सध्याच्या युग हे इंटरनेटच युग म्हणून ओळखल जात. यामुळे माणसं एकमेकांपासून जवळ आली. एका बंधनात बांधली गेली. समोरा-समोर संवाद होतात खुप छान प्रगती केली मानवाने. पण या साऱ्या इंटरनेटच्या युगाला मात्र त्या चार चौकटीच्या कागदात बांधलेल्या नात्याची सर येणारं नाही हे तितकच खर. ते नात म्हणजे चार कोनाच्या कागदावर अन् चार भिंतीच नात जपणार पत्राच नात हो खरं आहे आज इंटरनेटच्या युगाला त्या टपाल युगाची सर नाही.
एका – एका शब्दात बांधिलकी जपणार, प्रश्न अन् उत्तराचा लपंडाव खेळणार, गालावर स्मित हास्य उमटवून टचकन डोळ्यात पाणी आणणार, रहस्यमय जीवनाची शब्दात कोडी उलगडणार, शब्दा- शब्दात करुणेचा आस्वाद घ्यायला लावणार अन् सर्वात महत्वाचं म्हणजे इवल्याशा कागदात माणसांना माणुसकीच्या नात्यात बांधून आपलंसं करणार ते म्हणजे पत्र.
घरच्यांची खुशाली, सर्वांचे आशिर्वाद, आपली खुशाली, कामाची, अभ्यासाची, पगाराची, दिवसाची सारी यादी नोकरवर्ग असो किंवा पदवीधरवर्ग असो, सारे काही या पत्रात लिहून पाठवायचे. सोबत लहान भावंडाना गोड गोड पापा असायचा हे ठरलेलं होत आणि उत्तर कळवा या वाक्याने समारोप व्हायचा
गावाकडे असणारे आई – वडील, भावंडं, सारे पत्राची वाट पहायचे, चार ओळीच्या त्या पत्रात सार गणित लिहलेले असायचं, आपल्या मुलाचं पत्र येईल म्हणून कपाळावर आठी पडलेला लेकाचा बाप अन् काठी टेकत टेकत चालणारी त्याची आई असो वा आजी पत्राची मात्र आतुरतेने वाट पहायचे. जसं पत्र आले आहे हे कळलं, मग साराच भगड पसारा व्हायचा. पत्र वाचता वाचता मात्र डोळे भरून यायचे. कारण त्यात असायची आपलुकीची, माणुसकीची, प्रेमाची, भावनांची गोड शिदोरी
खरचं तो काळ खूप आनंद देऊन अन् खूप गोड आठवणी देऊन गेला त्या पत्रात प्रेम विरांच्या कहाण्या होत्या, सीमेवर लढणाऱ्या जवानाच्या बातम्या होत्या, भाऊ – बहिणीच्या रक्षा बंधनाची अतूट कहाण्या होत्या, गावाकडच्या गोड आठवणी होत्या, सारं काही त्यात होत सध्याच्या युगात मात्र सारच हरवलं. माणसं जवळ आली पण संवाद दुरावला आपली माणसं समोर असतात पण लोकांच्या माना मात्र खाली असतात. एकमेकांना डोळे भरून पाहुही शकत नाही आपण. आपण स्वतःच स्वतः मधून हरवलो आहोत एवढं मात्र नक्की.
माजी आजी पूर्वी हुमान म्हणजे कोडं एकमेकांना घालायची हा पण एक खेळ होता कधी काळी म्हणजे एक वर्णन सांगायचं आणि त्यातून शब्द ओळखायचा त्यात ती म्हणायची अजूनही आठवत मला आणि पाठही आहे आकर- मकर पाखरू त्याचं चकर- मकर डोळ दिल्लीवर खेळ त्याचा बेत काय कळ याच उत्तर असायचं पत्र
आजी म्हणायची ते खरं आहे. खरचं आख्या दिल्लीवर काय जगभर फिरणारं पत्र याचा कधीच कोणाच्या अंतकरणाला अर्थ नाही कळला म्हणजेच बेत नाही कळला कारण त्या पत्राच स्वरूपच फार वेगळं होत. ज्याला शब्दातही मांडता येणार नाही.
म्हणूनचं मित्रानो मान्य आहे तंत्रज्ञानाच युग आहे पण यात आपण स्वतःपासून दुरावलो आहोत त्याच काय..? आपणच आपल्या माणसांनपासून दूर गेलो आहोत, इंटरनेटला म्हणूनच मराठीत महाजाल असं म्हणतात त्याच कारण आता कळत आहे कारण हे महाजाल सर्वांना चक्रव्यूहात अडकवत आणि त्यातून बाहेर येणं फार कठीण आहे म्हणूनच स्वतःला वेळ द्या, घरच्यांना वेळ द्या कारण याच घरच्यांशी आपणं संवाद करायला कधी काळी सुस्कारे देत उंबरठयावर रडत बसत पत्राची वाट पहायचो याची जाण ठेवा. त्या पत्राची सर मात्र कोणत्याही यंत्राला येणारं नाही हे मात्र नक्कीचं. आजकाल कधीकाळी शाळेत खेळला जाणारा मामाच पत्र हरवलं हा खेळ सुधा अदृश्य झाला आहे.
पण आजच सारे दृष पाहता मनात एकच प्रश्न पडतो.
मामाच पत्र खरचं हरवलं
लेखक – अनिकेत शिंदे
सर्वांना जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
(कोणाला पत्र वाचून काही आठवणी आठवल्या तर नक्की कळवा)
मुख्यसंपादक
आपले मामाचे पत्र हे कथा फार आवडली व जुने दिवस आठवले .