे राहायला पाहिजे. एकावर संकट आले तर दुसऱ्याने ते आलेले संकट सावरण्याचा प्रयत्न करायला हवा. एकमेकांना साथ द्यायला हवी.
आपलं मन कितीही चंचल असले तरी त्यावर योग्य वेळी ताबा मिळवता आला पाहिजे. स्वतःमधील ताकद ओळखून त्या ताकदीचा हिंमतीने उपयोग करायला हवा.
या सर्व शिकवण आईच्या गर्भात आई आपल्याला देत असते. त्याचे योग्य रीतीने अभ्यास केला आणि आयुष्यात हवा तिथे वापर केला तर नक्कीच जीवन सफल होईल.

वडीलांच्या संघर्षाकडे पाहिले असता आयुष्यातल्या काट्यांकडे न बघता मेहनतीने, कष्टाने या काट्यांना आपण सहज बाजूला करून आपल्या कुटुंबाला कसे हसतमुख ठेवावे ही खूप मोठी शिकवण वडिलांकडून मिळते.

शाळेत गेल्यावर शिक्षक नावाचे गुरू समाजात कसे वागावे, कसे बोलावे, याचे ज्ञान शिकवितात. त्यांच्यामुळे अक्षरज्ञान, या व्यतिरिक्त समाजज्ञान, भौगोलिक ज्ञान, वास्तव ज्ञान यांची नव्याने ओळख होते. आज चांगल्या शिक्षकांमुळे कितीतरी विद्यार्थी मोठ-मोठ्या हुद्यावर पोहचले आहेत. पण फक्त शिक्षक योग्य मिळाले तरी आपल्यालाही तितकीच अभ्यासाबद्दल आवड असायला हवी. तरच त्या शिक्षकांच्या शिकवणीला अर्थ उरतो. नाहीतर जीव ओतून मुलांना शिक्षक रोज शिकवीत असतात आणि मुलं मात्र खोड्या, लबाड्या, करत आपले आयुष्य बिघडवून घेतात.

आज आई वडिलांना व शिक्षकांना खूप कमी लोकं गुरू मानतात. आजच्या दिवशी सकाळी उठल्यावर आई वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावेत असे कुणालाच वाटत नाही. ज्यांनी जन्म दिला आणि ज्यांच्यामुळे शाळा महाविद्यालयात शिकून मोठे झालो त्यांना आज कोणी विचारत नाहीत.
या काळात ज्ञान इतके वाढले आहे की, माता पित्यांना घराबाहेर काढले जाते आणि शिकवत असताना शिक्षकांनी एक काठी हातावर मारली तर त्यांच्या विरोधात खटला चालवला जातो.
रोज संस्कृतीचे पाढे वाचणाऱ्या लोकांना या विचारांवर विचार का करावेसे वाटत नाही.
आमच्या काळात बाहेर कुठे खेळत असतानाही कुणी सांगितले, गुरुजी येत आहेत तर आम्ही दोन मिनिटांत उंदरासारखे कुठेतरी लपून बसायचो. इतका धाक शिक्षकांचा होता. हा धाकही होता आणि आदरही होता.

ठिकठिकाणी गुरू बदलणाऱ्या या पिढीला गुरू या शब्दाचा अर्थ कळणे या जन्मात तरी शक्य नाही. आजचे गुरू आहेत फिल्मस्टार, राजकारणी. सर्वांच्या (स्टेटस) समाज माध्यमांवर त्यांच्या नावाचे बॅनर झळकत असतात. ज्यांचे हात आधीपासूनच बरबटलेले आहेत त्यांच्या मागे जाऊन आपलेही हात असेच त्या बिन आगीच्या वणव्यात पोळतील हे कसं कळत नाही. ज्यांच्यामुळे या धर्तीवर जन्मास आलो, ज्यांच्यामुळे आपला मेंदू सक्रिय झाला त्यांना मात्र आपण विसरत चाललो आहोत. त्यांचं स्थान फक्त मदर्स डे, फादर्स डे, आणि कित्येक डे आहेत यासाठीच उरलेले आहे.

गुरुपुजा म्हणजे गुरूंचे पाय धुणे, त्यांच्या पायांवर फुले वाहणे किंवा त्यांना वाकून नमस्कार करणे होत नाही. ही गुरूपुजा नक्कीच नाही. जे खरे गुरू असतात त्यांना याची कधीच गरज वाटत नाही आणि नसतेच.
गुरूंकडून आपल्याला मिळालेले ज्ञान आत्मसात करणे, ते ज्ञान आचरणात आणणे ही खरी गुरुपूजा आहे. गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी गुरुंबद्दल कृतघ्न असणे. या कृतघ्नतेपोटी गुरूंची सेवा आणि त्यांचा नेहमी आदर करणे म्हणजेच खरं गुरुपुजन आहे. या सेवेतून आपल्या गुरूला त्यांची गुरुदक्षिणा मिळत असते. जेव्हा आपला शिष्य मोठा होतो त्याची प्रगती होती हाच गुरुसाठी एक सन्मान असतो. त्यांनी शिकविलेल्या विद्येचा आदर असतो. हीच खरी त्या गुरूसाठी गुरुदक्षिणा असते.

आपण कुणालाही गुरू मानावे परंतु ज्यांना गुरू मानले आहे त्यांच्याशी आपण आणि त्या गुरूंनी एकमेकांशी निष्ठेने राहायला हवे. नाहीतर आज जे गुरू दिसतात ते फक्त लालसेपोटी आपले खिसे भरण्यापर्यंत आपल्या शिष्याजवळ किंवा शिष्याला उपदेश करीत असतात. आजचे गुरू, मार्ग दाखवण्याचे सोडून व्यवहाराची आगतिकता दाखवून ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्यांची लूट आणि फसवणूक करीत असतात. स्वतःजवळ अपुरे ज्ञान असूनही इतरांचा बुद्धिभेद केला जातो. असे गल्लाभरू गुरू आजकाल गल्लोगल्ली पाहायला मिळतात. यांच्या अशा स्वतःच्या फायद्यासाठी स्वयंघोषित निर्माण झालेल्या गुरुंमुळे खरे गुरू ओळखणे कठीण होऊन बसले आहे. एखाद्याला खरोखरच कोणी गुरू असल्याचा आव दाखवत असल्यास त्याची ओळख पटविण्यासाठी आपल्यातल्या भोळसट भावापेक्षा स्वतःतील तर्कशुद्ध बुद्धीचा वापर करून त्या गुरूला ओळखावे.

सर्वांना गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!!

 • – विजय वैशाली दत्ताराम पराडकर-आण्णा
  ( विरार )
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

3 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular