Homeमुक्त- व्यासपीठतिला आणि तिच्या वयातल्या साऱ्या जणींना

तिला आणि तिच्या वयातल्या साऱ्या जणींना

तिला आणि तिच्या वयातल्या साऱ्या जणींना मी नेहमीच पोटासाठी (घरादाराच्या) काम करताना पाहिलय.माहेरपणास आलेल्या नणदांच्या मुलांचे करताना , स्वतःच्या मुलांआधी त्यांना भरवताना पाहिलय.
अनेकदा स्वतःच्या माहेराला दूर सारून सासरच्यांसाठी झटताना पाहिलय.
वेळोवेळी होणारा पाणउतारा सहन करून मागीलदारी हळूच अश्रू पुसताना पाहिलय..

सकाळच्या पाठीस पाठ लावून दुपार अन् संध्याकाळचा हात धरून रात्र येत राहाते.
या मात्र आत्ता भरलीयत पोटे नंतर काय? याच विवंचनेत.

मान्य आहे. तेव्हा नव्हते कॉन्टिनेन्टल आणि चायनीज. इतकेच काय अगदी पंजाबी आणि साउथ इंडियनही नव्हते शिरले यांच्या स्वैपाकघरात
पण तरीही रोज काहीतरी वेगळे पडायचेच पानात!
सडा, सारवण, देवधर्म, सण सारे सारे निगुतीने करायच्या.
वाटायचे यांना येत असेल का दुसरे काही?
यांना माहीत असेल फुलपाखराच्या मागे धावणे
आणि आकाशातले बदलते रंग न्याहाळत गवतावर निवांत पहुडणे.

यांना जाणवत असतील का ऋतूबदल?
की वसंत म्हणजे आगोट करायचा ऋतू आणि श्रावण, भाद्रपद म्हणजे कुळाचार, कुळधर्म आणि जेवणावळी इतकेच येत असेल यांच्या मनात?

या ही गेल्याच होत्या ना शाळेत. यांनीही तेव्हातरी वाचल्याच असतील बालकवींच्या कविता!
क्वचित कोणीतरी वडस्वर्थच्या डॅफोडिल्सबरोबर डोलल्याही असतील!
काहीजणींचे तरी पाय थिरकले असतील मेळ्यामध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात.
कोणीतरी धरला असेलच ब्रश आणि पॅलेट हातात.
लग्नानंतर गवसणी घातलेल्या सतारीला आणि चित्रांच्या कॅनव्हासला कुठे दडवत असतील?
नजरेस पडल्या नाहीत या गोष्टी म्हणून काय मनातल्या कोपऱ्यात तरी
छंद जोपासायचे थांबवत असतील?

कधीतरी वाटतच असेल ना घ्यावी एक दाणेदार तान,काढावे चित्र हरपून भान!
नीट निरखून पाहिले तरी त्यांच्या मनातले वादळ चेहऱ्यावर दिसत नाही.
काहीही झाले तरी प्रसन्न हसू चेहऱ्यावरून हलत नाही.

आज मागे वळून पाहिले तेव्हा दिसल्या काही पुसट काही ठळक खुणा यांच्या मनातल्या कलाकाराच्या!

पायली, अधेली च्या मापाने आणि शेकड्याच्या मानाने रोजचा स्वैपाक करतानाही सुरेख, एकसारख्या मऊसूत पोळ्या दाखवायच्या यांच्यातली सौंदर्यदृष्टी…
तुळशीवृंदावनावर कावेने रंगवून साध्या पांढऱ्या चुन्याने चितारलेले प्रमाणबद्ध राधाकृष्ण आणि रांगोळीतले रंग!! चित्रकारालाच जमेल हे सारे…
बाळाला झोपवण्याच्या बहाण्याने आणि देवळातल्या भजनावेळी गुणगुणत असलेले सुरेल गाणे त्यांची सुरांची तहान भागवत असेल..

स्त्री मुक्ती, स्त्री पुरुष समानता यांच्याशी त्यांचा सुतराम संबंध नव्हता.

संसारात न गुरफटता त्याही जर स्वतःला शोधायला निघाल्या असत्या तर मिळाले असते जगाला अनेक कलाकार, शास्त्रज्ञ आणि चित्रकार!

आमच्या घराच्या आणि पोटाच्या स्वार्थासाठी आम्ही पिढ्यानपिढ्या जगाचे केवढे नुकसान करत आलोय .

अनेक महान आत्मे स्वैपाकघरातल्या चुलीतल्या लाकडांसोबत जळून अनंतात विलीन झाले.
कोणत्याही बखरीत याची नोंद नाही की कोणालाही याची खंत नाही.
यांच्यासाठी कोणी दिवा लावत नाही.
थाळ्या बडवणे टाळ्या वाजवणे तर
शक्यच नाही.
तमाम आयाबाया, आज्या आत्यामावश्या, माम्या काकूंना समर्पित…..

  • डॉ. समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular