Homeवैशिष्ट्येवाढदिवस रेखाचा

वाढदिवस रेखाचा

आज तिचा वाढदिवस. ती आज सहासष्ट वर्षाची झाली. सहासष्ट वर्षे!! बापरे!! ती आजही तशीच दिसते असे म्हणण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. तरीही ती अजूनही ग्लॅमरस दिसते याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. एवढे मोठ्ठे कुंकू, भरगच्च गजरा, एकापेक्षा एक सरस अशा कांजीवरम साड्या!! फक्त तिला आणि तिलाच शोभून दिसतात. या वयाचे इतर कोणी असे करायला धजावेल तर हास्यास्पद दिसेल.
असे म्हणतात की जीम मध्ये जाणारी, नियमितपणे योगासने करणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील ती पहिली अभिनेत्री आहे. complete make over या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर डोळे मिटून तिच्याकडे बोट दाखवावे.
दो अंजाने मधली ती आणि उमरावजान मधली ती या एकच व्यक्ती आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण जाते इतके तिने स्वतःला बदलले.
शाळेत असताना तिला नन व्हायचे होते. घरची आर्थिक चणचण दूर करण्यासाठी तिला शालेय शिक्षण अर्धवट सोडून चित्रपट सृष्टीत वयाच्या दहाव्या वर्षी प्रवेश करावा लागला.
हिंदीचा गंध नाही, नाचता येत नाही असे असतानाही तिला हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळाला. “सच है “या चित्रपटात पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूट मधून शिकून आलेला नवीन निश्चल तिच्यासमोर फिका पडला. ‘कानमें झुमका, चाल में ठुमका, लगे पचासी झटके’ या गाण्याला मायबाप प्रेक्षकांनी उचलून धरले. पडद्यासमोर नाण्यांचा खच पडायचा आणि थिएटर शिट्यांनी दणाणून जायचे.तिला मद्रासी काली अम्मा म्हणणारे तिला आपल्या चित्रपटात घ्यायला धडपडू लागले.
तिला हळूहळू चांगली कामे मिळू लागली. अगदी ऋषीदांच्या चित्रपटातही ती झळकली. अमिताभ बच्चन नावाचा परीसस्पर्श झाला आणि ती आमुलाग्र बदलली. तोपर्यंत ती चित्रपटसृष्टीत काम करत होती पण त्यात तिचे मन लागत नसावे. अमिताभ बरोबर काम करताना ती पूर्णार्थाने खुलली. खूबसूरत, उमरावजान, खून भरी मांग, उत्सव, इजाजत एकापेक्षा एक सरस चित्रपट तिने केले.
वैवाहिक आयुष्यात ती अपयशी ठरली. अनेकांबरोबर तिचे नाव जोडले गेले. अमिताभ बच्चन आणि तिच्या संबंधांवर जितके लिहिले गेलेय, जितकी चर्चा झालीय तितकी चर्चा कधीच कोणाबद्दल झालेली नसावी. दोघेही कधीच त्याबद्दल बोलत नाहीत. या साऱ्या प्रकरणाला एकप्रकारचे गूढ वलय प्राप्त झाले आहे.
आपल्या दुसऱ्या इनिंगमध्येही रेखा छान रमली होती. आजीचे रोलही तिने तितक्याच समरसतेने केले आहेतच.
या वयातही ती छान फिट दिसते. तिच्या अदा आजही भूल पाडतात. वाढत्या वयाने तिच्यात परिपक्वता आली आहे. ती तरुण दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न करते आहे असे अजिबात वाटत नाही.
ती स्वर्गातून आलेली शापित यक्षिणी वाटते. अमिताभ जर खरोखरच तिच्या प्रेमात पडला असेल तर त्यात नवल नाहीच!!
त्याच्याच तोंडून सिलसिलामधला मोनोलॉग मैं और मेरी तनहाई ऐकताना रेखा डोळ्यासमोर साकारते.
अनेक जणी लेडी सुपरस्टारचे बिरूद मिरवतात पण बॉलीवूड मध्ये रेखा सोडून कोणीही त्या बिरुदास पात्र नाही असे माझे मत आहे. (माधुरी, श्रीदेवी सुद्धा तिची जागा घेऊ शकत नाही!!)

समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular