देवा…
चराचरात असूनही
मंदीरात गेल्या कित्येक दिवसांपासून
बंद आहेस…
कंटाळला नाहीस का रे तू…?
नाही हे अगदीच मान्य..
दगड होतास आधी…
पडून होतस गावाबाहेर कुठेतरी धुळखात
मग छन्नी हातोड्याचे घाव सहन करुन…
देव झालास
आणि मंदिरात येऊन उभा राहिलास ,
खरं सांग…
तू आधी होतास,
तिथेच सुखात होतास की नाही…?
तु म्हणत असशील मनातल्या मनात
इतके घाव सोसलेतउगाच नाही देव झालो….।
मान्य आहे तु घाव सोसलेस…
तुझे ते घाव बघून प्रेरणा मिळायची,
पण शेंदूर लावून ते घाव झाकून
तुला झगमगीत केलं बघ…
आणि त्याखाली हरवलास की नाही तू…
आज इतके वर्षे झाले…
शेंदूराचे इतके थर साचलेत,
तुझं निर्गुण निराकार असलेतं रूप…
जे आधी दिसायचं ते हल्ली दिसतच नाही बघ…।
म्हणजे चेहरा कुठला,
शरीर कुठलं ते ओळखावं लागतं…
श्वास गुदमरत नाही का रे तुझा…
आम्ही बघ
दोन मिनिटे मास्क नाकावर नाही ठेवू शकत…
मास्क नसला तरी भितीन गुदमरतोच…
तु रहा उभा तिथेच…
आम्ही म्हणत राहू तु आहेस पाठीशी
फक्त तुझा तो डोळ्यासमोर आलेला शेंदूर दूर कर
म्हणजे तुला आम्ही दिसत राहू…
म्हणजे तुझ्या
नसण्यापेक्षा आमच्या असण्याला महत्त्व येईल…
नाही म्हटलं ‘मी’ तु आहेस ,
आणि ‘तुच’ मी आहे म्हटल्यावर…
डोळ्यावरचा शेंदूर काढायचा कुणी…?
नाही म्हटलं तरी हा प्रश्न उरतोच ना रे..।
संतोष गायकवाड
मुख्यसंपादक